Saturday, 25 July 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरण अनिवार्य ; शेतकऱ्यांनी दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करावी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरण अनिवार्य ; शेतकऱ्यांनी दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करावी धाराशिव,दि.२५ जुलै (जिमाका) राज्य शासनाने २४ जुलै २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असून,आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे यादीतील सर्व शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांनी केले आहे.यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय,चावडी कार्यालय तसेच संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक,स्वतःचे आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे.तेथे संबंधित केंद्र चालकास विशिष्ट क्रमांक,आधार क्रमांक व ॲग्रीस्टॅक क्रमांक देणे आवश्यक आहे.ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी ॲग्रीस्टॅक क्रमांक घेतलेला नसेल, त्यांनी तो तत्काळ केंद्र चालकाकडून काढून घ्यावा. शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्र चालक पोर्टलवरील कर्जाची माहिती आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करेल.सर्व माहिती अचूक असल्यास आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांचे प्रकरण पोर्टलवरून कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाईल. मात्र कर्जाची माहिती,कर्ज खाते किंवा आधार क्रमांक यामध्ये तफावत आढळल्यास त्याबाबतची तक्रार पोर्टलवरच नोंदविण्यात येईल.त्यानंतर तक्रारीचे स्वरूप लक्षात घेऊन ती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पोर्टलमार्फत पाठविण्यात येईल.याची पावती संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तक्रार निवारण समित्यांकडून तक्रारीचा निपटारा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची फाईल कर्जमाफीचा लाभ मंजूर करण्यासाठी पोर्टलमार्फत शासनाकडे वर्ग करण्यात येईल. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दर्शविणारे स्टँडी (Standee) प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर प्रदर्शित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, कीर्ती किरण पुजार यांनी सर्व केंद्रचालकांना दिल्या आहेत. यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे. *******

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांचा समावेश ; कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांचा समावेश ; कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरणाचे आवाहन धाराशिव,दि.२५ जुलै (जिमाका) राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या दुसऱ्या यादीमध्ये जिल्ह्यातील ४६ हजार ४६ थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करून ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने केले आहे. राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले आणि 1 एप्रिल २०१९ नंतर वितरित झालेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी 'वन टाईम सेटलमेंट' (ओटीएस) योजना लागू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पूर्वी थकबाकीची रक्कम भरल्यास शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर बँकांनी थकीत पीक कर्जदारांची माहिती भरली होती.त्याआधारे २२ जुलै २०२६ रोजी ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर २४ जुलै रोजी राज्यातील सुमारे १७ लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध झालेल्या यादीत धाराशिव तालुक्यात ८ हजार ३८, उमरगा ५ हजार २५,कळंब ७ हजार ६७०, तुळजापूर ५ हजार ८७८, परांडा ५ हजार ८४१,भूम ६ हजार २४८, लोहारा २ हजार ११३ आणि वाशी ५ हजार २३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या याद्या ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,चावडी,संबंधित बँक शाखा तसेच विविध मोबाईल गटांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.यादीतील प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे आधार कार्ड, यादीतील विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसेल,त्यांनी तो सेवा केंद्रातून तत्काळ तयार करून घ्यावा. सेवा केंद्रावर कर्जाची माहिती, आधार क्रमांक व इतर तपशीलांची पडताळणी करून सर्व माहिती योग्य आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचे प्रमाणीकरण पूर्ण केले जाईल आणि कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी प्रकरण पुढील प्रक्रियेस पाठविले जाईल.माहितीमध्ये विसंगती आढळल्यास पोर्टलवरून तक्रार नोंदवून ती तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाइन पाठविण्यात येईल. तक्रार नोंदविल्याची पावतीही संबंधित शेतकऱ्याला दिली जाणार आहे.तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर लाभासाठी प्रकरण शासनाकडे पाठविले जाईल. ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत नसले,मात्र ३० सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचे अल्पमुदत पीक कर्ज थकीत असून ते १ एप्रिल २०१९ नंतर घेतलेले असेल,त्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधावा.अशा पात्र शेतकऱ्यांची नावे पुढील तिसऱ्या अथवा आवश्यकतेनुसार चौथ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,धाराशिव यांनी स्पष्ट केले आहे. यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी दोन दिवसांच्या आत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक पी.ए.साठे यांनी केले आहे. *******

