Thursday, 2 May 2019

समस्त उस्मानाबादकरांना मुक्या गोकुळची मूक साद तुम्हीही या अन् सामील व्हा! उद्याच्या पाणीदार भविष्यासाठी!


विशेष लेख 2                                                       दि.2 मे 2019
     
समस्त उस्मानाबादकरांना
मुक्या गोकुळची मूक साद
तुम्हीही या अन् सामील व्हा!
उद्याच्या पाणीदार भविष्यासाठी!
वॉटर हिरो - गोकुळ दादा भोंग
वय- १२ वर्ष
गाव-वलगुड ता.जि.उस्मानाबाद
.... त्याला ऐकू येत नाही.. बोलताही येत नाही. तरीही हा अवघ्या12 वर्षांचा पठ्ठया 7 एप्रिल  पासून म्हणजे वॉटरकप स्पर्धेच्या अगदी पहिल्या मिनिटापासून वलगुड गावात सुरू असलेल्या श्रमदानात अगदी ओतप्रोत भरलेल्या उत्साहाने सहभागी झाला आहे.  नित्यनियमाने रोज न चुकता सर्वांच्या आधी श्रमदानाला हजर असतो.
     आज अशी बरीच गावे आहेत की,पावसाळ्यात सुद्धा टँकर सुरू असतो.आम्हाला सर्व काही कळतं,ऐकू येतं,बोलता येतं,पण तरीही आज आमची काम करण्याची इच्छा नाही.आम्हाला काम करावसं वाटत नाही. पण या लेकराला नेमकं काय कळलं असेल, त्यानं नेमकं काय पाहिलं असेल, ती कोणती प्रेरणा आहे जी त्याला बसू देत नाही? त्याला ऐकू येत नाही, बोलताही येत नाही...तरीही तो काय बघून स्पर्धेत सहभागी झालायं?? आपल्यासारखी धडधाकट माणसं ज्यांच्याजवळ सर्व काही आहे तरी काम करायला तयार नाहीत.
मग खरे अपंग कोण? हा प्रश्न मन अस्वस्थ करतो. नक्कीच त्याला त्याच्या भविष्याची चाहूल लागलीयं.आज जर आपण काम केलं नाही तर उद्या आपलं भविष्य अंध:कारमय आहे, हे त्याला जाणवलंय.. म्हणूनच तो त्याचं भविष्य पाणीदार करण्याचा प्रयत्न करतोय...स्वत: श्रमदान करून...आणि तुम्हालाही मूक साद घालतोय की, “तुम्हीही या आणि सामील व्हा श्रमदानात... उद्याच्या पाणीदार भविष्यासाठी!”
खरंच अशा या ग्रेट व्यक्तिमत्त्वाला सलाम......मग तुम्ही कधी येतायं श्रमदानाला?.. लगेचचं येतायं ना?.. अरे व्वा ! तर मग स्वागत आहे आपलं ...Let's Do It!

‍मनोज शिवाजी सानप
                                                        जिल्हा माहिती अधिकारी,
                                                      उस्मानाबाद


नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता फाऊंडेशनचे काम समाजाला दिशादर्शक - सहआयुक्त विश्वास मुंडे


