Thursday, 7 December 2017
आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ-जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील
उस्मानाबाद, दि.7 :- आरोग्य विषयक विविध योजना व
सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम आशा स्वयंसेविकांच्या
माध्यमातून जिल्हाभर सुरु असून या आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा
मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ उस्मानाबाद जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम
केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी
आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने
पुष्पक मंगल कार्यालय येथे जननी सखी योजनेचा शुभारंभ व आशा दिन जिल्हा परिषदेच्या
उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी त्या
बोलत होत्या. प्रारंभी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या
समाजकल्याण सभापती सौ.चंद्रकला नारायणकर, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री महेंद्र
धुरगुडे, अभिमान्यू शितोळे, अस्मिता कांबळे, सुरेखा जाधव, शितलताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संतोष कोलते, आरोग्य उपसंचालक श्री.व्ही.एम. कुलकर्णी, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना उपाध्यक्षा
सौ. पाटील म्हणाल्या की, सद्यस्थितीत केंद्र शासनाची जननी सुरक्षा योजना कार्यरत
आहे. यात एससी, एसटी व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेस व तिची काळजी घेणारे
आशांना 600 रुपये मदत मिळते पण इतर गरोदर मातांच्या बाबतीत आशांना मदत मिळत नाही
म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून जननी सखी योजना सुरु करणारी उस्मानाबाद जिल्हा
परिषद ही राज्यातील पहिली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही जाती धर्माच्या महिलांची
शासकिय दवाखान्यात प्रसुती झाल्यास आशाताईना 300 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामुळे
शासकिय दवाखान्यातील प्रसुतीचे प्रमाण ही वाढेल व जिल्ह्यातील बालमृत्यू व
मातामृत्यू रोखण्यास मदत होवून लिंग गुणोत्तर वाढण्यास मदत होईल.
आरोग्य विषयक विविध योजना व
सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्या बरोबरच आशाताईनी आरोग्य सखी म्हणून ही काम करावे, असे ही
त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
नेताजी पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, आशा स्वयंसेविका यांनी गावातील दुर्धर
आजाराची माहिती आरोग्य विभागाकडे पोहंचविण्याचे काम करावे, त्यामुळे आशा दुर्धर आजारी
रुग्णांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्यात येतील. त्याचबरोबर
आशाताईंनी स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के गाव हागणदारी
मुक्तीसाठी प्रयत्न करावेत. आशाताईना 500 रुपये मानधनासाठी ही प्रयत्न करण्यात
येतील असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. कोलते यांनी यावेळी आरोग्य सेवा बळकट होईल यासाठी
सर्वांनी काम करावे असे सांगितले.
Thursday, 30 November 2017
जागतिक एड्सदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम संपन्न
उस्मानाबाद,दि.30:- मानसिक, शारिरिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया
समाधानी असणे म्हणजे आरोग्य चांगले असणे होय, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. एकनाथ माले यांनी आज केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.माले बोलत
होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व तहसिलदार राजकुमार माने यांची उपस्थिती होती. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री. गलांडे,
आयएमए सदस्य डॉ.राजगुरू, फोग्सीचे सदस्य डॉ.
सुशिलकुमार सरडे, निवासी वैद्यकीय अधिकारी
डॉ. प्रताप शिंदे, डॉ. जिंतूरकर, डॉ.नीता
चौगुले, डॉ.पोळ, डॉ.जाधव आदीची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.माले म्हणाले की, अनेक रोगाचा
आपण नायनाट करु शकलो याचे श्रेय समाजातील सर्वच नागरिकांना आहे. नुसत्या घोषणा
करुन चालणार नाही त्याला प्रत्यक्ष कृतीची
जोड दयावी. काम करताना काळजी घ्यावी, संसर्ग होवू नये म्हणून काळजी घ्यावी,
बायोमेडिकल वेस्ट योग्यरित्या त्याची विल्हेवाट लावावी. चांगल्या कामांना मनापासून
करण्याचा प्रयत्न करावा.व्यसनापासून दूर राहावे, स्वच्छतेची कास धरा व इतरांनाही
प्रोत्साहित करा,त्याचबरोबर प्रत्येकाने दरवर्षी आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी.
आरोग्य विभागाच्या विविध
उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल रिक्षाचालकांचे विशेष कौतुक डॉ.माले यांनी यावेळी
केले.
यावेळी तहसिलदार श्री. माने
यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती घेवून जागरुक व्हावे आणि सकारात्मक जीवन
जगावे, असे सांगितले.
निवासी वैद्यकीय अधिकारी श्री.शिन्दे
यांनी एचआयव्हीबाधितांना प्रशासनाने त्रस्त कुटूंबात समाविष्ट करुन त्यांना विविध
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात हा जिल्हा पहिला असल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्ण
गमे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यमानंतर महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांची जनजागरण फेरी काढण्यात
आली. या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी जनजागरण रॅलीस हिरवा
झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. विविध नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, डॉक्टर्स,
नर्सेस व इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते. एड्स दिनानिमित्त
विद्यार्थ्यांना सामुहिक शपथ देण्यात आली.
प्रारंभी सर्व यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
गणेश काकडे यांनी केले तर आभार डॉ.नीता चौगुले यांनी व्यक्त केले.सुत्रसंचलन संतोष
पोतदार यांनी केले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया
संख्येने सहभागी झाले होते.
Subscribe to:
Posts (Atom)