Friday, 10 August 2018

युवक-युवती बनणार माहिती दूत सरकारी योजनांचा विद्यार्थी करणार प्रचार-प्रसार


         सरकारी योजनांच्या माहितीचा प्रसार करत माहिती दूत होण्याची संधी राज्यभरातील युवकांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या योजनांची माहिती दुर्गम भागात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माहिती दूत उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून युवकांकडून सरकारी योजनांच्या माहितीचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.
युनिसेफ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने एक ऑगस्टपासून राज्यभरात माहिती दूत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी योजनांचे बहुतांश लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्ररेषेखालील आणि दुर्गम भागातील रहिवाशी आहेत, या सर्वांना सरकारी योजनांची माहिती व्हावी, त्यांचा विकास व्हावा, या हेतूने युवा माहिती दूत उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सर्व कॉलेजातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे काम या युवक-युवतींकडून केले जाणार आहे. राज्यात सहा हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये असून त्यात वीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी किमान पाच ते सात टक्के विद्यार्थी म्हणजे एक लाख युवक माहिती दूत या उपक्रमात सहभागी होण्याची शक्यता  आहे. या उपक्रमाव्दारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाजसेवेची एक उत्तम संधी मिळू शकेल तसेच शासकीय योजनांच्या अभ्यासामुळे त्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठीही चालना मिळणार आहे.
                                                              ***