वृत्त क्र. 255                                                दि.2 मे 2019
         





नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या
एकता फाऊंडेशनचे काम समाजाला दिशादर्शक
                                                - सहआयुक्त विश्वास मुंडे
उस्मानाबाद,दि.2- समाजामध्ये जशा विविध संस्था सामाजिक काम करतात तसेच एकता फाऊंडेशन ही संस्थाही सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते, अशा प्रकारे नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता फाऊंडेशनचे काम समाजाला निश्चितच दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार औरंगाबाद आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आयोजित दिव्यांग स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मुलींच्या सत्कार समारंभात काढले.
          एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने स्व-आधार मतिमंद मुलींची शाळा येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आयोजित दिव्यांग स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मुलींचा सत्कार समारंभ  आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. रोहन कोचेटा, युवा उद्योजक अभय कोचेटा, प्रशांत बोराणा, स्व-आधार प्रकल्पाचे अध्यक्ष शहाजी चव्हाण,एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष अमित कदम व अभिमान हंगरगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
          ज्या मुली दिव्यांग असून सुध्दा आपल्या जिद्दीने नवनिर्मितीच्या गोष्टी शिकत आहेत ही बाब कौतुकास्पद असून अशा मुलींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही प्रतिपादन यावेळी सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी केले. दिव्यांग मुलींनी जे येत नाही ते अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करुन जिद्दीने उभे राहावे, असेही  ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन व स्वागतगीताने झाली.कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात एकता फाऊंडेशन चे सचिव अभिलाष लोमटे यांनी एकता फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली व समाजातील मान्यवरांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सूचना व मार्गदर्शन करावे, असे आवाहन  केली. दिव्यांग मुलींनी विविध गाण्यांवरील सादर केलेल्या नृत्यामुळे पाहुणे व उपस्थित मंञमुग्ध झाले. त्याचबरोबर एकता फाऊंडेशन च्या वतीने आंबा व अंजीर या वृक्षाचे संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करुन सामान्यांप्रमाणेच दिव्यांग, वंचित विशेष चिमुकल्यांनाही आंबे, चिकू व केळी खाण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, याकरिता या मुलींसाठी फळे खाण्याची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. पुरस्कारप्राप्त मुलींना एकता फाऊंडेशन च्या वतीने पदक व शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले.
          कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहाजी चव्हाण व सूत्रसंचालन रुपाली कांबळे        यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष विशाल थोरात, यशदा मल्टीस्टेट चे सीईओ प्रकाश गरड, पांडुरंग पवार, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, सह्याद्री प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, पंकजसिंह रजपूत, श्रीनिवास मुंडे, आकाश लोकरे, मनोज कदम, धनाजी वारे, शाम गवाड, युसुफ सय्यद, मुख्याध्यपक गुरुनाथ थोडसरे व सर्व शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती.
*****
वृत्त क्र.256                                                      दि.2 मे 2019

वलगुड गावातील महाश्रमदानात अप्पर जिल्हाधिकारी
पराग सोमण, माजी खा. डॉ.पदमसिंह पाटील यांनी घेतला हिरीरीने सहभाग
समस्त उस्मानाबादकरांनीही सहभागी होण्याचे आवाहन
उस्मानाबाद, दि.2- वलगुड गावात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदान आयोजित केले होते. या श्रमदान सोहळ्यात माजी खासदार डॉ.पदमसिंह पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्री.पराग सोमण, तहसिलदार विजयकुमार राऊत, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव,उमेद अभियान टीम, महिला आर्थिक विकास महामंडळाची टीम,आशा कार्यकर्त्या, विविध डॉक्टर्स, इतर तालुके व गावांमधून आलेले जलमित्र व समस्त वलगुड ग्रामस्थ या महाश्रमदान सोहळ्यात सहभागी झाले होते. हा महाश्रमदानाचा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
प्रशासन व पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध गावागावांमध्ये सुरु असलेल्या या श्रमदानामध्ये समस्त उस्मानाबादकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे आणि पाण्यासाठीचे आपले भविष्य सुधारण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थित सर्व मान्यवरांनी  केले.
*****

मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न



वृत्त.क्र.- 254                                                                          दि. 01 मे 2019 
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न
   
उस्मानाबाद,दि.01: येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त व कामगार  दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण   पालकमंत्री श्री.अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी त्यांनी उपस्थित  स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी,पत्रकार बांधव आणि नागरिकांना  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 
या सोहळ्यास माजी आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजा राम सामी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, , निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) संतोष राऊत,उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे,   सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसिलदार अभय म्हस्के,  स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागांचे कार्यालयप्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

***