Saturday, 11 July 2026
दिलेला शब्द पाळला ! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश; साडे सांगवीच्या रस्ता- पुलासाठी २.९० कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता
दिलेला शब्द पाळला ! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश;
साडे सांगवीच्या रस्ता- पुलासाठी २.९० कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता
धाराशिव.दि.११ जुलै (जिमाका ) धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त साडे सांगवी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना दिलेले आश्वासन अखेर प्रत्यक्षात उतरले आहे.पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने साडे सांगवी येथील रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ९० लक्ष ५८ हजार रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून,साडे सांगवीच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या निर्णयामागे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला.त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवून साडे सांगवी येथील प्रतिमा-१ ते भोगलगाव साडेसांगवी ते इजिमा -११ या ग्राममार्ग क्रमांक ८० वरील पुलाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.
या पत्रात त्यांनी नमूद केले होते की, सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे साडे सांगवी येथील रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर २०२५ रोजी भेट देऊन पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली.त्यानुसार बांधकाम विभाग,जिल्हा परिषद, धाराशिव यांनी २ कोटी ९० लक्ष रुपये खर्चाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता.या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, अशी विनंतीही पालकमंत्री सरनाईक यांनी संबंधित पत्राद्वारे केली होती.
अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळत शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.यासंदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "साडे सांगवी गावाला भेट दिली तेव्हा अतिवृष्टीमुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा प्रत्यक्ष पाहिल्या.त्यावेळी ग्रामस्थांना रस्ता आणि पुलाचे काम प्राधान्याने करून देण्याचे आश्वासन दिले होते.आज शासनाच्या प्रशासकीय मान्यतेमुळे ते आश्वासन पूर्ण होत असल्याचा मला आनंद आहे.जनतेला दिलेला शब्द पाळणे हीच आमची कार्यपद्धती आहे."
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे.
साडे सांगवीसह धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना आवश्यक निधी मिळावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला असून, पुढील काळातही जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे."
या कामामुळे साडे सांगवीसह परिसरातील नागरिक,शेतकरी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना वर्षभर सुरक्षित व अखंड वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीसमोरील अडथळे दूर होऊन ग्रामस्थांचा संपर्क अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.शासनाने दिलेल्या या मंजुरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
*******
Thursday, 9 July 2026
आस्थापनांनी नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक मनुष्यबळ माहिती ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन सादर करावी
आस्थापनांनी नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक मनुष्यबळ माहिती ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन सादर करावी
धाराशिव दि.९ जुलै (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी जून २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक मनुष्यबळ सांख्यिकी माहिती ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिवचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयामार्फत जून २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम सुरू असून, या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व आस्थापनांचा १०० टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून,विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने माहिती सादर करून कायद्याचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच प्रत्येक आस्थापनेने आपल्या नोंदणीचा तपशील पडताळून आवश्यक ती सर्व माहिती अद्ययावत करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा, १९५९ व नियम १९६० मधील कलम ५ (१) नुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील तसेच शासकीय, निमशासकीय आणि संबंधित खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी, तसेच कलम ५ (२) अंतर्गत येणाऱ्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री,पुरुष व एकूण कर्मचारी संख्या यासह सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीत विहित नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे सादर करणे बंधनकारक आहे.
ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यापूर्वीच युजर नेम व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित संकेतस्थळावर लॉगिन करून प्रत्येक आस्थापनेने अचूक व अद्ययावत माहिती विहित मुदतीत सादर करावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन किंवा सहकार्य आवश्यक असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा.तसेच dharashivrojgar@gmail.com किंवा asstdiramp.osmanabad@ese.maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर आवश्यक तपशीलासह संपर्क साधून आवश्यक माहिती मिळवावी,असे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी कळविले आहे.
*****
स्लरी फिल्टर घटकासाठी लाभार्थ्यांची सोडत १४ जुलैला अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
स्लरी फिल्टर घटकासाठी लाभार्थ्यांची सोडत १४ जुलैला
अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
धाराशिव दि.९ जुलै (जिमाका) निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील विंडो-॥ (नाविन्यपूर्ण प्रकल्प) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "स्लरी फिल्टर" या घटकासाठी तुळजापूर तालुक्यात प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांची सोडत मंगळवार,दि.१४ जुलै २०२६ रोजी काढण्यात येणार आहे.
ही सोडत तालुका कृषी अधिकारी कार्यालय,तुळजापूर येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. संबंधित घटकासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने सोडतीद्वारे करण्यात येणार असल्याने अर्जदारांनी वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
या प्रक्रियेमुळे लाभार्थी निवडीमध्ये पारदर्शकता राखली जाणार असून, संबंधित सर्व अर्जदारांनी स्वतः उपस्थित राहून सोडत प्रक्रियेची नोंद घ्यावी,असे तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर यांनी कळविले आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)