Friday, 9 December 2016

“ऑपरेशन सेंट्रल बिल्डिंग”


दिनांक 9 डिसेंबर 2016.. दुपारी 1.00 वाजण्याची वेळ .. मी माझ्या मैत्रिणीसोबत चहा घ्यायला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर पडलेली .. चहाचा पहिला घोट घेत होती..तोच धावा धावा , मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू दिसत आहे,  सर्वांनी आपआपल्या कार्यालयातून लवकर खाली या.. असे शब्द माझ्या कानी पडले .. मी चहाचा कप खाली ठेवून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकडे धाव घेतली. तोपर्यंत इमारतीमधील काही अधिकारी -कर्मचारी प्रशासकीय इमारतीच्या परिसरात गर्दी करुन उभे होते , काहीजण धावत पळत पायऱ्यांवरून खाली येत होते.
            इतक्यात अग्निशामक दलाच्या गाडीच्या सायरनचा आवाजही कानी पडला .. मी त्या गर्दीमध्ये घुसून एका कर्मचाऱ्यास विचारले काय झाले .. त्यांनी सांगितले प्रशासकीय इमारतीमध्ये बॉम्बसारखी वस्तू दिसत आहे . हे ऐकून मी खूपच घाबरुन गेली व माझे अधिकारी -कर्मचारी कार्यालयात आहेत की ते खाली आले आहेत हे पाहण्यासाठी मी माझ्या मोबाईलवरुन  कार्यालयातील श्री. वाठोरे यांना कॉल केला आणि सांगितले की, प्रशासकीय इमारत परिसरात बॉम्ब ठेवलेला आहे चटकन सर्वजण  खाली या..
            तेवढ्यात पोलीस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत पाटील , श्री.एम.ए. सय्यद हे घटनास्थळी घेवून धडकले आणि  उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणखीनच बदलून गेले.  नंतर 108 क्रमांकाची जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका डॉ. महेश घोळवे आणि वाहनचालक श्री. शहाजी इंगळे यांच्या समवेत प्रशासकीय इमारत परिसरात दाखल झाली  . विद्युत विभागाचे सहायक अभियंता           श्री. रत्नदीप  कटके व लाईनमनही आले .  त्यानंतर  बॉम्बशोधक पथकही येऊन धडकले आणि  हे सर्व दृश्य  पाहून माझ्या ह्रदयाची स्पंदनेच वाढली ..   आता काय होणार , ती वस्तू खरच बॉम्ब असेल तर , तिचा स्फोट झाला तर  … इत्यादी प्रश्नांनी माझ्या मनात काहूर माजवले होते. मला 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई येथील ताज हॉटेलवर झालेल्या  बॉम्ब हल्ल्याची घटना आठवली . मी सध्या कार्यालयीन वेळ संपल्यानंतर  रिकाम्या वेळेत लेखक अतुल कुलकर्णी यांचे 26-11, ऑपरेशन मुंबई हे मुंबईवर झालेल्या  बॉम्ब हल्ल्याची माहिती सांगणारे पुस्तक वाचत आहे.  काही काळ ही परि‍स्थिती अशीच राहिली असती तर कदाचित माझा बी.पी.च वाढला असता …
            पण जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप व माझे इतर सहकारी दिसल्याने  मला थोडासा धीर वाटला .
 तेवढ्यात  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे दिसल्या व त्यांनी बोलायला सुरुवात केली. तेलोरे मॅडम म्हणाल्या की, थांबा , शांत राहा,घाबरुन जाऊ नका.. गडबड गोंधळ करु नका…  आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मॉक ड्रिल घेतले जात आहे. दिनांक 1 ते 9 डिसेंबर दरम्यान आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त पूर्ण जिल्ह्यामध्ये  अशा प्रकारे मॉक ड्रिल्स घेण्यात येत आहेत . आज या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. जेणेकरुन  एखादी आपत्ती घडल्याबरोबर गोंधळून न जाता त्या आपत्तीवर कशी मात करायची याबाबत  जनतेमध्ये जनजागृती व्हावी  व असे प्रात्यक्षिक पाहिल्याने ऐनवळी काय उपाय योजना कराव्यात हे समजावे या हेतूने हे मॉक ड्रिल घेण्यात आले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की , आपत्ती ही कोणास सांगून किंवा ठरवून येत नाही . ती अचानक घडलेली  किंवा घडवून आणलेली आपत्ती असते . याला आपण सर्वांनी धैर्याने सामोरे जावून या काळात प्रत्येक क्षणोक्षणीचा विचार करुन आपल्या परिसरात व आजूबाजूस अशी आपत्ती येऊ नये अशी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.  जिल्हाभरात कोणतेही कार्यालय असू किंवा  रहदारीचे ठिकाण असो या ठिकाणी  जर आपणास अनोळखी  किंवा संशयास्पद वस्तू आढळून आल्यास त्याची माहिती नजिकच्या पोलीस यंत्रणेस , अग्निशमन विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास कळविल्यास येणारी आपत्ती दूर होण्यास मदत होईल .
 सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले की , अशी आपत्ती आपल्या घरी किंवा अवतीभोवतीच्या परिसरात घडल्यास त्याबाबत आपण कसे सुरक्षित राहू आणि  आपल्यासोबत असणारे इतर सहकारी किंवा कुटुंबीय हे कसे सुरक्षित  राहतील याबाबत पर्याय शोधावेत आणि तात्काळ जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क साधावा म्हणजे आपत्ती टळू शकेल  किंवा घडलेली आपत्ती तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत होईल व इतरांनाही याबाबत जागरुक राहण्याचे धडे मिळतील.
प्रशासकीय इमारतीमध्ये बॉम्ब असल्याची घटना ही फक्त मॉक ड्रिल असल्याचे कळल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना  त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले.  त्यावेळी उप जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयातील कर्मचारी श्री. डी.एस.पवार म्हणाले की ,  आपत्ती ही कोणास सांगून येत नाही  त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्वांना देण्यात यावे. यावेळी उपस्थित एका  महिला कर्मचाऱ्याने सांगितले की,गोंधळ ऐकून मी कार्यालयातून खाली आली होती . इमारत परिसरात बॉम्ब असल्याची गोष्ट ऐकून मी धावत पळत वरच्या मजल्यावर माझ्या कार्यालयात जाऊन  माझ्या कार्यालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना  याबाबत अवगत केले आणि  कार्यालयातील माझे सर्व सहकारी धावत पळत कार्यालयातून बाहेर पडले .
या महिला कर्मचाऱ्याने परिस्थितीचे भान लक्षात घेऊन जी तत्परता  व समयसूचकता दाखवली ती अतिशय कौतुकास्पद होती. याबाबत सर्व उपस्थितांनी त्यांचे  टाळ्या वाजवून  अभिनंदन केले .
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक श्री. योगेश परदेशी यांनी यावेळी तो  लपवून ठेवलेला बॉम्ब सर्वांसमोर आणला  आणि बॉम्बशोधक पथकाच्या महिला पोलीस शिपाई श्रीमती मोक्षदा गर्जे यांनी एचएचएमडी च्या सहाय्याने  बॉम्ब कसा निकामी करायचा याचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखविले .
बॉम्बशोधक पथकात  महिला असल्याचे पाहून स्त्रिया या फक्त चूल आणि मूल या चौकटीत न राहता त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्यास खांद्या लावून  पूर्ण ताकदीनिशी काम करताना दिसत आहेत . ही  आपल्या पुरुष प्रधान समाजासाठी खूप अभिमानाची  गोष्ट आहे.  माझ्यासह उपस्थित सर्वांनाच या महिलांचा खूप अभिमान वाटला.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे यांनी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने या मॉक ड्रिलसाठी  उपस्थित सर्व अधिकारी -कर्मचारी , विविध यंत्रणांचे आभार मानले .
आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला. कार्यालयात आल्यानंतर सानप साहेबांनी मला सांगितले की, तुम्ही आम्हाला  या घटनेबाबत  अलर्ट केले…  तुमचे धन्यवाद.. आणि तुम्ही पूर्ण परिस्थिती सुरुवातीपासून पाहिली -अनुभवली आहे . त्यामुळे तुम्हीच यावर फर्स्ट पर्सन लिहा….यातूनच हा लेख लिहिला… माझ्या आयुष्यातील अशाप्रकारचे पहिले लिखाण…!
                                                                        --आशा बंडगर
                                                                        सर्वसाधारण सहायक तथा
माहिती सहायक (अ.का.)           

जिल्हा माहिती कार्यालय ,उस्मानाबाद