Tuesday, 25 October 2016

आधार क्रमांक रास्तभाव दुकानदाराकडे दि.15 नोंव्हेबर पर्यत नोंदविण्याचे आवाहन -जिल्हा पुरवठा अधिकारी


उस्मानाबाद,दि.25:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमन 2013 अंतर्गत समाविष्ट करावयाच्या ज्या शिधापत्रिकाधारकाकडे आधार क्रमांक उपलब्‍ध नसेल,अशा जिल्हयातील सर्व लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक अद्याप संबधित रास्तभाव दुकानदार,कार्यालय यांच्याकडे उपलब्ध करून दिलेला नसेल त्यांनी  दि.15 नोव्हेंबर 2016 पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करुन देण्यात यावा, अन्यथा लाभार्थी यादीतून  नावे कायमस्वरुपी वगळण्यात येवून अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

                           ज्या स्वस्त धान्य लाभार्थींनी अद्याप पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नसेल अशा अंत्योदय अन्न योजना, प्रधान्य कुटुंब योजना, एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी दि. 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत आधार क्रमांक  संबंधित रास्तभाव दुकानदारकडे उपलब्ध करुन देण्यात यावा, तरी ज्या लाभार्थ्यांना सध्या अन्न धान्याचा लाभ मिळत आहे, परंतू ज्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही, अशा सर्व लाभार्थ्यांची नावे दि.16 नोव्हेंबर 2016 पासून यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात येवून त्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.आधार क्रमांक न दिलेल्या  सर्व योजनेतील लाभार्थ्यांनी  दि.15 नोव्हेंबर 2016 पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करुन देण्यात यावे अशी सूचना  जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

Monday, 24 October 2016

मध्यम मुदतीचे तंत्रशिक्षण


भारत सरकारच्या लघु, मध्यम उद्योग मंत्रालय व  जर्मनीच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथे इन्डो जर्मन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.  या संस्थेच्या वतीने कुशल मनुष्यबळासाठी विविध अभ्यासक्रम शिकविले जातात.  संस्थेने नुकतीच काही पूर्ण वेळ व काही अर्ध वेळ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे.  हे अभ्यासक्रम नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होत असून संस्थेच्या औरंगाबाद/नागपूर/पुणे/ मुंबई केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचे नाव, कालावधी, आवश्यक पात्रता आदी माहिती पुढीलप्रमाणे आहे.
  पूर्णवेळ अभ्यासक्रम
(1) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनियरिंग (2)मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॅड/कॅम (3) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन (4) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन प्रोडक्ट डिझाईन (5) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टेक्नॉलॉजी. अनुक्रमांक 1 ते 5 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे मेकॅनिकल/प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग मधील पदवी/पदवीकाधारक असावेत. (6) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स (7) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन ॲण्ड रोबोटिक्स. अनुक्रमांक 6 व 7 या अभ्यासक्रमांसाठी  उमेदवार हे इलेक्ट्रिकल/ ईसीई/ इन्स्ट्रुमेंटेंशन/ मेकॅनिकल/प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग पदवीधर असावेत. (8) मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन स्ट्रक्चरल डिझाईन ॲण्ड ॲनॅलिसिस- या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे सिव्हिल इंजिनियरिंग मधील किंवा समकक्ष विषयातील पदवी/पदवीकाधारक असावेत. (9) मास्टर सर्टिफि‍केट कोर्स इन वेल्डींग ऑपरेशन या अभ्यासक्रमासाठी उमेदवार हे मेकॅनिकल/प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग पदवी/पदविकाधारक असावेत.
अर्धवेळ अभ्यासक्रम
(10)  सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन अॅण्ड कॅड/कॅम (11) सर्टिफिकेट कोर्स इन कॅड /कॅम (12) सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन (13) सर्टिफिकेट कोर्स इन प्रॉडक्ट डिझाईन (14) सर्टिफिकेट कोर्स इन रिव्हर्स इंजिनियरिंग ॲण्ड 3डी प्रिंटींग. अनुक्रमांक 10 ते 14 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे मेकॅनिकल/प्रॉडक्शन/ऑटो किंवा समकक्ष विषयातील इंजिनियरिंग पदवी/पदविकाधारक/आयटीआय पूर्ण केलेले असावेत.   (15)सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स (16) सर्टिफिकेट कोर्स इन व्हीएलएसआय ॲण्ड एम्बेडेड सिस्टिम डिझाईन.  अनुक्रमांक 15 ते 16 या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे इलेक्ट्रिकल/ ईसीई/इन्स्ट्रुमेंटेंशन/मेकॅनिकल/प्रॉडक्शन किंवा समकक्ष विषयातील पदवी/पदविकाधारक आयटीआयमधून पूर्ण केलेले  असावेत.
अनुक्रमांक 4,5,6,7,8,9,13,14,15 आणि 16 हे अभ्यासक्रम फक्त औरंगाबाद येथील केंद्रात उपलब्ध आहे.  अनुक्रमांक 1 ते 9 या अभ्यासक्रमांसाठी 40 हजार रुपये इतके, अनुक्रमांक 10 या अभ्यासक्रमासाठी 50 हजार रुपये इतके, तर अनुक्रमांक 11 ते 16 या अभ्यासक्रमांसाठी 25 हजार रुपये इतके शुल्क भरावयाचे आहे. 
अनुक्रमांक 10 या अभ्यासक्रमाचा कालावधी 12 महिन्यांचा असून या अभ्यासक्रमांचे शुल्क दोन हप्त्यात भरता येईल.  इतर अभ्यासक्रम हे 6महिने कालावधीचे आहेत.  हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी संस्थेतर्फे सहाय्य केले जाईल.  वसतिगृहाची सुविधा फक्त औरंगाबाद येथेच उपलब्ध आहे.  नियमानुसार विविध संवर्गांसाठी आरक्षण फी सवलत उपलब्ध आहे. 
            अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया संबंधित संस्थांमध्ये संपर्क साधावा तसेच संस्थेच्या    www.igtr-aur.org, www.igtr-aur.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. 
संस्थांचे पत्ते :
1) इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, पी-31, एम.आय.डी.सी. इंडस्ट्रियल एरिया,चिखलठाणा, औरंगाबाद - 431006 महाराष्ट्र,दूरध्वनी क्र.- (0240)-2486832, 2482593, 2470541,फॅक्स-(0240)-  2484028,   ईमेल – training@igtr-aur.org
2) इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद,एक्सटेन्शन सेंटर पुणे, आयजीटीआर-एमएसएमई डीआय कॅड/कॅम ट्रेनिंग सेंटर, शंकरशेठ रोड, पीएमटी वर्कशॉपजवळ, स्वारगेट,पुणे- 411037,महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.-(020) 24440861, फॅक्स- (020) 24440862, ईमेल-igtr_pune@yahoo.co.in
3) इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद,एक्सटेन्शन सेंटर नागपूर, प्लॉट नं. पी-142, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, हिंगाणा, नागपूर-440006,महाराष्ट्र, दूरध्वनी क्र. (07104) 645114, फॅक्स (07104) 645114,ईमेल – training_ngp@igtr-aur.org
4) एमएसएमई डीआय-इन्डो जर्मन टूल रुम, औरंगाबाद, ट्रेनिंग सेंटर मुंबई,एमएसएमई डीआय, साकीनाका, कुर्ला-अंधेरी रोड, मुंबई - 400072,महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.- (022) 28573020, 28573024, ईमेल-training_mum@igtr-aur.org
           - देवेंद्र भुजबळ

