Friday, 7 April 2017

विद्यार्थ्यांनी सवलतीचे गुण वाढीसाठी प्रस्ताव सादर करावेत

शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सवलतीचे गुण वाढीसाठी प्रस्ताव सादर करावेत
        उस्मानाबाद.दि.7:- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) मार्च 2017 करिता शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सवलतीचे गुण वाढीसाठी  संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या संस्थेच्या प्रमाणपत्रासह मुख्याध्यापकांकडे  दि.20 एप्रिल 2017 पर्यंत  विहित नमुन्यात  सादर करावेत,असे  लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव यांनी प्रसिध्दी  पत्रकाद्वारे  कळविले  आहे.
          शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र प्रमाणित करून कला प्रकाराच्या प्राविण्यानुसार अनुज्ञेय होणाऱ्या गुणांच्या शिफारशीसह संबंधित विभागीय मंडळाकडे शाळेच्या लेटरहेडवर प्रस्ताव सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांना  या प्रकारात गुण द्यावयाचे आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी, प्रमाणपत्र प्रमाणित  करून  शिफारसपत्र  व मान्यताप्राप्त  संस्थांची  यादी  त्यासोबत  सादर करावी.

          विद्यार्थ्यांनी दि. 20 एप्रिल 2017 पर्यंत तर शाळांनी दि. 30 एप्रिल 2017 पर्यंत विहित नमुन्यातील अर्जासोबत संबंधित  विभागीय  मंडळाकडे  प्रस्ताव  सादर  करावेत.

मुलींनो आपल्या हक्काबाबत जागरूक व्हा ! - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे




        उस्मानाबाद,दि.7:-जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यामध्ये  आपल्या जिल्हयाला यश मिळाले आहे, परंतु आता मुलींनो येथेच थांबून चालणार नाही,मुलींनो आपल्या हक्काबाबत जागरूक व्हा ! असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत  नारनवरे  यांनी  आज  येथे केले.
उमेद स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे 10  वी  12  वीच्या  मुलींकरिता स्पर्धा परिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद हे उपस्थित होते.
        डॉ.नारनवरे आपल्या मागदर्शनपर भाषणात  म्हणाले की, आपल्या बाळाचे  पालकत्व  स्वीकारणे  सोपे असते  मात्र  समाजाचे  पालकत्व स्वीकारणे ही बाब खूप मोठी आहे. समाजाचे  पालकत्व स्त्री-पुरूष  दोघांनीही स्वीकारल्यास  समाजाचा  विकास  झपाट्याने  होतो.
        उस्मानाबाद जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यात प्रशासनाला यश मिळाले,स्त्रीभ्रूण  हत्या  या  विषयावर  प्रशासनाने अंत्यंत  गांभीर्यांने कृतीपूर्ण निर्णय घेतले, ज्या समाजात महिलांचे प्रमाण कमी होते त्या समाजाची देशाची सामाजिक परिस्थिती धोक्यात येते, याकरिता सर्वांनी मिळून काम करायला हवे.आधी मुलींनी स्वत:ला मदत करायला शिकले  पाहिजे. तरच बाहेरचे तुम्हाला मदत करतील, संकटांना न घाबरता धैर्याने आयुष्याची वाटचाल करा,असे  सांगून  ते  पुढे म्हणाले की, माणूस म्हणून जगायला अधिकार कष्ट करून  मिळावा,आणि या उमेद स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामुळे ही क्षमता तुमच्यामध्ये निर्माण  होत  आहे  त्याचा  मला  निश्चित  अभिमान आहे.
        यावेळी डॉ.नारनवरे यांनी  या मुलींना स्पर्धा परिक्षेचे ध्येय कसे निश्चित करावे, ध्येय निश्चितीनंतर अभ्यास कसा करावा आणि यशस्वी झाल्यानंतरही पुढील वाटचाल कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.याबरोबरच त्यांनी विशाखा समिती तसेच मनोधैर्य योजना  याविषयीही उपस्थितांना माहिती दिली.
        यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित मुलींना आपण ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने अथक प्रयत्नांनी यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच उमेदने ग्रामीण भागातील मुलींना स्वाभिमानाने उभे राहायला प्रेरीत केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यंचे अभिनंदन केले व या मुलींनी पुढच्या पीढीसाठी सावित्रीबाई फुले व्हावे असे आवाहनही केले.
        शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त करताना मुख्य कार्यकारी  अधिकारी श्री. रायते यांनी “उमेदची” स्थापना कशी झाली,उमेदचे कार्य कसे चालते आणि भविष्यात उमेद जास्तीत जास्त मुलींसाठी उमेद निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी (निरंतर) श्री. कादर शेख यांनी केले. यावेळी पल्लवी शिंदे,भग्यश्री लोंढे या विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.

