Wednesday, 11 January 2017

रस्त्यावरची गाडी चांगली चालवायला शिकलात तर आयुष्याची गाडी चांगली चालवाल ! जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे





उस्मानाबाद, दि.11:- मुले वयात यायला लागताच, आताच्या जीवन शैलीची गरज म्हणून  बहुतांश  लोकं  दोन चाकी , चार चाकी  वाहने खरेदी करतात. मात्र  आपल्या  मुलांच्या सवयींना, हट्टांना  आपणच  आवर घातला  पाहिजे,  सोळावं वरीस धोक्याचं असते, रस्त्यावरची गाडी चांगली चालवायला शिकलात तर आयुष्याची गाडी चांगली चालीवाल , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे केले. 28 वा रस्ता  सुरक्षा सप्ताह  व राज्य रस्ता  सुरक्षा  अभियान 2017 निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कूल  येथे आयोजित  जनजागृती कार्यक्रमात  ते बोलत होते .
यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, श्रीपतराव भोसले  हायस्कूलचे  संस्थापक  सरचिटणीस  के.टी. पाटील, अतिरिक्त  पोलीस  अधीक्षक डॉ. दिपाली घाटगे,  एस.टी. महामंडळाचे  विभागीय  नियंत्रक  राजीव साळवे  हे उपस्थित होते . 
डॉ. नारनवरे म्हणाले की , नियम सर्वसामान्यांच्या  हितासाठी  असतात, नागरिकांनी याची जाणीव  ठेवावी व  समजून घ्यावे , अति आत्मविश्वास  नडतो  , आपलेच नुकसान होते , सन्मानाने जगण्यासाठी नियमांचे पालन व अभ्यास हा मार्ग अवलंबिला पाहिजे . आपल्या चुकीमुळे  आपण इतरांच्या जीवाला  धोका निर्माण करु नये.तसेच आपण फक्त हेल्मेट/रस्ता सुरक्षा पुरतीच मर्यादित न राहता  चांगला  नागरिक  म्हणून  जगता आले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे मूल्य, शिक्षण  कशासाठी  हे शिकवावे,  शिक्षण घेण्याच्या संधीने आपल्या व  इतरांच्या  आयुष्याचे  सोने करावे . असेही डॉ. नारनवरे यांनी उपस्थितांना सांगितले. भारत  2025 पर्यंत  सर्वात तरुण राष्ट्र  असणार आहे व याचे आपण महत्वाचा भाग असणार आहात.जे 16 वर्षांखालील मुले  गाडी चालविताना  सापडतील  त्यांच्या  पालकांना बोलावून समज द्यावी,असे डॉ. नारनवरे यांनी वाहतूक शाखेस आवाहन केले.
यावेळी मनोगत  व्यक्त करताना  नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर  म्हणाले की , वाहतुकीची शिस्त पाळणे आवश्यक आहे,16 वर्षांखालील विद्यार्थ्यांनी कोणतेही वाहन चालवू नये,हॉर्न न वाजविण्याबाबत  विद्यार्थ्यांनी  त्यांच्या पालकांना सांगावे , तसेच  वाहन चालविताना  जीवघेणी  स्पर्धा करु नये. 
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते“सुरक्षित  ड्रायव्हिंग मार्गदर्शिका” या पुस्तिकेचे  प्रकाशनही करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते  यांनी आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात  वाहतुकीची शिस्त,  हॉर्न वाजविणे , नियमांच्या  पालनाबाबतची  जनतेची  उदासीनता इत्यादी गोष्टींबाबत  खंत व्यक्त केली व  वाहतुकीच्या नियमांचे  सर्वांनी  पालन  करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या  पीढीला  रस्ते सुरक्षा नियमांचे, भविष्यातील सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याविषयी  माहिती देणारा हा उपक्रम स्तुत्य तर आहेच मात्र आवश्यकही आहे.  नियमांचे  पालन सर्वांनीच  करणे स्वत:साठी , कुटुंबासाठी  गरजेचे आहे.  लहानपणापासूनच  मुलांना या विषयाची जागृती  आवश्यक आहे. 
यानंतर प्रशासकीय अधिकारी एन.एम. हाजगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले . तसेच एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक  राजीव साळवे यांनी विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळाच्या सोयी सुविधा आणि राबविण्यात येणारे उपक्रम यांविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक  महेश पाटील  यांच्या सुमधूर  आवाजातील  स्वागतगीताने झाली.यावेळी  काव्यदूत संजय आंधळे यांची  “रोडपेक्षा घातक … घोडदौड …” ही कविता इयत्ता  12 वी  मधील विद्यार्थीनी  नम्रता साळुंके हिने उपस्थितांसमोर सादर केली.
या कार्यक्रमास उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी  विलास कांबळे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप , सहायक पोलीस निरीक्षक  शहर वाहतुक शाखा प्रशांत पाटील , श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य सुधीर पडवळ आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  सहशिक्षक  सूर्यकांत पाटील यांनी केले . तर प्रस्तावना  उप प्रादेशिक  परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले .
****


