Friday, 23 March 2018

समृध्दी शेतकरी अभियानांतर्गत यांत्रिकीकरण घटकाखाली निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप



उस्मानाबाद 23 :- कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत मौजे मेडसिंगा व उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत यांत्रकीकरण घटकाखाली निवड झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणाने ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.  
महेश लाकाळ (भिकारसारोळा), सूर्यकांत चंद्रकांत कदम(मेडसिंगा), बापू सोपान शित्रे (मेडसिंगा), अंगद महादेव शित्रे(मेडसिंगा) या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
 या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे, कृषी उपसंचालक एस.आर.चोले, तालुका कृषी अधिकारी ए.जी.देशमुख, सरपंच सौ. संगिता दत्तात्रय आगळे, उपसरपंच श्री. सुधीर शिवाजी पाटील, मेडसिंगा पॅटर्नचे जनक, नितीन राऊत , दत्तात्रय आगळे इतर ग्रामस्थ हजर होते.  

महाआरोग्य शिबिरातील गरजू रुग्णांच्या शस्रक्रिया नियोजनास प्रारंभ येत्या 26,27 मार्च रोजी गरजू रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा




उस्मानाबाद दि.23:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 04 मार्च रोजी विनामूल्य भव्य महिला व बाल महाआरोग्य शिबीर, पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.  
आता पुढील नियोजनाची आखणी करण्याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेतील इतर अधिकारी यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व औषधी द्रव्ये विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. संदीप जाधव, डॉ. निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्या रुग्णांची तपासणी महाआरोग्य शिबिरात करण्यात आली आहे,आता त्यांच्या पुढील उपचारासाठीचे शस्त्रक्रियेबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित रुग्णांनी किंवा त्यांना तेथे जाणे शक्य नसल्यास त्यांच्या जवळच्या जबाबदार नातेवाईकाने आपल्या जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार दि.26 मार्च आणि मंगळवार दि.27 मार्च रोजी आपल्या रुग्णतपासणीबाबतचे केसपेपर आणि संबंधित फाईलसह जावे.त्यानंतर त्यांना पुढील नियोजन व वेळापत्रक कळविण्यात येईल.या दोन दिवशी जी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, त्या दिवशी तज्ञ डॉक्टरर्सही तेथे उपस्थित राहणार आहेत, याची सर्व गरजू रुग्णांनी  व त्यांच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे आणि आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी केले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिरांतील गरजू रूग्णांना पुढील शस्त्रक्रियादी उपचारांना मदत व्हावी, म्हणून महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेंतर्गत अधिक अदयावत सुविधा निर्माण करणे तसचे विविध खाजगी रूग्णालयात असलेल्या धर्मदाय खाटांसाठी खाजगी रूग्णालयांना शासकीय पोर्टल पुढील 2 महिने वापरू देण्याची परवानगी वैदयकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे लाखो रूग्णांना लाभ प्राप्त होणार असून, या संपूर्ण प्रक्रियेत गरीब आणि गरजू रूग्णांना लाभ मिळतो आहे की नाही, यावर वैद्यकीय अधिकारी देखरेख ठेवतील असाही निर्णय झाला आहे.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खापर्डे, धनंजय कुलकर्णी, श्री. गर्गे, नितीन काळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्राचार्य आदींची उपस्थिती होती.

Thursday, 22 March 2018

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन


उस्मानाबाद दि.22:- शनिवार दिनांक  14 एप्रिल रोजी उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयात त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेले मोटार अपघात/कामगार नुकसान भरपाई प्रकरणे,दिवाणी प्रकरणे तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे,भू-संपादन प्रकरणे,कौटुंबिक आणि वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.
सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची वरील प्रकारची प्रलंबित असणारी प्रकरणे या लोकराष्ट्रीय अदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावेत आणि न्यायालयात खर्ची पडणारा स्वत:चा बहूमूल्य वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव एस.बी.देसाई यांनी केले आहे.