Friday, 24 July 2026

शिबिरासारखीच नागरिकांची कामे कार्यालयातूनही वेळेत व्हावीत आ.कैलास पाटील-घाडगे शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान संपन्न

शिबिरासारखीच नागरिकांची कामे कार्यालयातूनही वेळेत व्हावीत आ.कैलास पाटील-घाडगे शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान संपन्न * ३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ * शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल नागरिकांसाठी आकर्षण धाराशिव दि.२४ जुलै (जिमाका) सर्वसामान्य नागरिकांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये,त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत व्हावी,यासाठी महसूल प्रशासनाने समाधान शिबिराचे आयोजन केले आहे.शिबिरात ज्या तत्परतेने कामे होत आहेत,त्याचप्रमाणे पुढील काळातही नागरिकांची कामे कार्यालयातून वेळेत झाली पाहिजेत,असे प्रतिपादन कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील-घाडगे यांनी केले. आज २४ जुलै रोजी कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ओमसाई मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती श्री.कोकणे,कळंब पंचायत समिती सभापती राजश्री वरपे,धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा कदम,उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे,जिल्हा परिषद सदस्या कांचन संगवे, पेकराज गाडगे,अजित लाकाळ, पंचायत समिती सदस्य मनोज घोगरे,दत्ता माकोडे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, कळंबच्या अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील तसेच शिराढोण सरपंच लक्ष्मीबाई म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.पाटील म्हणाले की,समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे.समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत.अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक मानसिकतेने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाऊन सेवा दिली पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जनतेसाठी काम करणे आवश्यक आहे.अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू असून,नागरिकांना छोट्या- छोट्या कामांसाठी वारंवार कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये. प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करावी,विशेषतः महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावे,असेही त्यांनी सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या,ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या मुळापासून सोडविण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून,यंत्रणांनी प्रभावी काम केल्यास त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचतो. कळंब पंचायत समितीच्या सभापती राजश्री वरपे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा,असे आवाहन केले. जिल्हा परिषद सदस्या कांचन संगवे म्हणाल्या की,अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे.महाआरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच रेशनकार्डासंदर्भातील समस्या तहसील कार्यालयात सोडवून घ्याव्यात. ३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून एकूण ३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. महसूल विभागाच्या तहसील कार्यालय, कळंबमार्फत श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजनेचे ३६०,ईजीएस केवायसीचे ११५ आणि शैक्षणिक दाखल्यांचे ४७१ वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे ५३६ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत ६५ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.नगर परिषद, कळंबमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६ तर दीनदयाळ जनआजीविका योजना (शहरी) अंतर्गत २ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंचायत समिती कळंबमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचे ४५, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय बांधकाम व वापर प्रोत्साहन निधीचे १२ लाभार्थी,तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लखपती दीदी प्रमाणपत्रांचे ३७ वितरण आणि महिला स्वयंसहाय्यता गटांना सामुदायिक गुंतवणुकीचे ४ लाभ देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे ५४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना (२०), बालसंगोपन योजना (१२०), आधार कार्ड संलग्न सेवा (३०), एकल महिला योजना (१७), दिव्यांग योजना (१५) आणि बेबी केअर किट (२७१) लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.