Tuesday, 6 December 2016

जिल्ह्यात आता स्मार्ट ग्राम योजना

  
            उस्मानाबाद,दि.6:- राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याकरीता पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्य:स्थितीतील स्वरुपात व निकषात बदल करुन या योजनेचे रुपांतर करुन "स्मार्ट ग्राम" योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत तालुका व जिल्हास्तरावरील गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत, तरी जिल्हयातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत विभाग) श्री. अजिंक्य  पवार  यांनी  केले आहे.
                  या योजनेत मोठया ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, उर्वरीत ग्रामपंचायती अशी विभागणी केली जाणार आहे. पर्यावरण  संतुलित  योजनेचे रुपांतर या योजनेत करण्यात आले आहे. योजनेचे निकषही बदलण्यात आले आहेत. योजनेच्या प्रथमस्तरावर ग्रामपंचायतींनी स्वयंमुल्यांकन करुन त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयात सादर करायचे आहेत, त्यानंतर  तालुकास्तरावर  समितीकडून या गावांची तपासणी होणार आहे. तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायत द्वितीय स्पर्धेकरीता पात्र राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती या ग्रामपंचायतची तपासणी करणार आहे. त्यानंतर प्रथम स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना दहा लाख रुपये बक्षीस दिले जाईल, द्वितीय स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींना  40 लाखाचे बक्षीस मिळणार आहे. प्रथम स्तरावर तालुका स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना प्रजासत्ताक दिनी व  द्वितीय स्तरावर जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित ग्रामपंचायतींना  महाराष्ट्र  दिनी  बक्षीस  वितरण  करण्यात  येईल, तरी जिल्हयातील जास्तीत जास्त गावांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Monday, 5 December 2016

कॅशलेस व्यवहारासाठी शिबिराचे आयोजन


उस्मानाबाद.दि.5:-विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या आधारावर रोखरहित (कॅशलेश) व्यवहाराची हाताळणी व्हावी, रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून खालीलप्रमाणे डीपीडीसी सभागृह,उस्मानाबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
          बुधवार दि.7 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व शासकीय अधिकारी,  गुरूवार दि. 8 डिसेंबर 2016 रोजी सकाळी  11.00 वाजता सर्व डॉक्टर्स  व औषध व्यापारी, सर्व मोठे किराणा व भुसार व्यापारी,  शुक्रवार दि. 9 डिसेंबर 2016 रोजी सकाळी  1.001 वाजता सर्व धान्य दुकानदार,  एलपीजी पुरवठादार,  दुपारी 1.00 वाजता सर्व हॉटेल व्यवसायिक,  दुपारी 4.00 वाजता सर्व  पुरवठादार, दुधवाले, रिक्शावाले, धोबी, इस्त्रीवाले, हेअर सलून इत्यादीना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (कॅशलेस) व्यवहार कसे करावेत यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी या शिबिरात मार्गदर्शन करणार असल्याने उक्त तारखेस समाजातील सर्व संबंधित घटकांनी या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार, उस्मानाबाद यांनी केले आहे.   

लोकशाही दिनाच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करावे


            उस्मानाबाद,दि.5:-लोकशाही दिनानिमित्त प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करुन  तक्रारदारास त्वरीत निर्णय द्यावा ,  अशा स्पष्ट सूचना  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  देवून काही तक्रारींचे निराकरणही केले .
            आज लोकशाही दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  लोकशाही दिन कार्यक्रमास  निवास उप जिल्हाधिकारी सुनिल यादव , सामान्य प्रशासन  विभागाचे उप जिल्हाधिकारी सचिन बारवकर ,  जिल्हाधिकारी कार्यालयातील उप जिल्हाधिकारी , तहसिलदार , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  व पोलीस विभागाचे अधिकारी  व इतर विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते .
            या लोकशाही दिनात जिल्हा भरातून आलेल्या तक्रारदारांनी  आपल्या तक्रारी  जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्या असता  जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी  संबंधितांच्या तक्रारींची दखल घेवून प्रत्यक्ष तक्रारदारांशी चर्चा करुन  संबंधित विभागांना  तक्रार निवारणासाठी  सूचना दिल्या .