Thursday, 8 December 2016

सास्तूर येथील निवासी शाळेला जिल्हास्तरीय अठरा सुवर्णपदके दिव्यांग 750 विद्यार्थ्यांचा सहभाग



उस्मानाबाद,दि.8:-दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उस्मानाबादमधील सर्वच शाळांनी संमिश्र यश मिळविले. या स्पर्धेत एकूण 750 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अस्थिव्यंग प्रर्वगातून लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी शाळेने सर्वाधिक 18 सूवर्ण, 13 रौप्य व 16 कांस्यपदकांसह एकूण 47 पदकांसहित एकूण 161 गुणांची कमाई केली.

शहरातील तुळजाभवानी स्टेडीयमवर नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या.मूकबधीर प्रवर्गातून कळंब येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाने नऊ रौप्य व आठ कांस्यपदकांसह एकूण 17 पदकांसह 88 गुण मिळविले. तसेच मतिमंद प्रर्वगातून उस्मानाबाद तालुक्यातील स्वआधार मतिमंद मुलींच्या अनाथ बालगृहाने 18 सूवर्ण 11 रौप्य,11 कांस्य अशा एकूण 40 पदकांसह 145 गुणांची कमाई केली.
       
याशिवाय दिव्यांगांच्या सांस्कृतिक स्पर्धाही घेण्यात आल्या. यात देशभक्तीपर गीते, लोकगीते, भारुड, गवळणी  सादर  करुन  विद्यार्थ्यांनी  उपस्थितांची  दाद मिळविली. सर्व स्पर्धांत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जिल्‍हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा समाज कल्याण  सभापती  हरीश डावरे,समाज कल्याण अधिकारी  एस. के. मिनगिरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वभर शिंगणवाड, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के नवले आदींनी आकाशात फुगे सोडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या वेळी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयुर काकडे, ॲड. भानुदास कलवले आदी उपस्थित होते.


भारत सरवदे  पाटील, चंद्रकांत जाधव, शहाजी चव्हाण, रसिक कोतवाल, प्रताप भायगुडे, बालाजी शिंदे, जुनेद शेरीकर, दादासाहेब जगताप, सुभाष शिंदे, बालाजी लोमटे, नेताजी  सिरसाट आदीनी  कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  प्रयत्न  केले.

Wednesday, 7 December 2016

संघटित /असंघटित कामगारांचे बँक खाते उघडण्यासाठी विशेष मोहीम संपन्न





उस्मानाबाद,दि.7:-  जिल्हा प्रशासनाकडून  संघटित / असंघटित  कामगार  वर्गाचे  बँकेत  खाते  उघडण्यात विशेष मोहीम काल दिनांक 6 डिसेंबर रोजी  नगरपालिकेच्या नाट्यगृहात संपन्न झाली.
यावेळी स्टेट बँक  ऑफ इंडियाकडे एकूण 267 जणांनी अर्ज केले . त्यातील प्रत्यक्ष  125 जणांनी खाते  उघडले .  स्टेट बँक  ऑफ  हैद्राबादकडे  एकूण 145 जणांची अर्ज केले  त्यातील  प्रत्यक्ष  110 जणांची खाती उघडण्यात  आली . अशाच प्रकारे  स्टेट बँक  ऑफ अलाहाबादकडे  32 अर्ज   प्राप्त झाले  त्यापैकी 32  जणांचे  खाते उघडले गेले .  बँक ऑफ इंडियात 111  जणांची खाते उघडले ,  बँक ऑफ  महाराष्ट्रमध्ये  20 तर  पंजाब नॅशनल  बँकेत 20 जणांची खाती उघडली .  अशाप्रकारे  एकूण  595 अर्जांपैकी  418 जणांची  खाती उघडली गेली आणि  177 जणांच्या  अर्जांबाबत  आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे .
या सर्व मोहिमेत  अति. जिल्हाधिकारी अविनाश पाठक , निवासी उप जिल्हाधिकारी  सुनील यादव  नगरपालिकेचे मुख्याधिकारी महारुद्र गोलक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक धनंजय दामले , स्टेट बँक ऑफ इंडियाचे  सहायक व्यवस्थापक पद्माकर  चांदणे , स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे व्यवस्थापक श्री. कळमनुरीकर,  श्री. जोशी , बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक जसबीर सिंग , महेश घाटे , बँक ऑफ अलाहाबादचे व्यवस्थापक  श्री. कलाटगी , बँक ऑफ महाराष्ट्राचे श्री. ए.एन. कोगनुर, पंजाब नॅशनल बँकेचे  व्यवस्थापक  श्री. सुनिल  खकाळे  यांनी उत्कृष्ट  काम केले.  यावेळी  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांची  या कामाची पाहणी केली, उपस्थितांशी चर्चा केली आणि त्यांना  बँकेत खाते उघडण्याबाबत मार्गदर्शन केले. 