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक संबंधी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016

उस्मानाबाद:- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016  सुरळीत पार पाडण्यासाठी  आज जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली . या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाटगे  आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना  ही निवडणूक सुरळीत व अनुचित प्रकाराशिवाय पार पडावी याबाबत सूचना दिल्या. पोलीस प्रशासनाने मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात  बॅरेकेटींग लावणे,  जिल्ह्यात चोख बंदोबस्त  ठेवणे, पेट्रोलिंग व झोनल प्लॅन तयार करणे, आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास  तात्काळ कारवाई करणे ,  उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु  विक्रीवर विशेष लक्ष देणे,  तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या  सर्व निवडणूक निर्णय अधिकारी ,  सहायक  निवडणुक  निर्णय अधिकारी , अतिरिक्त  निवडणूक  अधिकारी यांनी तक्रार निवारण केंद्र , सुविधा कक्ष स्थापित करणे , निवडणुकीविषयीच्या सर्व बातम्या डॅशबोर्डवर उपलोड करणे आदि सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिल्या. तसेच सर्व संबंधितांनी संबंधित सूचनांची कोटकोरपणे अंमलबजावणी  करण्याबाबत सूचित केले.

याशिवाय सर्व निवडणूक निर्णय अधिकारी ,  सहायक  निवडणूक  निर्णय अधिकारी , अतिरिक्त  निवडणूक  अधिकारी यांनी त्या-त्या प्रभागांना भेटी  देऊन  निवडणूक  कामकाजासंदर्भातील विविध  आवश्यक बाबींचे  सुक्ष्म निरीक्षण करुन त्यात आवश्यता भासल्यास  सुधारणा कराव्यात , नगरपालिका प्रभागात  मतदार  जागृती अभियान मोठ्या प्रमाणात  राबवावे, निवडणूक  प्रक्रियेसंदर्भात  आवश्यक ती पथके  स्थापित  करावित , अशा विविध  सुचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी उपस्थितांना दिल्या.

 नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया ही यावेळेस ऑनलाईन करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होऊ नये याची काळजी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्याबाबत  जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सूचित केले.

 या बैठकीनंतर नवनियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी ,  सहायक  निवडणूक  निर्णय अधिकारी , अतिरिक्त  निवडणूक  अधिकारी  यांच्यासाठी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसंबंधित आचारसंहिता , निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून  विविध मार्गांनी होणाऱ्या खर्चाची  माहिती, पेड न्यूज इत्यादी विषयांबाबतचे  एक दिवसीय प्रशिक्षण  कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते . या प्रशिक्षणामध्ये  अप्पर जिल्हाधिकारी  श्री. पाठक यांनी  उपस्थित  अधिकाऱ्यांना  आचारसंहिता  तसेच कोषागार अधिकारी श्री.पवार  यांनी  निवडणूक खर्चासंबंधी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. मुळे  यांनी पेड न्यूज संदर्भातील  मार्गदर्शक तत्वे  याविषयांबाबत मार्गदर्शन केले.



या बैठकीस  अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री. प्रभोदय मुळे, कोषागार अधिकारी विशाल पवार आणि सर्व निवडणूक निर्णय अधिकारी ,सहायक  निवडणूक  निर्णय अधिकारी , अतिरिक्त  निवडणूक  अधिकारी आदि उपस्थित होते.