Friday, 16 March 2018

उस्मानाबाद वन विभागाला संत तुकाराम वनग्राम योजनेत चांगले यश


तुळजापूर तालुक्यातील कात्री गावाला पुरस्कार

उस्मानाबाद, दि. 16:-  राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या संत तुकाराम वनग्राम योजनेत उस्मानाबाद वन विभागाने या योजनेच्या स्पर्धेतील दोन पारितोषिके पटकावली आहेत. लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील लांबोटा या गावाल तर उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावाला पुरस्कार मिळाला आहे.
          विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी अशोक पवार व वन परिमंडळ अधिकारी राहूल शिंदे, वनरक्षक परशुराम राठोड यांच्या टीमसह कात्री ग्रामस्थांनी केलेल्या अथक परिश्रम व पाठपुराव्यामुळे या गावात वनक्षेत्र वाढले असल्याने त्यांना पुरस्कार मिळावा आहे.
          राज्य सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरु केली. वनक्षेत्रात व वनक्षेत्राच्या सीमेवर असलेल्या 15 हजार 600 गावांपैकी 12 हजार 661 गावात वनांचे रक्षण करण्यासाठी वनव्यवस्थापन समित्या स्थापन केल्या. या समित्यांनी वनांचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वनवनवा, अवैध चराई आदी कामे केली. या कामात चुरस होण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तर व राज्यस्तरावर उत्कृष्ठ काम करणाऱ्या समित्यांना संत तुकाराम वनग्राम योजना जाहीर केली. या योजनेतील 2016-17 या वर्षाचे निकाल जाहीर करण्यात आले असून यात लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील लांबोटा या गावाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे तर उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावाला मराठवाडा प्रशासकीय विभागाने बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  

पाण्याचे महत्व समजून जलनियोजनाची गरज -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे






उस्मानाबाद, दि. 16:- पाणीटंचाईच्या समस्येला आपणा सर्वांना सामोरे जावे लागत असून अशा परिस्थितीमध्ये पाण्याचे महत्त्व समजून त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.  
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यात 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या सप्ताहाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधीक्षक अभियंता श्री.सु.सा.पगार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न व स्थापत्य अभियांत्रिकी व पाणीसाठवणूक संचय धरणाचे तज्ञ सर डॉ.मोक्षगुड्डम विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन  व  दीपप्रज्वलन करण्यात आले.
        यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, शेती ही निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे शेती शाश्वत कशी होईल व शेतीला पाणी कसे मिळेल यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन थेंब न थेंब पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. 
जिल्ह्यात बारमाही वाहणारी एकही मोठी नदी नाही व मोठे जलसाठेही नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेततळे घेतले पाहिजेत जेणेकरुन पावसाचा खंड पडला तर उपलब्ध पाण्याचावापर शेतीसाठी करता येईल व उत्पादन क्षमता वाढण्यासही मदत होईल.पडणाऱ्या पावसाच्यापाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. 
जिल्ह्यातील पावसाचे सरासरी प्रमाण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिक पध्दतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. आधुनिक पध्दतीने शेती पिकाचे नियोजन केले पाहिजे, ऊस पिक घेताना सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी दिले पाहिजे.
विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील जुने जलसाठे दुरुस्ती करणे, केटीवेअर दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री.गमे यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यास सतत दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. शेतीसाठी पाण्याचा वापर करताना सुक्ष्म सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
शाश्वत पाणीसाठे निर्माण करणे, पाण्याची बचत करणे यासाठी सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे. पाण्याची बचत करुन उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पाण्याचा आराखडा तयार करुन कमी पडणारे पाणी कसे जलसंवर्धन करता येईल, यासाठी शेवटच्या माणसापर्यंत पाण्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोलते यांनी यावेळी सांगितले.
पाटबंधारे विभागाचे  अधीक्षक अभियंता सु.सा. पगार यांनी जलजागृती सप्ताहबाबत प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड, डॉ. खजूरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. आभार पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता श्री.पाटील यांनी मानले. यावेळी जलसंधारण विभाग, महसूल, जिल्हा परिषद व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जलप्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली.

Tuesday, 13 March 2018

सोशल मीडिया महामित्रच्या माध्यमातून तरुण सकारात्मक दृष्टीने एकत्र येण्यास चालना– – सोशल मीडीया महामित्रांची प्रतिक्रिया










उस्मानाबाद,दि.13:-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया महामित्र उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील निवडक सहभागींनी आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात संवादसत्र स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. या गटचर्चेत उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर व उमरगा या क्षेत्रातील एकूण 19 युवकांनी सहभाग नोंदविला होता.

          जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी सोशल मीडिया महामित्र उपक्रम आणि संवादसत्र उपक्रमाबद्दल प्रास्ताविकातून उपस्थित स्पर्धक, परीक्षक, निरीक्षक यांना माहिती सांगितली.  

दिवसभरात एकूण चार टप्प्यातील स्पर्धकांनी महामित्र उपक्रमातून काय साध्य होईल? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांचा प्रभाव किती खरा किती खोटा? समाज माध्यमे किती दिवस? समाज माध्यमांची इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बरोबरी? अशा विषयांवर गटचर्चा होवून ही स्पर्धा संपन्न झाली.

या गटचर्चांचे परीक्षण व निरीक्षण जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, पत्रकार संतोष जाधव, साहित्यिक राजेंद्र अत्रे,नेहरू विकास केंद्राचे विकास कुलकर्णी,संतोष कांबळे (कोळी), गणेश कुलकर्णी यांनी केले.

शेवटी सहभागी सर्व स्पर्धकांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अभिनंदन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.याशिवाय सहभागी स्पर्धकांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली तसेच त्यांना लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, मुद्रा योजनेची आणि बळीराजा चेतना अभियानाची माहिती पुस्तिका भेट स्वरुपात देण्यात आले.