Saturday, 22 July 2017

जिल्हयातील सर्व बँकामध्ये किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर वर 31 जुलै पर्यंत पिक विमा भरावा- जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद, दि.22 :-  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2017 असून बँका व्यतिरिक्त कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रावर विमा भरता येणार असल्याची माहिती पिक कर्जासाठीच्या आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.
            छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा व प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 साठी पिक विम्याचा हप्ता भरण्यासाठी मदत व्हावी याकरीता जिल्हयातील विविध भागात जवळपास 643 कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) असून त्यांची माहिती सर्व बँकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर  (CSC) मध्ये आधार कार्ड, सात-बारा, पिक-पेरा प्रमाणपत्र व बँक पासबुक हे कागदपत्र घेऊन ऑनलाईन पध्दतीने पिक विमा हप्ता भरावा व छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले.  
            या कार्यशाळेत महाऑनलाईनचे जिल्हा व्यवस्थापक संतोष गायकवाड यांनी उपस्थित सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) धारकांना शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी पात्र व अपात्र लाभार्थी यांच्या माहितीसह त्याबाबतचे फॉर्म ऑनलाईन कसे भरावयाचे आणि पिक विम्याचा हप्ता कशा पध्दतीने भरुन घ्यावयाचा याबाबतची माहिती उपस्थित सेंटरधारकांना कॉमन सर्व्हिस सेंटरचे प्रतिनिधी हेमंत मोटे, लक्ष्मीकांत कांबळे, वैभव मस्के यांनी दिली.
            यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हयातील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) धारक उपस्थित होते. 

Friday, 21 July 2017

आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटक

लेख                                                                            दिनांक.21-07-2017                                                  
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो.  काही संकटांची आगावू चाहूल लागते तर काही संकटे अचानक येऊन मनुष्य जीवन उध्वस्त करुन जातात आणि आपत्ती कोणतीही असो त्यामुळे जीवित व वित्तहानी होतेच. आपत्ती काळात स्वत:चा, कुटुंबाचा, समाजाचा व गावचा बचाव करायचा असेल तर योग्य ती पूर्वतयारी, मानसिकता तयार करणे आवश्‍यक आहे.यासाठी आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख घटकांची माहिती या लेखाद्वारे जाणून घेवू या.
           
आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रतिबंध, विमोचन, सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद, पूर्ववत्तता व पुनरुत्थापन अशा प्रमुख घटकांमध्ये दर्शविली आहेत.  प्रतिबंध या घटकातील सर्व कृती ह्या आपत्ती टाळण्याच्या दिशेने आखल्या जातात.  तसेच आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेनेही नियोजन केले जाते.  विमोचन या विभागातील सर्व कृती अशा तऱ्हेने आखलेल्या असतात, की येऊन गेलेल्या आपत्तीचा कमीत कमी परिणाम देशावर व लोकांवर होईल.  सज्जता या मध्ये आखणी केली जाते की, कोणत्याही आपत्तीला त्वरीत व प्रभावी प्रतिसाद द्यायला शासन / प्रशासन, जनता व व्यक्ती तयार होतील.  आपत्तीचा आघात या चक्रातील टप्प्याचे नावच सर्व गोष्टींचा खुलासा करते.ज्या वेळेस आपत्ती कोसळते ती वेळ म्हणजेच आपत्तीचा आघात आपत्तीव्यवस्थापन चक्रातील या टप्प्याचे अस्तित्वच या गोष्टीची सतत आठवण करुन देणे की आघाताची तीव्रता प्रत्येक आपत्तीमध्ये वेगवेगळी असते व ती त्या आपत्तीच्या तीव्रतेच्या सापेक्षच असते. या टप्प्यावरच बाकीचे सर्व व्यवस्थापन अवलंबून असते.

            आघाताला प्रतिसाद द्या, आघात होण्यापूर्वी व झाल्यानंतर तात्काळ द्यावाच लागतो. फक्त मांडणीच्या सोयीसाठी या क्रमात तो आपत्तीच्या आघाताच्या टप्प्यानंतर लगेचच ठेवलेला आहे.  कारण हीच वेळ अशी असते की, झाडून साऱ्या प्रतिसाद यंत्रणा कामाला लागतात.  या टप्प्याला आपत्कालीन प्रतिसाद असेही म्हणतात.  हा टप्पा हेच दर्शवतो की, आपत्तीचे विमोचन आणि निवारण लवकरात लवकर होण्याकरिता आपत्कालीन उपाय, निवास अथवा पुनर्वसनाकरता अवलंबले जातात.  आपत्तीच्या तीव्रतेवरती प्रतिसाद अवलंबून असतो,  म्हणजेच तीव्रता अधिक असेल तर वेळप्रसंगी शासन आणीबाणी किंवा युद्धसदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर करते व युद्धपातळीवर प्रतिसादात्मक उपायाचे आयोजन केले जाते.
           
पूर्ववत्तता या चक्रामध्ये आघातानंतर त्याच्या तीवृतेनुसार जनजीवन विस्कळीत होते.  काही प्रसंगात गावच्या गावे किंवा संपूर्ण शहरे उध्वस्त होतात.  अशा वेळेस जनजीवन पूर्ववत होण्यास म्हण्जेच आपत्तीपूर्व जसे होते तसे होण्यास जो काळ लागतो व पुनरुत्थापन हा टप्पा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रसंगी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे.या टप्प्याने प्रयोजनास या चक्रामध्ये याच हेतूने करण्यात आलेले आहे, की आपत्तीच्या आघाताच्या राष्ट्राच्या हितासाठीच उपयोग व्हावा,जसे की, राष्ट्रीय योजनांची आखणी करतानाच आपत्तीचा व त्यातून उद्भवलेल्या बदलाचा राष्ट्रहितासाठी उपयोग करणे सुलभ व्हावे.

