वृत्त क्र. 255 दि.2 मे 2019
नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या
एकता फाऊंडेशनचे काम समाजाला दिशादर्शक
-
सहआयुक्त विश्वास मुंडे
उस्मानाबाद,दि.2-
समाजामध्ये जशा विविध संस्था सामाजिक काम करतात तसेच एकता फाऊंडेशन ही संस्थाही
सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते, अशा प्रकारे नावीन्यपूर्ण सामाजिक
उपक्रम राबविणाऱ्या एकता फाऊंडेशनचे काम समाजाला निश्चितच दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार
औरंगाबाद आयकर विभागाचे सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी
आयोजित दिव्यांग स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मुलींच्या सत्कार समारंभात काढले.
एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या
वतीने स्व-आधार मतिमंद मुलींची शाळा येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आयोजित
दिव्यांग स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मुलींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. रोहन कोचेटा, युवा उद्योजक अभय कोचेटा, प्रशांत बोराणा,
स्व-आधार प्रकल्पाचे अध्यक्ष शहाजी चव्हाण,एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष अमित कदम व
अभिमान हंगरगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्या मुली दिव्यांग असून सुध्दा आपल्या
जिद्दीने नवनिर्मितीच्या गोष्टी शिकत आहेत ही बाब कौतुकास्पद असून अशा मुलींना
मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही
प्रतिपादन यावेळी सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी केले. दिव्यांग मुलींनी जे येत
नाही ते अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करुन जिद्दीने उभे राहावे, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाची
सुरुवात वृक्षाला पाणी देऊन व स्वागतगीताने झाली.कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात
एकता फाऊंडेशन चे सचिव अभिलाष लोमटे यांनी एकता फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली
व समाजातील मान्यवरांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सूचना
व मार्गदर्शन करावे, असे आवाहन केली.
दिव्यांग मुलींनी विविध गाण्यांवरील सादर केलेल्या नृत्यामुळे पाहुणे व उपस्थित
मंञमुग्ध झाले. त्याचबरोबर एकता फाऊंडेशन च्या वतीने आंबा व अंजीर या वृक्षाचे
संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करुन सामान्यांप्रमाणेच दिव्यांग, वंचित विशेष
चिमुकल्यांनाही आंबे, चिकू व केळी खाण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, याकरिता या मुलींसाठी
फळे खाण्याची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. पुरस्कारप्राप्त मुलींना एकता फाऊंडेशन
च्या वतीने पदक व शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहाजी
चव्हाण व सूत्रसंचालन रुपाली कांबळे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष विशाल
थोरात, यशदा मल्टीस्टेट चे सीईओ प्रकाश गरड, पांडुरंग पवार, प्रसाद देशमुख, केदार
लगदिवे, सह्याद्री प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, पंकजसिंह रजपूत,
श्रीनिवास मुंडे, आकाश लोकरे, मनोज कदम, धनाजी वारे, शाम गवाड, युसुफ सय्यद,
मुख्याध्यपक गुरुनाथ थोडसरे व सर्व शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती.
*****
वृत्त क्र.256 दि.2
मे 2019
वलगुड गावातील महाश्रमदानात अप्पर
जिल्हाधिकारी
पराग सोमण, माजी खा. डॉ.पदमसिंह
पाटील यांनी घेतला हिरीरीने सहभाग
समस्त
उस्मानाबादकरांनीही सहभागी होण्याचे आवाहन
उस्मानाबाद, दि.2- वलगुड गावात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदान
आयोजित केले होते. या श्रमदान सोहळ्यात माजी खासदार डॉ.पदमसिंह पाटील, अप्पर
जिल्हाधिकारी श्री.पराग सोमण, तहसिलदार विजयकुमार राऊत, राज्य परिवहन महामंडळाचे
माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, पंचायत समिती
सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव,उमेद अभियान टीम, महिला आर्थिक विकास
महामंडळाची टीम,आशा कार्यकर्त्या, विविध डॉक्टर्स, इतर तालुके व गावांमधून आलेले
जलमित्र व समस्त वलगुड ग्रामस्थ या महाश्रमदान सोहळ्यात सहभागी झाले होते. हा महाश्रमदानाचा
सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
प्रशासन व पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध गावागावांमध्ये सुरु असलेल्या या श्रमदानामध्ये समस्त
उस्मानाबादकरांनी मोठया संख्येने सहभागी
व्हावे आणि पाण्यासाठीचे आपले भविष्य सुधारण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे
आवाहन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.
*****