भूमी अभिलेख विभागामार्फत सनद फीची ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. गट शिक्षण कार्यालय,पंचायत समिती कळंब यांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी (४७८), समाजकल्याण शिष्यवृत्ती (६८), दिव्यांग विद्यार्थीनी प्रोत्साहन भत्ता (१३२), मदतनीस भत्ता (९१), प्रवास भत्ता (६८),लेखनिक/वाचनिक भत्ता (६),साहित्य साधने (२४), टीएलएम किट (१२), व्हीलचेअर (३),श्रवणयंत्र (६), क्रचेस (२), सीपी चेअर (१), लार्ज प्रिंट बुक (२२) आणि दिव्यांग प्रमाणपत्रे (१२५) देण्यात आली. महावितरण उपविभागीय कार्यालयामार्फत SMART Scheme अंतर्गत २३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-म्हशींच्या गटांचे वाटप करण्यात आले.तहसील कार्यालय, धाराशिवमार्फत किसान विकास पत्रांचे २७, शिधापत्रिकांचे ५,शेळी गट वाटप ५,संजय गांधी/श्रावणबाळ योजनेचे ३३ लाभार्थी आणि शैक्षणिक दाखल्यांचे १० वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी व लाभार्थ्यांचा सत्कार शिबिरात NEET परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.हर्षराज माने,तन्मय वाघमारे,विश्वजित बांगर,कु.अश्लेषा लिमकर,अथर्व पवार,श्लोक हिरे यांचा यामध्ये समावेश होता. याशिवाय आबासाहेब कापसे,बंडू आवाड, स्वप्नील नरसिंगे,अमोल शितोळे, प्रशांत शितोळे यांना जात प्रमाणपत्र,तर संजय बाळापुरे, लखन सहाणे,अमोल साठे, गोविंद वाघमारे,शंकर डांगे यांना उत्पन्न, डोमिसाईल व रहिवासी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.मिटू पांचाळ, अरबाज मुस्तफा शेख,कुशीद फकीर महंमद शेख,फकीर नजमोद्दीन शेख यांना २०११ पूर्वीच्या निवासी प्रयोजनातील अतिक्रमण नियमितीकरणासंदर्भातील लाभ देण्यात आला. नगर परिषद,कळंबमार्फत दीनदयाळ जनआजीविका योजना (शहरी),प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) तसेच बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.रुद्रांश महिला बचत गटासह अंजली मंडाळे,शीतल माने,शोभा पामिरे,उषा मुंडे,अभिजित रणसिंगे,रोहिणी मस्के,महादेव मोरे, जलील लोहार,पूजा यादव,प्रगती पालकर, उजमा बेगम,स्वाती राठोड,सीमा परदेशी, शारदा गुंड आणि रविराज बोंदर यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. पंचायत समिती कळंबमार्फत हम साथ है,सना,हमसाया,सुहाणा,जिजाऊ, अष्टविनायक,कुलस्वामिनी आणि संस्कृती महिला स्वयंसहाय्यता गटांना सामुदायिक गुंतवणूक निधी प्रदान करण्यात आला. तसेच लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण),वैयक्तिक शौचालय योजना,सामाजिक सहाय्यता योजना,शिधापत्रिका वाटप व जन्म-मृत्यू दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मोहन भानुदास बेळे,विलास पांडुरंग यादव,ज्ञानोबा तुकाराम सुटके,नूर महम्मद मियाजान शेख,सुधाकर शंकर कुंभार,गीता शामराव चव्हाण,सुमन बंडू यादव,शबेराबी दादागिरी शेख,भिमराव ज्ञानबा चव्हाण,अरुण कारभारी वाघमारे, निर्मला विष्णू नाईकवाडे,राणी जनार्दन किरते,पार्वती बिहुल यादव,दिलीप गोपाळ सहाणे,भारत माधवराव महाजन, श्याम मोहन सहाणे,रेहांत रफीक शेख, द्वारका नेताजी सहाणे,फरीन इसरार सय्यद,हसीना तांबोळी,रविराज प्रकाश व्यवहारे,इम्रान उमरखान पठाण,उमरखान उस्मानखान पठाण,सचिन विश्वनाथ गायकवाड आणि जुबेर मुख्तार शेख यांचा समावेश होता. तहसील कार्यालय कळंब व धाराशिवमार्फत उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, जिवंत ७/१२ उतारा आदी सेवांचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये गजेंद्र गोवर्धन जाधव, गुणवंत रघुनाथ सुतार, नागनाथ विश्वनाथ लांडे,किरणकुमार काकासाहेब आपटे, महादेव दगडू जराड,तनुजा बालाजी याकुरे,गोविंद राजाभाऊ सगर,शिल्पा अच्युत डांगे आणि नंदाबाई राजाराम डांगे यांचा समावेश होता. विविध विभागांचे माहिती स्टॉल शिबिरात आरोग्य विभागाच्या महाआरोग्य शिबिरासह तालुका कृषी विभाग,पुरवठा विभाग,महिला व बाल विकास विभाग, सामाजिक वनीकरण विभाग,नैसर्गिक आपत्ती/ॲग्रीस्टॅक,उमेद अभियान,पंचायत विभाग,महसूल विभाग,संजय गांधी निराधार योजना,पोलीस विभाग,आधार सुविधा केंद्र,समाजकल्याण विभाग,सेतू सुविधा केंद्र,पशुसंवर्धन विभाग,रोजगार हमी योजना तसेच उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माहिती स्टॉल उभारण्यात आले होते.संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना योजनांची माहिती देत माहितीपत्रके,घडीपुस्तिका, पॉकेट बुक आणि पुस्तिकांचे वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळंब उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी केले.आभार धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी मानले.शिबिरास कळंब व धाराशिव तालुक्यातील विविध योजनांचे लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००