Wednesday, 29 March 2017

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

   
उस्मानाबद,दि.29:-उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 2 एप्रिल  2017 रोजी राज्य सेवा  (पूर्व) परीक्षा -2017 सकाळी 10-30 ते 1-00 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत पुढील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे-
          श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज पहिला मजला, श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज दुसरा मजला, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, व्ही.जे.शिंदे कॉलेज, वरूडा रोड, उस्मानाबाद, विद्यामाता हायस्कुल, सांजा नाका, बायपास रोड,  उस्मानाबाद, जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला  शहर  पोलीस  शेजारी उस्मानाबाद.

          या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे,परीक्षार्थींना कसलाही अडथळा येऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद करणे, तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स,ई-मेल, रेडियो, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र व अशा इतर प्रकारच्या स्वरूपातील बाबी विद्यार्थांना पुरवठा करण्यात येवू नये म्हणून  या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दि. 2 एप्रिल  2017 रोजी सकाळी 8-00 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी फौजदारी पक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्यवये उक्त परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी


उस्मानाबाद,दि.29:- जिल्हयात सण, उत्सव शांततेत व सुरळीत पार पडण्याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणेसाठी जिल्ह्यात 28 मार्च 2017 ते  5 एप्रिल 2017 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.
          आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत, सभा घेता येणार नाहीत.

तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकिय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत मिरवणुकांना, सभांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 5 एप्रिल 2017 रोजीच्या  रात्री  दहा पर्यंत लागू राहतील.        

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत


          उस्मानाबाद,दि.29:- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी व संस्थांनी सन 2017-18 या वर्षाकरीता देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी दि.10 एप्रिल 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

           अनुसुचित जाती/ जमाती, भटक्याव विमुक्त जातीचे कल्याणकारी कार्य, तसेच शारिरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल, अपंग, कुष्ठरोगी आदी  सामाजिक दुर्बल घाटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, सामाजिक संस्था असावेत, सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावे. समाज भूषण पुरस्कारासाठी पुरूषाचे वय 50वर्ष व महिलांचे वय 40 वर्ष पुर्ण असावे. प्रस्तावासोबत सामाजिक कार्याची माहिती, स्वता:ची संपूर्ण माहिती, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, चालु वर्षाचे पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आदी माहितीसह प्रस्ताव तीन प्रती मध्ये सादर करावा. सदरील प्रस्ताव दि.10 एप्रिल 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय उस्मानााबाद येथे कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02472-2223133 वर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद  यांनी कळविले आहे.