Friday, 27 February 2026

*क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* टीबी फोरम आणि टीबी कॉमोरबिडिटी समितीची बैठक

*क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा* टीबी फोरम आणि टीबी कॉमोरबिडिटी समितीची बैठक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) क्षयरोग दूर करण्यासाठी जास्तीत जास्त संशयित लोकांची तपासणी करणे व निदान झालेल्या क्षयरुग्णांना तात्काळ औषधोपचाराखाली आणणे हा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचाराखाली आणावे तसेच मृत्यू झालेल्या क्षयरुग्णांचे डेथ ऑडिट करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच आयोजित टीबी डेथ Surveillance आणि Response समिती,टीबी फोरम तसेच टीबी कॉमोरबिडिटी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बनसोडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मिटकरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलारी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत सर्व Key Population ची एक्स-रे तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून पूर्णपणे बरे करावे.सन २०२६ साठी जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी ४३२ ग्रामपंचायती टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्रासाठी पात्र ठरल्या आहेत.हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. पुढील महिन्यात २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ वाटप करावयाचे असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. 000000

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ६ मार्च रोजी पंचायत समिती सभापती - उपसभापती पदाची निवडणूक

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर ६ मार्च रोजी पंचायत समिती सभापती - उपसभापती पदाची निवडणूक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित पंचायत समिती सभागृहात दिनांक ६ मार्च रोजी दुपारी ०२.०० वाजता होणार आहे. पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील – दिनांक ६ मार्च रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे; दुपारी २.०० वाजता सभेस सुरुवात करणे. सभा खालीलप्रमाणे पार पडणार आहे.दुपारी २.०० ते २.१५ वाजेपर्यंत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी; दुपारी २.१५ वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची नावे वाचून दाखवणे; दुपारी २.१५ ते २.३० वाजता उमेदवारी परत घेणे; दुपारी २.३५ वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे; दुपारी २.४० वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वाचून दाखवणे; तसेच दुपारी २.४० ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास प्रथम पंचायत समिती सभापती पदासाठी व नंतर उपसभापती पदासाठी मतदान घेऊन निवडणुकीचा निकाल जाहीर करणे इत्यादी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यानुसार प्रथम पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असून,त्यानंतर लगेच त्याच पद्धतीचा अवलंब करून पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 0000000

१३ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक

१३ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक धाराशिव दि.२७ फेब्रुवारी (जिमाका) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च रोजी दुपारी २ वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. – दिनांक १३ मार्च रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे, दुपारी २ वाजता सभेस सुरुवात करणे,ही सभा खालीलप्रमाणे पार पडेल, दुपारी २ ते २.१५ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची तपासणी,नामनिर्देशन पत्राची छाननी, दुपारी २.१५ वाजता वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी २.१५ ते २.३० वाजता उमेदवारी परत घेणे,दुपारी २.३५ वाजता उमेदवारी परत घेतलेल्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे, दुपारी २.४० वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची नावे वाचून दाखवणे,दुपारी २.४० ते कामकाज संपेपर्यंत आवश्यक असल्यास मतदान प्रथम अध्यक्ष पदासाठी व नंतर उपाध्यक्ष पदासाठी होणार आहे.त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल यानुसार प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.त्यानंतर लगेच त्याच पध्दतीचा अवलंब करुन जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे. 0000000