Saturday, 7 January 2017

प्राथमिक जेष्ठता सूची जाहीर


उस्मानाबाद,दि.7:- महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठ विनियमन ) नियमावली 1982  अन्वये मंडळ अधिकारी संवर्गातील दि.1 जानेवारी 1982 ते 30 डिसेंबर 2015 या कालावधीची जेष्ठता सूचीसाठी उस्मानाबाद जिल्हयातील या कालावधीची प्राथमिक जेष्ठता सूची www.osmanabad.nic.in या संकेतस्थळावर  प्रसिध्द  करण्यात  आलेली  आहे.
तरी मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती झालेले/निलंबित/सेवानिवृत्त कर्मचारी  तसेच  मयत  कर्मचारी यांचे  वारस  यांनी या प्राथमिक  जेष्ठता  सूचीबाबत आक्षेप असतील  तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.23 जानेवारी 2017 पूर्वी आक्षेप सादर करावेत,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनरे यांनी कळविले आहे.

                                         ***

पत्रकार दिनानिमित्त दि.10 जानेवारीला “बळीराजा चेतना अभियानांतर्गत” शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा पत्नींना शासकीय योजनांची माहिती


उस्मानाबाद, दि.7:-पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नीना शासकीय  योजनांची  माहिती व्हावी या हेतूने या महिलांचा जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांसोबत सुसंवाद आणि या सुसंवादानंतर उपस्थित सर्वांची आरोग्य तपासणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत.
तरी  जिल्ह्यातील  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नीनी या कार्यक्रमासाठी  मंगळवार  , दिनांक 10 जानेवारी 2017 रोजी  सकाळी 11.00 वाजता  जिल्हा नियोजन सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय  इमारत , उस्मानाबाद  येथे उपस्थित राहावे , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी  सानप यांनी केले आहे .

****

पत्रकार दिनानिमित्त दि.10 जानेवारीला पत्रकारांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन


उस्मानाबाद, दि.7:- दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.
          यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सर्व पत्रकारांकरिता जिल्हा नियोजन  सभागृह,  मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत येथे  दि.10 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांचा व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा सुसंवाद,पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी हे उपक्रम राबविले जाणार आहे.
तरी जिल्हयातील  व तालुका स्तरावरील सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

                               ***