Wednesday, 7 December 2016

सर्वांनी मिळून कॅशलेस म्हणजेच ऑनलाईन व्यवहाराकडे वळावे -जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे





               उस्मानाबाद,दि.7:- मानवी आर्थिक व्यवहाराच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून  आर्थिक व्यवहारात बळकटी व सुलभता निर्माण होण्यासाठी जिल्ह्यातील  सर्वच नागरिकांनी  कॅशलेस व्यवहाराकडे   वळावे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कॅशलेस व्यवहार प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
            जिल्हा प्रशासन , नगरपरिषद उस्मानाबाद व जिल्हा अग्रणी बँक , भारतीय स्टेट बँक उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नियोजन समिती सभागृहात आयोजित कॅशलेस व्यवहाराकडे चला या कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी अति. जिल्हाधिकारी अविनाश पाठक , जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार , निवासी उप जिल्हाधिकारी सुनील यादव , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, विविध बँकांचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते .
           यावेळी मार्गदर्शन  करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की , केंद्र शासनाच्या या  निर्णयाच्या आधारावर नोटाविरहीत व्यवहाराची हाताळणी व्हावी , रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना   हे प्रशिक्षण दिले जात आहे . यावेळी त्यांनी रुपयाचे चलनाचे महत्व उपस्थितांना सांगून   या कॅशलेस व्यवहारामुळे आर्थिक मानवी  आर्थिक व्यवहाराच्या  नव्या  पर्वाला  सुरुवात होत आहे.  याकरिता  आर्थिक संस्था बळकट व्हायला हव्यात असे मत व्यक्त केले.  ही आर्थिक व्यवस्था , त्यातील विविध प्रणालीचा वापर करताना  त्याविषयीची पूर्ण माहिती करुन घेणेही  महत्वाचे आहे , त्यातील धोके लक्षात घेऊन त्यावरील उपाय योजनाही समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . 
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक डी.डी. दामले , श्री. मिलिंद सावंत , महेश पाटीदार ,  नाबार्डचे विजय कोठारी ,  बँक ऑफ इंडियाचे  महेश गुट्टे , स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे सहायक व्यवस्थापक पंकज पांगरकर आदी बँकेचे अधिकारी उपस्थित होते . त्यांनी बँकांच्या ऑनलाईन  सोयीसुविधा विविध ॲप यांच्या माहितीचे सादरीकरण केले . कॅशलेस व्यवहारासाठी मोबाईल ॲप, प्रिपेड कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट यासारख्या सुविधांबरोबर अविस्तृत पुरक सेवा माहिती (USSD) या प्रणालीद्वारे कोणत्याही मोबाईल फोनच्या इंटरफेसमधून इंटरनेटशिवाय पैसे पाठविणे शक्य आहे. या सर्व सुविधांच्या महत्वाबाबत लहान व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून बाजार समित्या, आठवडी बाजार, मोठी आस्थापना, कार्यालय, बँका, मोंढा आदी ठिकाणी प्रशिक्षण वर्ग हाती घेण्यात आले आहे. 
            प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी प्रशिक्षणाची रुपरेषा विशद केली आणि शेवटी  उपस्थितांचे  आभार मानले.