Monday, 10 October 2016

वैदिक होमहवनास विधीवत पूर्णाहुती

                        शारदीय नवरात्र महोत्सव-2016      




उस्मानाबाद, दि. 10:-शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवारी श्री तुळजाभवानी मंदिरात  वैदिक होमहवन कार्यक्रम झाला. या सर्व धार्मिक विधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे आणि त्यांच्या पत्नी सौ.प्रियंका नारनवरे  यांनी पूर्ण केले.विधीवत पूजेनंतर या होमास पुर्णाहुती देण्यात आली. सप्तपदीपाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पुर्णाहुती देण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.

          यावेळी सुनित उर्फ बंडू गणेश पाठक (सरकारी उपाध्ये), ऋषिकेश दादेगावकर,अनंताचार्य कांबळे, नागेश अम्बुलगे, राजन पद्माकर पाठक, सुमेध सुनिल पाठक, धनंजय सुधाकर पाठक, विश्वनाथ ढोले, अशोक घाडगे, विश्वनाथ राजाराम प्रयाग, मकरंद कमलाकर प्रयाग, भालचंद्र रामचंद्र पाठक, श्रीराम अपशिंगेकर, किशोर दासराव कुलकर्णी, बाळासाहेब दीक्षीत, गजानन भानूदास लसणे, मंगेश नारायण घंटे, सिलोत्तम जेवळीकर, गिरीष देवळालकर, बाळासाहेब कराडे, सुनिल दुर्गादास लसणे, सुरेश लक्ष्मण पाठक, अशोक पाठक, प्रल्हाद पैठणकर यांनी मंत्रोचारात हे सर्व विधी पूर्ण करून केले. 

राज्यातील पहिले “लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र” उस्मानाबादचे

     “आम्ही झालो लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र”

उस्मानाबाद,दि,10:- राज्य शासनाच्या “लोकराज्य” मासिकातील माहितीचा ग्रामीण भागातील जनतेला व विद्यार्थ्यांना लाभ व्हावा  यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “आम्ही झालो लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र ” या  उपक्रमास प्रतिसाद देत येरमाळा येथील  येडाई व्यसनमुक्ती केंद्राने राज्यातील पहिले “लोकराज्य व्यसनमुक्ती केंद्र ” होण्याचा बहुमान पटकाविला आहे. याकरिता या व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, यश मेडिकल  फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच राज्य व्यसनमुक्ती संघटनेचे  सचिव  डॉ. संतोष तांबारे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी  या व्यसनमुक्ती केंद्रातील  100 रुग्ण  आणि  व्यक्ती यांना  “लोकराज्य”चे  वार्षिक सभासद  करुन घेतले.
या  व्यसनमुक्ती केंद्रातील  महात्मा गांधी  व्यसनमुक्ती   सप्ताहाच्या  समारोप प्रसंगी  व्यसनमुक्त  होण्यासाठी  प्रयत्नशील  असणाऱ्या  रुग्णांना  प्रोत्साहनपर  व्याख्यान  देण्याकरिता  जिल्हा माहिती  अधिकारी  मनोज शिवाजी सानप  हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या केंद्रात  उपस्थित होते .
“लोकराज्य” मासिकाचे  महत्व  पटवून  देताना श्री. सानप म्हणाले, “लोकराज्य” या मासिकामधील शासकीय लेखांविषयीच्या माहितीचा निश्चित उपयोग  या रुग्णांना होणार आहे. या व्यसनमुक्त व्यक्तींना  पुढील  आयुष्याच्या यशस्वी वाटचालीकरिता  “लोकराज्य” मासिकाचा  नक्कीच फायदा होईल , त्यामुळे  व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तींनी लोकराज्यचे नियमित वाचन करावे , असे आवाहन  श्री. सानप यांनी या व्यसनमुक्ती केंद्रातील  रुग्णांना  केले.  
राज्यातील  पहिले “लोकराज्य  व्यसनमुक्ती केंद्र” बनण्याचा  संकल्प बनल्यानंतर डॉ. संतोष तांबारी , त्यांचे  सहकारी आणि व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांनी या व्यसनमुक्ती केंद्रात आता यापुढे दररोज  “लोकराज्य” मासिकातील  एक लेख वाचला जाईल अशी प्रतिज्ञा केली.
.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी  म्हणून येरमाळा येथील  सहायक पोलीस  निरीक्षक  सचिन चव्हाण , डॉ.  सारीपुत भोसीकर , डॉ. भागवत  राऊत हे उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  अजिनाथ शेरकर  यांनी केले तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले .   *** 

Sunday, 9 October 2016

श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा


          उस्मानाबाद,दि.9: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. शेवटची माळ असल्याने भाविकांनी दर्शनासाठी आणि  देवीचे व महिषासूराचे रुप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. 
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासूराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता ही सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासूराचा वध केला व सर्व देवतांना स्वर्गप्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते. 
भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
          दरम्यान काल रात्री दि.8 ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या सोमवार (दि.10 ऑक्टोबर) रोजी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी,घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक हे विधी करण्यात येणार आहेत.

वैदिक होमहवनास विधीवत पूर्णाहुती

          शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवारी श्री तुळजाभवानी मंदिरात  वैदिक होमहवन कार्यक्रम झाला. सर्व विधीवत पूजेनंतर या होमास पूर्णाहुती देण्यात आली.. सप्तसतीचा पाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहुती देण्याची प्रथा आहे त्यानुसार आज सर्व विधी पार पाडण्यात आले.