पत्रकार दिन

Tuesday, 10 January 2017

पत्रकार दिनानिमित्त तसेच “बळीराजा चेतना अभियानांतर्गत”




शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा पत्नींचा पत्रकार आणि शासकीय अधिकारी यांच्याशी सुसंवाद तसेच आरोग्य शिबिर संपन्न
उस्मानाबाद, दि.10:- काम करताना शिस्त ही महत्वाची बाब आहे . आपण ज्या संस्थेसाठी काम करतो तेथे अतिउत्कृष्ट पध्दतीने काम केले पाहिजे जेणेकरुन आपण त्या संस्थेची संपत्ती बनलो पाहिजे. शासकीय योजना या  सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी प्रत्येक शासकीय विभाग अहोरात्र कार्यरत असते, त्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने  कोणाला प्रेमाने सांगून,काहींना नियम दाखवून तर काहींना रागावून या  योजनांवर अंमलबजावणी  करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, असे  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  आज जिल्हा‍ नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन केले .
दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.
यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नींना शासकीय योजनांची  माहिती व्हावी या हेतूने या महिलांचा जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुख तसेच पत्रकारांसोबत सुसंवाद आणि या सुसंवादानंतर उपस्थित सर्वांची आरोग्य तपासणी हे उपक्रम जिल्हा नियोजन सभागृह,मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत येथे राबविण्यात आले .
प्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . प्रास्ताविकामध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी पत्रकार दिनाचे  व या  कार्यक्रमाचे महत्व उपस्थितांना सांगितले .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे,उप जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर,श्रीअरविंद लाटकर,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. कोंडेकर, श्री. रुकमे ,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  श्री. शिरीष जमदाडे , जिल्हा कोषागार अधिकारी  श्री. विशाल पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  श्री. कांबळे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, नेहरू  युवा केंद्राचे लेखाधिकारी श्री. विकास कुलकर्णी, उप शिक्षणाधिकारी (प्राथ)श्रीमती रोहिणी कुंभार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री.सोमनाथ लामगुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, डॉ. देशपांडे, वन विभागाचे (आरएफओ) श्री. म्हेत्रे , श्री.सावळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. विनायक कोठारी आदी तसेच जिल्ह्यातील पत्रकार आणि सेव्ह फार्मर्स विडोज या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिला उंबरे, संयोजिका महानंदा पहलवान आणि  जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व वारस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
            या उपक्रमांतर्गत उपस्थित सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची लोकोपयोगी योजनांची माहिती उपस्थितांना विस्तृत सादरीकरणाद्वारे दाखविली.यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी आणि इतर महिलांनी या अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून  विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली .
            यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात 111 जणांची बी.पी.,मधुमेह तपासणी,11जणांची एचआयव्ही तपासणी, 2 जणांची ईसीजी तर 5 जणांचे डोळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, अधिपारिचारिका श्रीमती कविता चाकाटे , श्रीमती नानेकर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्री. सचदेव शिरसाठ, श्री. लक्ष्मीकांत मुंडे, समुपदेशक श्री.सुधीर कावळे यांनी तपासले .
            यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने  उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री, आशिष लगाडे  तर आभार  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी मानले .

****