Thursday, 24 November 2016

प्रत्येक गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे


          उस्मानाबाद,दि.24:-  जिल्ह्यात  जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासन आणि जनता यांनी मिळून  जलसंधारणाची  उल्लेखनीय  कामगिरी केली, त्याचा या पावसाळ्यात  आपल्या सर्वांना चांगला प्रत्ययही आला.  आता जिल्ह्यात  पाण्याचा मुबलक साठा  निर्माण  झाला असून  पाण्याच्या  वापराबाबतचे योग्या ते  नियोजन  करणे ही सर्वांचीच  सामाजिक  जबाबदारी  आहे . त्याकरिता  संबंधित  गावपातळीपासून ते जिल्हास्तरीय सर्व अधिकारी , स्थानिक  स्वराज्य  संस्थांचे  प्रतिनिधी  असे सर्वांनीच  मिळून  प्रत्येक  गावाचा जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा  तयार करावा , असे  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे  सूचित केले .
          पाणी  आरक्षण , पाणी नियोजन याबाबत  अत्यंत महत्वपूर्ण  बैठक  आज जिल्हाधिकारी  कार्यालयात पार पडली  त्यावेळी  ते बोलत होते . यावेळी  जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी  अधिकारी  आनंद रायते ,  निवासी उपजिल्हाधिकारी  सुनील यादव ,  जिल्हा कृषी  अधीक्षक  शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी  मनोज शिवाजी सानप  हे उपस्थित होते .
          जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घ्यावी व  संभाव्य पाणी टंचाई असणारी गावे यांचा आढावा घ्यावा , प्रकल्पात पाणी आहे परंतु विदयुत पुरवठा नसेल तर  त्याबाबत आढावा घेण्यात यावा ,  पाणी वितरणाबाबत शाश्वत आराखडा तयार करण्यात यावा , शासकीय टँकरची स्थिती कळवावी, प्रत्येक  गावाचा  जलप्रबंधनाचा शाश्वत  आराखडा  तयार करुन  आहे त्या पाण्याचा येणाऱ्या मार्च ते जुलै या कालावधीपर्यत विनियोग करावा , दि.30 नोव्हेंबर पूर्वी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत  करुन जलप्रबंधनाचा शाश्वत आराखडा तयार करावा , जलयुक्त शिवार योजनेतून किती पाणी उपलब्ध झाले याचा अहवाल सादर करणे इत्यादी सूचना सर्व संबंधितांना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.
          या बैठकीस सर्व तहसिलदार , सर्व गट विकास  अधिकारी , जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.देवकर , जलसंधारण विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते .

Monday, 21 November 2016

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय कार्यान्वित


उस्मानाबाद,दि.21:-  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे,यावेळी उप आयुक्त तथा सदस्य,जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य अनिल शेंदारकर, जिल्हा जाती पडताळणी समितीचे सदस्य सचिव ए.के.मिनगिरे,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एस.एस.शेळके उपस्थित होते.

          जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबाद येथे कार्यालय कार्यान्वित करण्यात आलेले असून या कार्यालयामध्ये अनुसूचित जाती,विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागास प्रवर्ग यांच्या शैक्षणिक/सेवा व निवडणूक विषयी दावा प्रकरणांची पडताळणी होणार आहे. जिल्हातील सर्व नागरिकांनी उपरोक्त जाती दाव्याचे पडताळणीचे अर्ज लातूर येथे सादर न करता उस्मानाबाद येथील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सिमिती या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन सदस्य अनिल शेंदारक यांनी केले आहे. 

नागरिकांकरीता रद्द नोटा बँकेत भरणे अथवा बदलून घेणे यासाठी मदत कक्षाची स्थापना


उस्मानाबाद,दि.21:- राष्ट्रीय  विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च  न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशनानुसार केंद्र शासनाने रद्द ठरविलेल्या  रुपये 500 आणि 1000 रक्कमेच्या नोटा /  चलन शासनाचे प्रचलित नियमानुसार बँकेत भरणा करणे, नव्या चलनात बदलून घेणे इत्यादी कामानिमित्त्‍  बँकामध्ये होत असलेल्या गर्दीमध्ये सर्वसामान्य, निरक्षर व जेष्ठ नागरिक यांना मदत म्हणून त्यांची विहित नमुन्यात अर्ज भरुण देणे, बँकेच्या स्लिप भरुण देणे आणि प्रचलित नियमानुसार मार्गदर्शन करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  मदत  कक्ष  स्थापन  करण्यात आला..

          जिल्हा  विधी  सेवा   प्राधिकरणाचे सचिव श्री. एस. आर. पडवळ  यांच्या  समन्वयाने दिवाणी न्यायाधीश श्री. ए. ए. बाबर,  विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित खोत, ॲड. माढेकर उस्मानाबाद स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा व्यवस्थापक श्री. कळमनुरीकर आणि कर्मचारी  यांच्या  उपस्थित  मदत  कक्षाची  स्थापना  झाली. या  मदत  कक्षात  जिल्हा विधी सेवा  प्राधिकरणाकडून प्रशिक्षित  स्वयंसेविका  कु. योगेश्वरी पाटील  आणि कु. कांचन म्हैञे यांची  नियुक्ती  करण्यात  आलेली आहे.  हे स्वंसेवक  गर्दीतील  सामान्य  नागरिक, निरक्षर आणि जेष्ठ नागरिक यांच्या वैयक्तिक  बँक  व्यवहाराकरीता मदत करतील, असे जिल्हा  विधी  सेवा  प्राधिकरणाचे सदस्य  सचिव श्री. एस. आर. पडवळ  यांनी  कळविले आहे.