Thursday, 30 March 2017

जिल्हयातील शेतकऱ्यांनी विंधन विहिरीची नोंद करून नव्या विंधन विहिरीकरीता प्रशासनाची परवानगी घ्यावी – आयुष प्रसाद



 उस्मानाबाद.दि.30:-जिल्हातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विंधन विहीर घेतली आहे त्यांनी त्याची सातबारा व नमुना नंबर 14 वर नोंद घ्यावी व नवीन विंधन विहिरीकरिता प्रशासनाची परवानगी घ्यावी, असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भूजल सर्वेक्षण उपविभाग स्तरीय अधिकारी कार्यशाळेत केले.
          पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे आयोजित महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 अंतर्गत उपविभागस्तरीय अधिकारी एकदिवशीय कार्यशाळेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात अध्यक्षस्थानावरून आयुष  प्रसाद बोलत होते. या कार्यक्रमास भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा औरंगाबाद, उपसंचालक कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जे.एस.बेडवाल, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप उपस्थित होते.
          या कार्यशाळेत बोलताना आयुष प्रसाद म्हणाले की, जिल्हयात भूजल पातळी वाढविण्यासाठी रिचार्जशॉफ्ट व नावीण्यपूर्ण योजना राबविण्यात येऊन सर्व प्रकारच्या भूजल वापरकर्त्यांना सातत्यपूर्ण भूजल उपलब्ध व्हावे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रेात संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून मागणी व पुरवठा आधारित उपाय योजना करून भूजल विकास व व्यवस्थापन लोकसहभागातून करावे.

          यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक बेडवाल यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. या कार्यक्रमास उस्मानाबादचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम.एस.शेख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री.पुजारी, उस्मानाबाद तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर.एस. भालेराव यांनी केले तर आभार सहाय्यक भूवैज्ञानिक प्रशांत पोळ यांनी मानले.