Thursday, 5 January 2017

पत्रकारितेतून लोकशिक्षण व ज्ञानप्रसार !

                     

दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.  सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवीन जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले. प्रयत्नशिल व वैचारिक चळवळ सुरु करुन त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच आपले जीवनकार्य मानले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधीत महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सूवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सूवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून
“दर्पण”  या वृत्तपत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. “दर्पण” हे वृत्तपत्र १८३२ मध्ये काढून मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा त्यांनी पाया घातला. दर्पणकार जांभेकरांनी  १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. बाळशास्त्री जांभेकर यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू ,या उपक्रमांमागे होता.
कोकणातील सिंधुदूर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी १८१२ मध्ये बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या कुटुंबामध्ये झाला.. अज्ञान,दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरणशक्तीने त्यांनी त्यावेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी “दर्पण”   या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ  जांभेकरांनी रोवली..
            मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४ मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक       होण्याचा बहुमानही  जांभेकरांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५ मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी यालाच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
            आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. आचार्य बाळशास्त्री  जांभेकरांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत  या भाषांप्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादींसह त्यांनी विदेशी भाषांचाही  त्यांनी अभ्यास केला होता. भाषाशास्त्रे, इतिहास , संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादींचा अभ्यासही जांभेकरांनी केला . या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली.
            आचार्य बाळशास्त्री  जांभेकरांनी “शून्यलब्धी” वर मराठी  भाषेत  पहिले पुस्तक लिहिले .तसेच “नीतीकथा” “इंग्लंड देशाची बखर 1 व 2 “,  “बालव्याकरण” , “हिंदुस्थानचा इतिहास” , “भूगोलविद्या” , “इंग्रजी-मराठी धातुकोष”  ही आचार्य जांभेकरांनी  लिहिलेली काही पुस्तके. याव्यतिरिक्त आचार्य जांभेकरांनी “ज्ञानेश्वरी” चे संपादनही  केले.
            आचार्य बाळशास्त्री  जांभेकरांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी वृत्तपत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विद्वत्‍तेचा गौरव केला होता. दादाभाई नौरोजी हे आचार्य जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले होते- जांभेकर हे पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विद्वान मुकुटमणी, प्रख्यात पं. अव्दितीय विव्दान होते. “मुंबईना समाचार” या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी, असे आवाहन केले होते. १८४६ मध्ये जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी  दर्पणकारांचे निधन झाले .. पण अल्पावधीत त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्राचा कायापालट करणारे ठरले.
        प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात आचार्य बाळशास्त्री  जांभेकर हे व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली ! राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते भारुन जाऊन आचार्य जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला व तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तूपाठ जांभेकरांनी गिरविला व त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा-जमनी भाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली.
अशा या थोर आद्य पत्रकारास  शतश: अभिवादन !
                                                                                   
--आशा बंडगर ,
                                                                                    सर्वसाधारण सहायक तथा
                                                                                    माहिती सहायक
                                                                                    जिल्हा माहिती कार्यालय , उस्मानाबाद 

Wednesday, 4 January 2017

10 वी च्या मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे विलंब शुल्क दि.2 जानेवारी 2017 पासून स्विकारण्यात येतील


उस्मानाबाद दि. 4:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2017 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे दिनांक 4 नोव्हेबर  ते 5 डिसेंबर 2016 पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 6 ते 13 डिसेबर 2016 पासून रुपये 1000/- च्या जुन्या चलनी नोटा बंद झाल्याने विद्यार्थ्यांन शुल्क भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुदतीत विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे  ऑनलाईन भरण्याची  प्रक्रिया पूर्ण करावी व शुल्क भरण्याचा कालावधी नंतर कळविण्यात येईल, असे संबंधितांना  यापूर्वी कळविण्यात आले होते.
              त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क खाली नमूद केलेल्या पदध्तीनुसार भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
            सद्य:स्थितीत ज्या माध्यमिक शाळा परीक्षा शुल्क  प्रचलित चलनासह रोखीने भरु शकत असतील त्यांनी प्रचलित पदध्तीने बँकेत रोख रक्कम चलनाने भरावी व विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागीय मंडळात जमा करावी.
            ज्या शाळा प्रचलित चलनासह रोखीने रक्कम भरु शकत नसतील अशा शाळांनी संबंधित विभागीय मंडळाचे सचिव  यांच्या नावे धनाकर्ष काढून (डी.डी.) चलन व धनाकर्ष, विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागीय मंडळ कार्यालयात जमा करावी. ज्या शाळाना RTGS/ NEFT द्वारे रक्कम जमा करावयाची आहे त्यांनी संबंधित विभागीय मंडळाच्या खात्यावर RTGS/ NEFT द्वारे रक्कम जमा करावी. तसा भरणा केल्यास चलनावर बँकेचा (UTR)  क्रमांक नमूद करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागीय मंडळात जमा करावी.
             डी. डी., चलन व विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयात दिनांक  2 जानेवारी 2017 पासून स्विकारण्यात येईल, असे सचिव, राज्य मंडळ पुणे यांनी कळविले आहे.
****




फेर गुण मोजणी करण्यासाठी दि. 19 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज करावेत


उस्मानाबाद,दि.4:- दि.28,29 व 30 मे 2016 रोजी घेण्यात आलेल्या जी.डी.सी. अन्ड ए.व सी.एच. एम. परीक्षेचा  निकाल  दि. 19 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.

हा निकाल दिनांक 30 डिसेंबर 2016 पासून www.mahasahakar.maharashtra.gov.in व https://gdca.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेr. फेर गुण मोजणी  करण्यासाठी     दि. 19 जानेवारी 2017 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत परीक्षार्थींनी आपला लॉग इन व पासवर्ड चा वापर करून अर्ज करावेत. फेर गुण मोजणी  करण्यासाठी  परीक्षार्थींनी प्रत्येक विषयासाठी रूपये 75 याप्रमाणे शुल्क भारतीय स्टेट बॅकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे भरावेत  .बॅंक चलन ऑनलाईन भरण्याची मुदत  दिनांक 19 जानेवारी 2017 रात्री 12.00 वाजेपर्यंत  राहील.चलन  भरण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2017 पर्यंत आहे, असे सचिव जी.डी.सी. ॲन्ड ए. बोर्ड तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे  यांनी  कळविले आहे.****