Saturday, 17 February 2018

शासन नेहमी शेतकऱ्यांसोबत आहे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे






उस्मानाबाद,दि.१७:- शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे व जलयुक्त शिवारचे काम आणखी जोमाने करावे, शासन नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहे, जिथे गरज पडेल तिथे शासन नेहमीच शेतकऱ्यांना मदतीसाठी तयार आहे, असे प्रतिपादन दारफळ येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.

यावेळी  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, आत्माचे प्रकल्प संचालक केशव मलगुंडे, तहसिलदार सुजीत नरहरे, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी ए.जी. देशमुख, मंडळ कृषी अधिकारी ए.पी. चिक्षे, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, ऊस लागवडीबाबत शेतकऱ्यांनी आपल्या भूभागाचा व पाणी उपलब्धतेचा अभ्यास करुन पिक पध्दतीचा अंर्तमुख होवून विचार करायला हवा, तसेच शेतकऱ्यांनी  शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. बळीराजा चेतना अभियानांतर्गत मिळालेल्या निधीचा योग्य तो विनियोग करायला हवा. एका शेतकरी उत्पादक गट कंपनीला एक कोटी पर्यंत अनुदान मिळू शकते, त्यादृष्टीने गावकऱ्यांनी शेती गटाकडे सकारात्मक पध्दतीने पाहावे. नदी खोलीकरणासाठी व नरेगाच्या कामासाठी शक्य तेवढी मदत करण्यात येईल. कामाची प्रगती पाहून शासकीय कर्मचारीही श्रमदानात सहभागी होतील, असा विश्वासही यावेळी श्री. गमे यांनी व्यक्त केला.  

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले यांनी यावेळी शेतीबाबतचे विविध उपक्रम व योजना तसेच अनुदानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी नदी खोलीकरण, विहीर पुनर्भरण भूमीपूजन, श्री. संत कोकणे महाराज मठास भेट दिली. तसेच पोलीस पाटील कार्यालयाचीही पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य गोरे यांनी केले. प्रज्ञा जयराम शेटे हिने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.  

यावेळी ग्रामसेवक माधवी लोखंडे, सरपंच सौ. बालिका गोवर्धन सुतार, उपसरपंच ज्योती जाधव, सदस्य राजेंद्र इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब घुटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संभाजी इंगळे, पोलीस पाटील सचिन जाधव, अंगणवाडी कार्यकर्ती मैनाबाई भूतेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Friday, 16 February 2018

उमरगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिक पाहणी





  
उस्मानाबाद,दि.16:- उमरगा तालुक्यातील येणेगूर, महालिंगरायवाडी, बेळंब, भुसणी, औराद, गुंजोटीसह विविध गावात अवकाळी पावसासह गारपीट झालेल्या भागात जावून शुक्रवारी जिल्हाधिकारी  राधाकृष्ण गमे यांनी शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली.    
यावेळी उमरगा  उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, तहसिलदार अरविंद बोळंगे, तुळजापूर तहसिलदार दिनेश झांपले तसेच तालुका कृषी  अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. या पाहणी दरम्यान श्री. गमे यांनी केशव राजाराम गायकवाड-येणेगूर, श्रीशैल सिद्राम बिराजदार-येणेगूर, हिराचंद रंगराव चव्हाण- महालिंगरायवाडी, आप्पाराव लक्ष्मण लिंबाळे- बेळंब,  सिद्राम केशव माणगे-बेळंब, ललिता हिंगमिरे-भुसणी, शालनबाई जाधव- भुसणी, प्रशांत देशमुख-औराद, श्रीकृष्ण आण्णाराव पाटील-गूंजोटी या शेतकऱ्यांची भेट घेवून चर्चा केली आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
जिल्हाधिकारी श्री. गमे यांनी तात्काळ शेती पिकांच्या झालेल्या नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत ‍अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी कृषी अभ्यासक, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूरच्या शास्त्रज्ञांची मदत घ्यावी, अशा सूचनाही यावेळी अधिकारी  व कर्मचाऱ्यांना केल्या.  

Tuesday, 13 February 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीतुळजाभवानीचे दर्शन





उस्मानाबाद,दि.13:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्रीतुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता,कामगार,भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार मधुकरराव चव्हाण,  आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे उपस्थित होते.