Thursday, 5 March 2026

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’

विशेष लेख ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,गतिमान व पारदर्शक करण्याची प्रभावी मोहीम महसूल विभागाच्या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात,ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिलांचे दैनंदिन महसूलविषयक प्रश्न सत्वर निकाली निघावेत आणि प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख व्हावे,या उद्देशाने राज्य शासनाने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा १)” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेले हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुका व मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे. अभियानाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे मागील काही वर्षांत महसूल विभागामार्फत अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक नसणे,सनद प्रणाली संपुष्टात आणणे,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी सुलभ तरतूद,तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा,अभिलेख अद्ययावतीकरण आणि डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता देणे यांसारख्या निर्णयांमुळे प्रशासन सुलभ झाले आहे.या सुधारणांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती आणि तीव्र प्रसार मोहीम राबविणे आवश्यक असल्याने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. कालावधी आणि शिबिरांचे वेळापत्रक माहे मार्च ते माहे मे २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.दि. १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्वतयारी केली जाणार आहे.७ व १४ मार्च २०२६ रोजी मार्च महिन्यातील शिबिरे,१० व १७ एप्रिल २०२६ रोजी एप्रिल महिन्यातील शिबिरे, तसेच ८ व १५ मे २०२६ रोजी नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या शिबिरांद्वारे नागरिकांना “Single Day Service Delivery”संकल्पनेनुसार एकाच दिवशी विविध महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पूर्वतयारीतील महत्त्वाचे मुद्दे शिबिरांपूर्वी भोगवटदार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करून अद्ययावत ७/१२ वितरित करणे, ‘जिवंत ७/१२’ मोहिमेद्वारे प्रलंबित नोंदी दुरुस्त करणे,सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील अर्ज मंजूर करून आदेश तयार ठेवणे,तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहारांची गावनिहाय यादी तयार करणे, फेरफार प्रक्रिया पूर्ण करणे आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे दाखले ‘कॅम्प मोड’मध्ये तयार ठेवणे या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना देणे तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत प्रलंबित पट्टे वाटप पूर्ण करणे हेही पूर्वतयारीचा भाग आहे. शिबिरामध्ये उपलब्ध सेवा शिबिरांमध्ये प्रलंबित व विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे,अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्कद्वारे ७/१२ मधील त्रुटी दूर करणे,लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न,रहिवासी, जात,नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करणे या सेवा उपलब्ध असतील.अकृषिक (NA) रूपांतरणासंदर्भातील कलम ४२ मधील सुधारणा,सनद प्रणाली संपुष्टात येणे,एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी टक्केवारी पद्धत (१००० चौ.मी.पर्यंत ०.१%, १००१–४००० चौ.मी.०.२५%, ४००० पेक्षा जास्त ०.५%) याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता प्राप्त झाल्याची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले जाईल.गाव दप्तर अद्ययावत करण्यावर भर.भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांत कमी-जास्त पत्रके तयार न केल्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन गाव नमुना ७/१२,गट नकाशे व इतर अभिलेख अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘Ease of Doing Business’ व एक खिडकी व्यवस्था : समाधान शिबिरामध्ये एक खिडकी (Single Window) प्रणाली राबविण्यात येणार असून तहसीलदार,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांना तात्काळ सेवा देतील.ई-मोजणी,अॅग्रीस्टॅक,पीएम किसान व तक्रार निवारण सेवा शिबिरात उपलब्ध असतील. अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकारी यांनी शिबिरांच्या तारखा जाहीर करून सर्व विभागांचा समन्वय साधणे,संपर्क अधिकारी नेमणे आणि अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणे. उपविभागीय अधिकारी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेऊन समन्वय साधावा.तहसीलदार यांनी मंडळस्तरावर सर्व विभागांच्या बैठका घेऊन शिबिराचे प्रभावी आयोजन करावे,लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे,महिला बचत गट व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे आणि त्याची व्यापक प्रसिद्धी करावी. जिल्हास्तरीय समन्वय समिती : अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन/रोहयो),जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,सह जिल्हा उपनिबंधक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपवनसंरक्षक (प्रादेशिक),जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आदी सदस्य असतील. निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्य करतील. अभियानाचे महत्त्व : “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” हे केवळ शिबिर नसून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारी व्यापक लोकाभिमुख चळवळ आहे. महसूलविषयक गुंतागुंत कमी करून त्वरित सेवा देणे,डिजिटल सक्षमीकरण वाढविणे,पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे आणि शासन निर्णयांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मूलभूत हेतू आहे.हे अभियान प्रभावीपणे राबविल्यास महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि जनकेंद्रित होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संकलन जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव ****

