Saturday, 7 October 2017

तुळजापूर शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहिम






उस्मानाबाद. दि.07:- श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात देशभरातुन मोठया संख्येने भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. यात्रा कालावधी संपल्यानंतर तुळजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती लक्षात घेता आज दि. 07 ऑक्टोबर 2017 रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी 08.30 ते दुपारी 04.00 या वेळेत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
            प्रारंभी सकाळी 08.00 वाजता घाटशीळ रोड दर्शन मंडप येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे उदघाटन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक व नगराध्यक्ष श्री. जगदाळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
मी घाण करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही. सर्वप्रथम स्वत:पासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली, वस्तीपासून, माझ्या गावापासून, कार्यस्थळांपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात करेल. जगातील इतर देशाप्रमाणे मीही अस्वच्छता करणार नाही. गावोगावी याबाबत इतरांनाही प्रेरित करेल. इतर 100 व्यक्तींनाही स्वच्छतेची शपथ घ्यायला लावेल. माझे स्वच्छतेचे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करेल, याचा मला विश्वास असल्याची शपथही यावेळी उपस्थितांना दिली. 
            याप्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक श्री. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चोले, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, कोषागार अधिकारी विशाल पवार, तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उस्मानाबाद नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुनिल पवार, तहसिलदार सुजीत नरहरे, अभय मस्के, राहूल पाटील, राजकुमार माने,  तुळजापूर तहसिलदार दिनेश झांपले, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी  यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.  
            तुळजापूर शहर स्वच्छताकामी तुळजापूर नगरपरिषदेने शहराचे 24 झोन तयार केले होते त्यापैकी 1 ते 12 झोनची स्वच्छता तुळजापूर नगरपरिषदेमार्फत करण्यात आली. उर्वरीत 13 ते 24 झोनमध्ये निवासी नायब तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, कळंब, उमरगा, भूम, तहसिलदार उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, वाशी, भूम, परंडा, लोहारा, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षण, उस्मानाबाद, व्यवस्थापक जिल्हा ग्रंथालय, उस्मानाबाद, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा उस्मानाबाद, जिल्हा कोषागार अधिकारी, उस्मानाबाद, अधीक्षक, भूमी अभिलेख उस्मानाबाद व सर्व उप अधीक्षक, भूमी अभिलेख, उस्मानाबाद यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी स्वच्छता केली.
            स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, नगरपालिकेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची असल्याचे सांगितले. महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपणाला, भारतमातेला मुक्त केले. स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपल्या देशाच्या विकासासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी अस्वच्छतेतून मुक्ती देण्यासाठी प्रत्येकाचा पुढाकार महत्त्वाचा आहे.  
आज झालेल्या स्वच्छता अभियानातून प्रत्येकालाच श्रमदानाचे महत्त्व कळले. शिवाय स्वच्छतेबाबत जागृतीची जबाबदारीही आपल्यावर असल्याचे समजण्यास मदत झाली.  
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी स्वत: तुळजाभवानी मंदीर परिसराची स्वच्छता, साफसफाई केली. त्यांच्या सोबत इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवुन परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छतेच्या अभियानातून विकासाचा ध्यास घेऊ, असेही उपस्थितांना स्वत:च्या कृतीतून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी संदेश दिला.
यावेळी महाविद्यालयीन, शाळा, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधीही या अभियानात हिरीरीने सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला. अशा प्रकारे शहरातील प्रमुख अशा 24 झोनमध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी –कर्मचारी यांनी अनोख्या पद्धतीचे स्वच्छता अभियान राबवून जनतेत जागृती केली. या अभियानात मोठया संख्येने नागरिक, युवक-युवतींनी तुळजापूर शहरासह मंदीर परिसरातील सर्व ठिकाणी स्वच्छता करुन सहभाग नोंदवला.

Thursday, 5 October 2017

कोजागिरीनिमित्त तुळजापुरात भाविकांची मांदियाळी तुळजापूर-सोलापूर रस्ता भाविकांनी फुलला






उस्मानाबाद,दि.05 : गुरुवार दिनांक 05 रोजी पहाटे श्री. राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिरात पूजा झाली. यावेळी   अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सुनिल पवार,  तुळजापूरचे तहसिलदार  दिनेश झांपले, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गोंधळी व भाविक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
 शारदीय नवरात्र महोत्सव व कोजागिरी पोर्णिमा निमित्त सोलापूर जिल्हा व शेजारील राज्यातून भाविक पायी चालत येत असतात. या भाविकांच्या मांदियाळीने संपूर्ण तुळजापूर-सोलापूर रस्ता फुलून गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. या लाखो भाविकांनी  तुळजापुरात पायी चालत येऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आनंद उत्साहच साजरा केल्याचे चित्र दिसून येत होते. भाविकांमधील उत्साह कौतूकास्पद होता आणि प्रत्येक भाविक आपण तुळजापूरात देवीच्या दर्शनासाठी पायी चालत आल्याचा आनंद प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यावेळी प्रशासनाकडून मुख दर्शन, धर्मदर्शन आणि शिखर दर्शनाची स्वतंत्र रांगेत सोय करण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होत असल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरसह विजापूर, इंडी  यासह कर्नाटक राज्याच्या विविध भागातील भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुराकडे येत असल्याचे चित्र होते. युवा वर्ग, महिला याबरोबरच काही वृद्ध भाविकही पायी चालत येताना दिसत होते.
         भाविकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, व्यवस्थापक (प्रशासन)  सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

गुरूवार, दि. 05 रोजी  श्री तुळजाभवानी देवीची रात्रौ सोलापूरच्या काठयासह छबीना होणार आहे. 

Tuesday, 3 October 2017

मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम


उस्मानाबाद,दि.3: भारत निवडणूक आयोगाच्या No Voter To Left Behind या घोष वाक्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक मतदारांची मतदार यादीमध्ये नोंदनी करण्याचे  उद्दीष्ट  साध्य करण्याचे आदेशित केले आहे.
          तरी उस्मानाबाद तालुक्यातील सर्व तरुणांनी आपले नाव मतदार यादीत नोंदनी करावे, मतराद यादीत नाव नोंद करण्यासाठी एक रंगीत फोटो, वय पुरावा व रहिवाशी पत्रांसह अर्ज नमुना 6 (सहा) भरून देण  आवश्यक आहे. सदर कार्यक्रम  दि.3 ऑक्टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
          तसेच उस्मानाबाद तालुक्यातील मतदारांना आवाहन करयाण्यात येते की, त्यांनी आपले मतदार यादीत नाव आहे किंवा नाही हे संबंधित मतदान केद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यकडील मतदार यादीत खात्री करून तसेच स्थलांतरीत दुबार व मयत लोकांची नावे वगळण्यासाठी मतदारांनी स्वत: किंवा त्यांच्या कुटंबातील व्यक्तींनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नमुना 7 भरून देणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे आढळून आल्यास लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 च्या 17, 18 व 31 नसुार गुन्हा नोंद करण्यात येईल तसेच मतदार यादीत नाव आहे परंतु फोटो नाही अशा मतदारांनी  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)यांच्याकडे फोटो जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा सदरील नाव वगळण्यात येतील असे आवाहन तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदनी अधिकारी उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.