विशेष लेख 2
दि.2 मे 2019
समस्त उस्मानाबादकरांना
मुक्या गोकुळची मूक साद
तुम्हीही या अन् सामील व्हा!
उद्याच्या पाणीदार भविष्यासाठी!
वॉटर हिरो - गोकुळ दादा भोंग
वय- १२ वर्ष
गाव-वलगुड ता.जि.उस्मानाबाद
.... त्याला
ऐकू येत नाही.. बोलताही येत नाही. तरीही हा अवघ्या12 वर्षांचा पठ्ठया 7 एप्रिल पासून म्हणजे वॉटरकप स्पर्धेच्या अगदी
पहिल्या मिनिटापासून वलगुड गावात सुरू असलेल्या श्रमदानात अगदी ओतप्रोत भरलेल्या
उत्साहाने सहभागी झाला आहे. नित्यनियमाने
रोज न चुकता सर्वांच्या आधी श्रमदानाला हजर असतो.
आज अशी बरीच
गावे आहेत की,पावसाळ्यात सुद्धा टँकर सुरू असतो.आम्हाला सर्व काही कळतं,ऐकू
येतं,बोलता येतं,पण तरीही आज आमची काम करण्याची इच्छा नाही.आम्हाला काम करावसं
वाटत नाही. पण या लेकराला नेमकं काय कळलं असेल, त्यानं नेमकं काय पाहिलं असेल, ती
कोणती प्रेरणा आहे जी त्याला बसू देत नाही? त्याला ऐकू येत नाही, बोलताही येत
नाही...तरीही तो काय बघून स्पर्धेत सहभागी झालायं?? आपल्यासारखी धडधाकट माणसं
ज्यांच्याजवळ सर्व काही आहे तरी काम करायला तयार नाहीत.
मग खरे अपंग
कोण? हा प्रश्न मन अस्वस्थ करतो. नक्कीच त्याला त्याच्या भविष्याची चाहूल
लागलीयं.आज जर आपण काम केलं नाही तर उद्या आपलं भविष्य अंध:कारमय आहे, हे त्याला
जाणवलंय.. म्हणूनच तो त्याचं भविष्य पाणीदार करण्याचा प्रयत्न करतोय...स्वत:
श्रमदान करून...आणि तुम्हालाही मूक साद घालतोय की, “तुम्हीही या
आणि सामील व्हा श्रमदानात... उद्याच्या पाणीदार भविष्यासाठी!”
खरंच अशा या ग्रेट
व्यक्तिमत्त्वाला सलाम......मग तुम्ही कधी येतायं श्रमदानाला?.. लगेचचं येतायं
ना?.. अरे व्वा ! तर मग स्वागत आहे आपलं ...Let's Do It!
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
उस्मानाबाद
