Monday, 22 January 2018

कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेना लाभ घ्यावा



उस्मानाबाद, 22 :- राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकरी सभासदांनी शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन अर्ज सादर केले आहेत. परंतु बँकेने शासनाला सादर केलेल्या त्यांच्या माहितीशी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांची यादी शासनाने बँकेकडे पाठविलेली आहे ही यादी संबंधित शाखास्तरावर प्रसिध्द केली आहे.
          शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नाव अद्यापपर्यंत शासनाने कर्जमाफी मंजूर केलेल्या लाभार्थ्यांचे यादीमध्ये नाही, अशा शेतकरी सभासदांनी संबंधित बँकेचे शाखेशी त्वरीत संपर्क साधून बँकेने प्रसिध्दी केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्यास आवश्यक कागदपत्रासह योग्य माहिती बँकेच्या शाखेला सादर करावी ज्या आधारे बँकेला पुढील कार्यवाही करता येईल.
          कार्यवाही 8 दिवसाचे मुदतीत करणे आवश्यक असल्याने विनाविलंब ही पूर्तता करुन शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा.

          त्याचप्रमाणे 1 लाख पन्नास हजार पेक्षा जास्त कर्जबाकी असलेल्या ज्या शेतकऱ्यांना शासनाने रु. 1.50 लाखाची कर्जमाफी मंजूर केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडील उर्वरीत कर्जाचे रक्कमेचा भरणा करण्याबाबत बँकेने पत्राद्वारे कळविलेले आहेच, या शेतकऱ्यांनीदेखील त्यांच्याकडील उर्वरीत रक्कमेचा त्वरीत भरणा करुन शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. जगदाळे व जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांनी केले आहे. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विविध शासकीय योजनांचा मेळावा


उस्मानाबाद, 22 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्यामार्फत दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत उस्मानाबाद येथील बसस्थानक परिसरात विविध शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या आणि जनतेच्या कल्याणकारी विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा समावेश राहणार आहे.
तरी जास्तीत-जास्त जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर.आर. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. एस.बी. देसाई तसेच विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲङ निलेश बारखेडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
          या मेळाव्यात पशुसंवर्धन, कृषी विभाग, महिला व बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रोजगार हमी योजना, समाजकल्याण, सहाय्यक संचालक जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, डी.आय.सी., स्वच्छता मिशन, जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा पोलीस विभाग हे विभाग सहभागी होणार आहेत. 

Thursday, 18 January 2018

आपले पोलिस आपली अस्मिता लोकराज्य पोलिस विशेषांकाचे प्रकाशन




उस्मानाबाद,18, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोंहचवून, अल्पावधीतच लाखो वाचकांच्या -हदयातस्थान निर्माण करणा-या, शासनाचे मुखपत्र लोकराज्य आपले पोलिस आपली अस्मिता या पोलिस विशेषांकाचे प्रकाशन उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांच्या हस्ते बुधवारी, 18 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप, यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
          यावेळी  श्री देशमुख यांनी पोलिस विशेषांकाचे कौतुकही केले. यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले की, पोलिस विभागामार्फत करण्यात आलेल्या कामगिरीवर आधारीत जानेवारी 2018 चा लोकराज्यचा अंक हा दर्जेदार आणि वाचनीय आहे. तसेच लोकराज्यमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या अंकाचे नियमित वाचन केल्यास, याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी  व्यक्‍त केला. यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची 100 प्रतींची नोंदणीही पोलिस विशेषांकाच्या प्रकाशनावेळी केली.

शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचे वार्षीक सभासद होण्यासाठी तात्काळ जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळीस जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी केले.