Wednesday, 29 March 2017

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी


उस्मानाबाद,दि.29:- जिल्हयात सण, उत्सव शांततेत व सुरळीत पार पडण्याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणेसाठी जिल्ह्यात 28 मार्च 2017 ते  5 एप्रिल 2017 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी  यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.
          आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यतेस व नीतीमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाहीत, सभा घेता येणार नाहीत.

तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकिय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत मिरवणुकांना, सभांना परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 5 एप्रिल 2017 रोजीच्या  रात्री  दहा पर्यंत लागू राहतील.