सर्वांनी मिळून कॅशलेस म्हणजेच ऑनलाईन व्यवहाराकडे वळावे -जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे





               उस्मानाबाद,दि.7:- मानवी आर्थिक व्यवहाराच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून  आर्थिक व्यवहारात बळकटी व सुलभता निर्माण होण्यासाठी जिल्ह्यातील  सर्वच नागरिकांनी  कॅशलेस व्यवहाराकडे   वळावे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी “कॅशलेस व्यवहार प्रशिक्षण” कार्यक्रमात केले.
            जिल्हा प्रशासन , नगरपरिषद उस्मानाबाद व जिल्हा अग्रणी बँक , भारतीय स्टेट बँक उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नियोजन समिती सभागृहात आयोजित कॅशलेस व्यवहाराकडे चला या कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी अति. जिल्हाधिकारी अविनाश पाठक , जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार , निवासी उप जिल्हाधिकारी सुनील यादव , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, विविध बँकांचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते .
           यावेळी मार्गदर्शन  करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की , केंद्र शासनाच्या या  निर्णयाच्या आधारावर नोटाविरहीत व्यवहाराची हाताळणी व्हावी , रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना   हे प्रशिक्षण दिले जात आहे . यावेळी त्यांनी रुपयाचे चलनाचे महत्व उपस्थितांना सांगून   या कॅशलेस व्यवहारामुळे आर्थिक मानवी  आर्थिक व्यवहाराच्या  नव्या  पर्वाला  सुरुवात होत आहे.  याकरिता  आर्थिक संस्था बळकट व्हायला हव्यात असे मत व्यक्त केले.  ही आर्थिक व्यवस्था , त्यातील विविध प्रणालीचा वापर करताना  त्याविषयीची पूर्ण माहिती करुन घेणेही  महत्वाचे आहे , त्यातील धोके लक्षात घेऊन त्यावरील उपाय योजनाही समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . 
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक डी.डी. दामले , श्री. मिलिंद सावंत , महेश पाटीदार ,  नाबार्डचे विजय कोठारी ,  बँक ऑफ इंडियाचे  महेश गुट्टे , स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे सहायक व्यवस्थापक पंकज पांगरकर आदी बँकेचे अधिकारी उपस्थित होते . त्यांनी बँकांच्या ऑनलाईन  सोयीसुविधा विविध ॲप यांच्या माहितीचे सादरीकरण केले . कॅशलेस व्यवहारासाठी मोबाईल ॲप, प्रिपेड कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट यासारख्या सुविधांबरोबर अविस्तृत पुरक सेवा माहिती (USSD) या प्रणालीद्वारे कोणत्याही मोबाईल फोनच्या इंटरफेसमधून इंटरनेटशिवाय पैसे पाठविणे शक्य आहे. या सर्व सुविधांच्या महत्वाबाबत लहान व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून बाजार समित्या, आठवडी बाजार, मोठी आस्थापना, कार्यालय, बँका, मोंढा आदी ठिकाणी प्रशिक्षण वर्ग हाती घेण्यात आले आहे. 
            प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी प्रशिक्षणाची रुपरेषा विशद केली आणि शेवटी  उपस्थितांचे  आभार मानले.