महिला दिनी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मुलींना मोफत लस

महिला दिनी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी मुलींना मोफत लस धाराशिव दि.६ मार्च (जिमाका) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते HPV (Human Papilloma Virus) लसीकरण मोहिमेचा देशव्यापी शुभारंभ करण्यात आला.या अनुषंगाने महाराष्ट्रातही दि.८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे- योडर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.भारत सरकार व महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला (Cervical Cancer) प्रतिबंध करण्यासाठी ही HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक प्रमुख आजार असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून HPV लसीकरण प्रभावी ठरते.या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात ही मोहीम प्रारंभी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून त्यानंतर HPV लसीकरणाचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत वय वर्षे १४ ते १५ या वयोगटातील मुलींना HPV लस मोफत देण्यात येणार आहे. GARDASIL-4 (Quadrivalent) ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी प्रमाणित केलेली आहे.या लसीचा ०.५ मिली इतका सिंगल डोस स्नायूमध्ये (IM) डाव्या हाताच्या वरच्या भागात देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश असून या सर्व ठिकाणी लाभार्थींना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. लाभार्थी व त्यांच्या पालकांनी लसीकरणासाठी येताना आधार कार्ड किंवा आभा आयडी कार्ड तसेच मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे.तसेच मुलींना लसीकरणासाठी आणताना पालकांनी त्यांना नाश्ता किंवा जेवण करून आणावे,असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासंदर्भातील कोणत्याही शंका किंवा माहितीकरिता १०४ हा हेल्पलाईन क्रमांक निश्चित करण्यात आलेला आहे.तथापि, काही परिस्थितीत HPV लस घेऊ नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींनी पूर्णपणे बरे होईपर्यंत HPV लस घेऊ नये.मागील लसीकरणामुळे एलर्जी रिऍक्शन आलेली असेल किंवा यीस्ट (Yeast) ची ऍलर्जी असल्यास लस घेऊ नये. गर्भावस्था असल्यास HPV लस घेऊ नये. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना ही लस देण्यात येणार नाही.तसेच ज्यांना यापूर्वी HPV लस देण्यात आलेली आहे,त्यांनी पुन्हा ही लस घेऊ नये. “गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त भविष्यासाठी आपल्या मुलींचे वेळेवर लसीकरण करणे ही काळाची गरज आहे.पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव यांनी केले आहे. ******

मार्च ते मेदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर जिल्ह्यात मंडळ व नगरस्तरावर व्यापक शिबिरे

मार्च ते मेदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर जिल्ह्यात मंडळ व नगरस्तरावर व्यापक शिबिरे धाराशिव दि.५ मार्च (जिमाका)माहे मार्च ते मे २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा क्र.१ ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत मार्च ते मे महिन्यात मंडळस्तरावर तसेच नगरपरिषद व नगरपंचायतस्तरावर शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे,अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन, अकृषक तरतुदी संदर्भात माहिती,डिजिटल ७/१२,कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे,संजय गांधी योजना,आरोग्य शिबीर,आपले सरकार सेवा केंद्रातील विविध दाखले व प्रमाणपत्रे (रहिवासी,उत्पन्न,जात,नॉन क्रिमीलेअर,वय व अधिवास प्रमाणपत्र इ.)उपलब्ध करून देणे आदी सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (पोकरा) अंतर्गत एकात्मिक विकास कामांची माहिती,SBI व पोस्ट खातेदारांसाठी जीवन विमा योजना १०० टक्के भरणा,आयुष्यमान कार्ड,कृषी सेवा, सलोखा योजना,ऍग्रीस्टॅक नोंदणी,आधार दुरुस्ती,मतदान नोंदणी,रेशनकार्ड दुरुस्ती व नवीन रेशनकार्ड,पीएम किसान, शाळानिहाय विद्यार्थी दाखले वाटप,पाणंद रस्ते,सर्वांसाठी घरे पट्टेवाटप,किसान क्रेडिट कार्ड,पीक कर्ज नूतनीकरण आदी विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ व नगरपरिषद/नगरपंचायतस्तरावर खालीलप्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ०७ मार्च २०२६ रोजी धाराशिव -केशेगाव,तुळजापूर-सलगरा (दि.), उमरगा-बलसूर,लोहारा-घानुरी,भूम -माणकेश्वर,परंडा-आसू,कळंब- येरमाळा,वाशी-पारगाव येथे शिबिरे होतील.११ मार्च रोजी धाराशिव- बेंबळी; १४ मार्च रोजी धाराशिव-तेर,तुळजापूर- इटकळ, उमरगा-डाळींब,लोहारा-माकणी; १७ मार्च रोजी भूम-पाथरुड,परंडा- जवळा नि., कळंब-मस्सा ख.,वाशी -तेरखेडा, तसेच धाराशिव - करजखेडा व उमरगा- नारंगवाडी येथे शिबिरे पार पडतील.१८ मार्च रोजी धाराशिव - ढोकी; २४ मार्च रोजी तुळजापूर - जळकोट व धाराशिव -येडशी; २७ मार्च रोजी कळंब- शिराढोण; २८ मार्च रोजी परंडा- आनाळा येथे शिबिरे होतील.तसेच ०८ एप्रिल रोजी धाराशिव- आंबेजवळगा; १० एप्रिल रोजी धाराशिव-जागजी,तुळजापूर- तामलवाडी, उमरगा- बेडगा,लोहारा- जेवळी,भूम- वालवड,परंडा- शेलगाव कळंब- नायगाव, वाशी-पारा;१७ एप्रिल रोजी धाराशिव- पाडोळी (आ), तुळजापूर- आरळी बु.,उमरगा - मुळज,भूम-आंबी,परंडा- सोनारी,कळंब-मोहा; २४ एप्रिल रोजी तुळजापूर- मंगरूळ,भूम-ईट,कळंब- गोविंदपूर; ३० एप्रिल रोजी कळंब-ईटकूर; ६ मे रोजी तुळजापूर- सावरगाव; १५ मे रोजी धाराशिव शहर येथे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर ८ मे २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण,तुळजापूर, उमरगा,लोहारा,भूम,परंडा,कळंब,वाशी येथे तर १५ मे २०२६ रोजी नळदुर्ग व मुरूम येथे शिबिरे होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती व सदस्य, नगराध्यक्ष,नगरपरिषद सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी संबंधित मंडळनिहाय शिबिरांना उपस्थित राहून सहभाग नोंदवावा,तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी व लाभार्थ्यांना माहिती देऊन लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.लाभ वाटपावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे,अशीही विनंती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नमूद तपशीलानुसार आयोजित शिबिरांमध्ये उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ******