Wednesday, 1 November 2017

उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ


उस्मानाबाद, दि.1:-  महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विकास तळागाळातील, खेडयातील शेतकऱ्यांना माहिती व्हावा, या उद्देशाने महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने उस्मानाबाद येथे महा रेशीम अभियानाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्ह्यात 250 एकर नवीन तुती लागवडीचा लक्षांक दिलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नवीन शेतकऱ्यांची निवड करणेकरिता महा रेशीम अभियान राबवून गावो गावी कार्यक्रम व ग्रामसभा घेवून शासन निर्णयानुसार योजनेंतर्गतचे देय लाभ व रेशीम उद्योगाची कार्यपध्दती तसेच या उद्योगापासून मिळणारे उत्पन्न याबाबतची माहिती आणि शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यास प्रवृत्त करणे, मनरेगांतर्गत 229 एकर क्षेत्रावर तुती लागवड करण्यात आली असून 18 गावामध्ये 275 लाभार्थ्यांकडे कामे चालू आहेत.
सन 2018-19 मध्ये मनरेगांतर्गत तुती लागवड करण्यासाठी नवीन लाभार्थी करिता महा रेशीम अभियान दि.1 ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिलह्यातील शंभर गावामध्ये कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.   
यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार राहूल पाटील, जिल्हा रेशीम अधिकारी श्री.मुल्ला.एम.के, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, रेशीम कार्यालयाचे  उस्मानाबाद समुह प्रमख श्री. एस.ई.इप्पर, बार्टी पुणेचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, केंद्रीय रेशीम मंडळाचे सह संचालक श्री.ए.पी.बागडे आदीसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.   

“शेतकरी मित्र केंद्र” दिशादर्शक ठरेल - क्रीडा समीक्षक सुनंदन लेले


उस्मानाबाद, दि. 01 :-  जिल्हयातील शेती व शेतकरी वर्गांचे प्रश्न सोडवण्याकरीता “शिवार संसद युवा” चळवळीद्वारे सुरुवात करण्यात आलेल्या “शेतकरी मित्र केंद्राच्या” उदघाटनप्रसंगी शेतकरी मित्र केंद्र शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी केले.
शहरातील मार्तंड रेणुका निवास, काझी हॉस्पीटलच्या मागे, समर्थ लॉज जवळ, उस्मानाबाद या ठिकाणी क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज शेतकरी मित्र केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, पोलीस निरिक्षक श्रीकांत वेणुगुरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. लेले म्हणाले की, शिवार संसद युवा चळवळ, शिवार फौंडेशन द्वारा संचलित या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या सामाजिक, आर्थिक, वैद्यकिय, शैक्षणिक, नोकरी संदर्भ, शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था विषयी माहिती, सल्ला व मार्गदर्शन शासकीय प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा, नाममात्र दरामध्ये शेतकऱ्यांसाठी ई-सेवा पुरवठा, विशेष त्रस्त शेतकऱ्यांसाठी समुपदेशनाद्वारे माहिती व सल्ला याचबरोबर शेतीविषयक माती परिक्षण, जोडधंदा व्यवसाय, कृषी निविष्ठा, सेंद्रीय शेती, आधुनिक शेती, झिरो बजेट शेती इत्यादी नाविन्यपूर्ण विषयाची माहिती व मदत मिळणार आहे याचा लाभ जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचे काम करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात जे प्रश्न फक्त प्रबोधनाने  सोडविले जाऊ शकत नाहीत ते प्रश्न प्रत्येक आठवडयाच्या बैठकीत विनायक हेगाणा यांनी मांडले तर त्या प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने निश्चित तोडगा काढून शेतकऱ्याचे समाधान होईल आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे शेतकरी मित्र केंद्रात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढून अनेक शेतकऱ्यांना समाधान देण्याचा प्रयत्न होईल.   
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येविषयी सल्ला किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी 9623250838 या क्रमांकावर सपर्क साधावा किंवा शेतकरी मित्र केंद्रात प्रत्यक्ष येऊन भेटावे असे आवाहन विनायक हेगाणा यांनी केले.

या कार्यक्रमास एबीएएल कंपनी, अविनाश पावळ, निलेश दळवी, मंगेश पाठक यांचे सहकार्य लाभले. या वेळी शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. 

उस्मानाबादची दिशा करियर ॲकॅडमी राज्यातील पहिले “लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र”


उस्मानाबाद, दि.1:- महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या “लोकराज्य” मासिकाची उपयुक्ता लक्षात घेऊन दिशा करियर ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी “लोकराज्य” मासिकाचे वार्षिक सभासदत्व स्विकारुन राज्यातील पहिले “लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र” करण्याचा बहुमान मिळविला आहे.
दिशा करियर ॲकॅडमीच्या कै. प्रा. अविनाश अवताडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त समता हॉल, उस्मानाबाद या ठिकाणी आयोजित अवयवदान व रक्तदान शिबिरात ॲकॅडमीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांनी अवयवदान व रक्तदान केले याच कार्यक्रमात ॲकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी “लोकराज्य” मासिकाचे वार्षिक सभासदत्व स्विकारुन राज्यातील पहिले “लोकराज्य स्पर्धा परिक्षा केंद्र” करण्याचा बहूमान मिळविल्यामुळे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते संचालकांचा सन्मान करण्यात आला.
          जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपक्रम, “लोकराज्य मासिक” महान्यूज वेबपोर्टलचे महत्व आणि उपयोगिता समजावून सांगितल्यामुळे दिशा करियर ॲकॅडमीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे सभासदत्व स्विकारले असून लोकराज्य मासिकातील लेखांचे ॲकॅडमीत नियमित वाचन करण्यात येईल असे दिशा करियर ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांनी यावेळी सांगितले.  
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा अवयवदान अभियान समन्वयक डॉ. गजानन परळीकर, नगर परिषदेचे स्वच्छता व्यवस्थापक महारुद्र गालट, दिशा करियर ॲकॅडमीचे प्रा. बाळकृष्ण उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश क्षिरसागर यांनी केले. सुत्रसंचलन सिध्देश्वर मते यांनी केले तर आभार सुमित्रा शिंदे यांनी मानले, यावेळी अजित रणदिवे, सुरवसे, वैद्य, शिंदे, चिंगटे यांच्या सह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.