        या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (प्रा)सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (निरंतर)संजयकुमार राठोड, वरिष्ठ लेखाधिकारी रविद्र शिंदे, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) कादर शेख, स्वीय सहाय्यक अनिल केसकर,मिलींद प्रयाग, विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप,ग्रं थपाल श्रीमती आशा नवले,श्रीमती बिडवे, श्रीमती तब्बसम सय्यद, श्रीमती सोनवणे आणि 10 वी,12 वी, पदवी परिक्षेस  बसलेल्या  मुली  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Thursday, 6 April 2017

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग केले पाहिजे -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे




उस्मानाबाद,दि.6:-शेतकऱ्यांनी फक्त उत्पादक होवून न थांबता आपल्या शेतीमालाचे मार्केटिंग देखील केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे केले.
        कृषी व आत्मा विभाग यांच्या वतीने बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी मार्गदर्शक चर्चासत्राचे आयोजन  जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, एनसीडीइएक्स कंपनीचे श्री.राघवन व श्री. शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी पुढे बोलताना डॉ. नारनवरे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे,जमिनीचे संवर्धन करायचे असेल तर सुक्ष्मसिंचनाने शेतीसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे तसेच शेततळे करून त्याचा शेतीसाठी फायदा घ्यायला हवा, शेतबांधावर काही अंशी फळझाडे लावून उत्पन्न घ्यावे.
        अर्थ शास्त्रीय सिध्दांत सांगताना ते म्हणाले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित का कोलमडून पडते तर शेतकरी हा केवळ शेतीवरच अवलंबून आसतो  शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय जसे शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय केल्यास शेतकरी आर्थिक सक्षम होण्यास मदत होईल.त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसायिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे,त्यासाठी त्यांनी आपल्या शेतमालाचे प्रोसेसिंग,ब्रॅन्डींग व मार्केटिंग करून शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत स्वत:चा उदयोग तयार करावा, असे ही डॉ. नारनवरे यावेळी म्हणाले.
        यावेळी श्री. रायते म्हणाले की, मोठमोठया उदयोगात गुंतवणूक होते परंतु शेतीत गुंतवणूक होत नाही त्यामुळे शेतीचे चित्र बदलत नाही यासाठी शेतीत गुंतवणूक करून शेती आधारित प्रक्रिया उदयोग शेतकऱ्यांनी उभारावेत.
एन.सी.डी.इ.एक्स.टीमचे सदस्य तथा राम रहिम शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक श्री.राघवन यांनी शेती उत्पादन, प्रोसेसिंग, ब्रॅन्डींग व मार्केटिंग विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपनीचे मार्केटिंग व्यवसायाचे सादरीकरण यावेळी त्यांनी केले व  एन.सी.डी.इ.एक्स, मंढी.कॉम वेबसाईडवर वायदे बाजार, मार्केटिंगचे फायदे शेतमालाचे दर महिन्याचे भाव पाहण्यास मिळतील असे सांगितले.यावेळी योगेश शर्मा यांनी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यानी वायदे बाजारात उतरावे, असे आवाहन केले.

        यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, डॉ. अनिल भिकाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले यांनी केले. यावेळी जिल्हयातील शेतकरी गटांचे सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद, शेतकरी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.