Thursday, 30 November 2017

जागतिक एड्सदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम संपन्न




उस्मानाबाद,दि.30:-  मानसिक, शारिरिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया समाधानी असणे म्हणजे आरोग्य चांगले असणे होय, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी आज केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.माले बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व तहसिलदार राजकुमार माने  यांची उपस्थिती होती. यावेळी  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री. गलांडे,  आयएमए सदस्य डॉ.राजगुरू, फोग्सीचे सदस्य डॉ. सुशिलकुमार सरडे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ. जिंतूरकर,  डॉ.नीता चौगुले, डॉ.पोळ, डॉ.जाधव आदीची उपस्थिती होती.
यावेळी  पुढे बोलताना डॉ.माले म्हणाले की, अनेक रोगाचा आपण नायनाट करु शकलो याचे श्रेय समाजातील सर्वच नागरिकांना आहे. नुसत्या घोषणा करुन चालणार  नाही त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड दयावी. काम करताना काळजी घ्यावी, संसर्ग होवू नये म्हणून काळजी घ्यावी, बायोमेडिकल वेस्ट योग्यरित्या त्याची विल्हेवाट लावावी. चांगल्या कामांना मनापासून करण्याचा प्रयत्न करावा.व्यसनापासून दूर राहावे, स्वच्छतेची कास धरा व इतरांनाही प्रोत्साहित करा,त्याचबरोबर प्रत्येकाने दरवर्षी आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी.
आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल रिक्षाचालकांचे विशेष कौतुक डॉ.माले यांनी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार श्री. माने यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती घेवून जागरुक व्हावे आणि सकारात्मक जीवन जगावे, असे सांगितले.
            निवासी वैद्यकीय अधिकारी श्री.शिन्दे यांनी एचआयव्हीबाधितांना प्रशासनाने त्रस्त कुटूंबात समाविष्ट करुन त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात हा जिल्हा पहिला असल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यमानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागरण  फेरी काढण्यात आली. या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी जनजागरण रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. विविध  नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते. एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांना  सामुहिक शपथ देण्यात आली. प्रारंभी सर्व यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काकडे यांनी केले तर आभार डॉ.नीता चौगुले यांनी व्यक्त केले.सुत्रसंचलन संतोष पोतदार यांनी केले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

“लोकराज्य” मासिकाचे सभासदत्व घेऊया, विकासाच्या वाटेवर निघूया…

Wednesday, 22 November 2017

“वाचाल तर वाचाल” हे केवळ सुभाषितापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे -माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे






उस्मानाबाद.दि.22:-  ग्रंथांच्या माध्यमातून संतांनी आपला समाज घडविला. अध्यात्मातून मन घडविले गेले, खऱ्या रुपाने पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते, मात्र “वाचाल तर वाचाल” हे केवळ सुभाषितापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्‍सव- 2017’ च्या समारोप प्रसंगी श्री. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी श्री विशाल पवार, अप्पर कोषागार अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार, नायब तहसिलदार श्री. संतोष पाटील, पराग कोडगुले, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी, श्री. के. व्ही. सरवदे, ॲङ वा.मा. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पुढे बोलताना श्री. ढोबळे म्हणाले की, ग्रंथाच्या माध्यमातून संतानी आपला समाज घडविला. अध्यात्मातून मन घडविले गेले, खऱ्या रुपाने पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते. वाचकाची आवडनिवड बदलते आहे, त्यानुसार पुस्तकांची गरजही निर्माण झाली आहे. आजच्या इंटरनेट जगात ई-बुकच्या माध्यमातून वाचक आपली वाचनाची भूक भागवित आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडते. लेखकाच्या प्रतिभेतून आईची मायाचा पाझरत असते. यातून ग्रंथ चळवळ मोठी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन यासाठी साताऱ्यातील भिलार या पुस्तकाच्या गावाचे अनुकरण करावे असेही त्यांनी सांगितले.
भूतकाळाची ओळख, वर्तमानात काय घडतय आणि भविष्यात काय घडणार आहे हे सप्रमाण सांगण्याची ताकद पुस्तकातच आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल न देता त्यांच्यावर संस्कार करणारे एखादे पुस्तक पुस्तक दयावे,असेही प्रा.ढोबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ता तसेच पत्रकार सुभाष पाटोळे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार श्री.डेंगळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन श्री. ज्ञानेश्वर पाटील आणि अभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रंथप्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, ग्रंथचळवळीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.