            सुयोग्य आपत्कालीन नियोजनाच्या आखणीमध्ये पर्यायाला पर्याय ठेवणे हे जागतिक स्तरावर मान्यता पावलेले तत्व आहे.  ज्या देशांच्या आपत्ती नियोजनाची आखणी केलेली नव्हती, अशा देशांना आपत्तीच्या आघाताची तीव्रता सर्वाधिक जाणवली, तर तिथे यासाठी सुनियोजित आखणी झालेली होती.अशा देशांना आपत्तीची तीवृता कमीतकमी जाणवली.यावरुनच आपत्ती निवारणाच्या नियोजनाच्या आखणीचे महत्व आपल्या लक्षात येते.  भविष्यकालीन आपत्तीचा वेध व त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचे आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यायी आयोजनातील आखणीतील सुसूत्रता होय.
            आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचाराचा महत्व देवून जीवन वाचविणे, जखमी मनुष्याची स्थिती अधिक खालावण्यापासून रोखणे व स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करुन  दुखापतीपासून आराम देणे व प्रत्यक्ष वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. अशा वेळी कोणतीही व्यक्ती ज्याने अधिकृत प्रथमोपचार प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षण घेतले आहे असे प्रथमोपचार तज्ञाने वेगात पण शांत डोक्याने अचूकपणे आपले काम केले पाहिजे.

            प्रथमोपचार तज्ञाची निरीक्षणशक्ती चांगली असावी, स्वत:चा जीव धोक्यात न घालता परिस्थितीचे निरीक्षण करुन निर्णय घ्यायची क्षमता असावी.  आत्मविश्वासाने तणावाखाली काम करताना सुद्धा तो शांत राहू शकणारा असावा.  त्याच्याकडे नेतृत्वगुण असावे. गर्दी नियंत्रित करणे, लोकांना सूचना देणे व बघ्याकडून मदत मिळविणे अवगत व्हावे.  त्याला त्याच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव असावा.  जखमी / रुग्णाच्या स्थितीवरुन त्याला त्याचा आजार ओळखता आला पाहिजे वा त्यानुसार वेळेत प्रथमोपचार केला पाहिजे.  त्यांच्याकडे उत्तम निर्णयशक्ती असावी. लोकांशी बोलण्याची कला चांगली अवगत पाहिजे.  जखमीला, त्यांच्या काळजीत पडलेल्या नातेवाईकांना शांत करुन त्यांच्यात विश्वास जागृत करता आला पाहिजे.  जरुरी पेक्षा जास्त आत्मविश्वास न दाखविता काम करावे, स्वत:च्या मर्यादा कळल्या पाहिजेत, गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना फाजील दिलासा देणे टाळता आले पाहिजे व आपले कौशल्य दाखवून प्रथमोपचारामध्ये नियमितपणे अचूक प्रथमोपचार पद्धती वापरता आली पाहिजे तरच आपत्कालीन नियोजनाची फलश्रुती मिळेल.

                                                                              मनोज शिवाजी सापन                                                                                                                                                  
                                                                                                                      जिल्हा माहिती अधिकारी,

                                                                                                                          उस्मानाबाद 

Thursday, 20 July 2017

अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवावा - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.20:- जिल्हयातील 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया देण्यात याव्यात, त्यामध्ये  विटभट्टी कामगार, झोपडपट्टया, बांधकामाची ठिकाणे व बाहेरच्या जिल्हयातून आलेल्या फिरस्ती पाली यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवावा,अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केल्या.
            अतिसार नियंत्रण पंधरवाडा 01 ऑगस्ट 2017 ते दि. 13 ऑगस्ट 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, आय.एम.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजगुरु, आय.पी.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. घोगरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.आर. पांचाळ व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            देशात अर्भक मृत्यूदर व बालमृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालमृत्यूंचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. यामुळे जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या दि.01 ऑगस्ट 2017 ते दि. 13 ऑगस्ट 2017 या कालावधीमधील विशेष अतिसार पंधरवाडात विटभट्टी कामगार, झोपडपट्टया, बांधकामाची ठिकाणे,ग्रामीण भागातील वाडी, वस्तीवरील सर्व ठिकानावर लक्ष केंद्रीत करुन0 ते 5 वर्षाखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया देण्यात याव्यात, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी दिले.    

            या मोहिमेंतर्गत जिल्हयामध्ये 0 ते 5 वर्षाखालील ग्रामीण भागात 1 लाख 31 हजार 353 व शहरी भागात 46 हजार 139 अशी एकूण 1 लाख 77 हजार 492 बालके आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी 1 हजार 198 आशा स्वयंसेविका, 482 आरोग्य कर्मचारी, 232 आरोग्य पर्यवेक्षक, 1 हजार 890 अंगणवाडी कार्यकर्ती व 1 हजार 765 अंगणवाडी मदतनीस असे एकूण 5 हजार 567 मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 0 ते 5 वर्षाखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया सर्व स्तरावर देण्यात येणार असून या मध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, नगरपालीका रुग्णालय या ठिकाणी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे व या कालावधीत सर्व शाळा व अंगणवाडयांमध्ये हात धुण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी यावेळी  बैठकीत दिली.