Tuesday, 14 August 2018

स्वयंरोजगार उभारण्यासाठी बेरोजगारांना सुवर्णसंधी


पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत चालविण्यात येत आहे. ही योजना राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, खादी ग्रामोद्योग आयोग यांच्यामार्फत ग्रामीण भागासाठी व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत ग्रामीण व शहरी भागासाठी राबविण्यात येत आहे. ही योजना सन 2016- 17 पासून ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जात आहे. या योजनेंतर्गत उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज मागणी मर्यादा रुपये पंचवीस लाख व सेवा व्यवसाय उद्योगासाठी कर्ज मर्यादा रुपये दहा लाखापर्यंतचे अर्थसाहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत दिले जाते.
 या योजनेंतर्गत 15 ते 35 टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते तसेच प्रकल्प मंजुरीनंतर प्रकल्प किमतीच्या पाच टक्के विकर घटकांसाठी व 10 टक्के रक्कम सर्वसाधारण घटकांसाठी स्वगुंतवणूक करण्यास आवश्यक आहे.
अर्थसहाय्य मागणी प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सुशिक्षित बेरोजगार, तरुण, ग्रामीण बलुतेदार, कारागीर यांनी www.pmegp eportal आणि kvic.gov.in या वेबपोर्टलवर अर्थसहाय्य मागणीचा प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. हा प्रस्ताव ऑनलाईन सादर करताना अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, लोकसंख्येचा दाखला, प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी लाभ घेऊन स्वयंरोजगार उभारणी करून आपल्याबरोबरच इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उस्मानाबाद आणि महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.

Friday, 10 August 2018

युवक-युवती बनणार माहिती दूत सरकारी योजनांचा विद्यार्थी करणार प्रचार-प्रसार


         सरकारी योजनांच्या माहितीचा प्रसार करत माहिती दूत होण्याची संधी राज्यभरातील युवकांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या योजनांची माहिती दुर्गम भागात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माहिती दूत उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून युवकांकडून सरकारी योजनांच्या माहितीचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.
युनिसेफ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने एक ऑगस्टपासून राज्यभरात माहिती दूत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी योजनांचे बहुतांश लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्ररेषेखालील आणि दुर्गम भागातील रहिवाशी आहेत, या सर्वांना सरकारी योजनांची माहिती व्हावी, त्यांचा विकास व्हावा, या हेतूने युवा माहिती दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व कॉलेजातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे काम या युवक-युवतींकडून केले जाणार आहे. राज्यात सहा हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये असून त्यात वीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी किमान पाच ते सात टक्के विद्यार्थी म्हणजे एक लाख युवक माहिती दूत या उपक्रमात सहभागी होण्याची शक्यता  आहे. या उपक्रमाव्दारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजसेवेची एक उत्तम संधी मिळू शकेल तसेच शासकीय योजनांच्या अभ्यासामुळे त्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठीही चालना मिळणार आहे.
                                                              ***

बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद शासकीय योजनांची शेतकऱ्यांना मिळतेय पुरेपूर माहिती


          जिल्ह्यामध्ये शासन बळीराजा चेतना अभियान राबवित असून हे अभियान पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आणि क्रांतीवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद तालुक्यातील आंबेहोळ, आंबेवाडी, बावी, बेगडा, बेंबळी, चिखली, दाऊतपूर, देवळाली, धारूर, कौडगाव, नितळी, पाटोदा, पिंपरी, पोहनेर,  सुर्डी, शेकापूर, सोनेगाव, जहागीरदारवाडी, कसबेतडवळे,सांजा, तेर,अनसूर्डा, नांदूर्गा, बरमगाव, वडाळा, खानापूर,लासोना, गावसूद, वडगाव, टाकळी वाघोली,कोंड, कावलदरा,कौडगाव,बावी, वरवंटी, वाडीबामणी, रामवाडी, कावळेवाडी,, सांगवी, बामणी, येवती, मेंढा, वाखरवाडी, येडशी, भंडारी या गावांमध्ये तर भूम तालुक्यातील सांडेसांगवी, डोकवाडी, अंजनसोंडा, चाँदवड, सोनेवाडी, वंजारवाडी, दिंडोरी, उळूप,जांब, आंतरगाव, बरमपूर या गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून पोवाडे, भारुड, कीर्तन, भजन या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद आणि जिद्द निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमांस गटविकास अधिकारी श्री. चकोर,श्री. आर.एस.कांबळे,  विस्तार अधिकारी श्री. भांगे,श्री.बावीकर, वरील सर्व गावांचे ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी आणि महिला यांनी उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद दिला. या मान्यवरांनी जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्याची आत्महत्या थांबविण्याबाबत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचवावे यासाठी शेतकऱ्यांना सकारात्मक मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक शिवाजी पाटील यांनी या माध्यमातून  शासकीय योजनांबाबतची  माहिती देणारे असे कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
                                                              ***