Tuesday, 20 June 2017

आंतरराष्ट्रीय योग दिनी आयाेजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन


उस्मानाबाद,दि.17:-  तृतीय आंतरराष्ट्रीय योग दिन बुधवार 21 जून रोजी जिल्हयात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे,त्या अनुषंगाने 21 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत पोलीस मुख्यालय मैदान, उस्मानाबाद या ठिकाणी योगाबाबत कार्यक्रम होणार आहे. परंडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर सकाळी 6 वाजता होणार आहे.तुळजापूर येथे सैनिक स्कूलच्या मैदानावर सकाळी 6.30 वाजता हाेणार आहे. 
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे नितीन तावडे, नेहरु युवा केंद्राचे  धनंजय काळे, लोकमंगल फाउंडेशनचे रामराजे पाटील, आर्ट ऑफ लिव्हींगचे  नितीन भेासले, रोटरी क्लबचे प्रदीप मुंडे यांनी केले आहे

उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत लाभार्थींचा जेष्ठता सोडत कार्यक्रम


उस्मानाबाद,दि.20:- उन्नत शेती – समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत विविध योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुक शेतकऱ्यांचे 15 जून 2017 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
भूम,परंडा,कळंब व वाशी  तालुक्यातून प्राप्त झालेल्या अर्जांची जेष्ठता यादी तयार करण्यासाठी दि. 22 जून 2017 रोजी कृषी चिकित्सालय वाशी येथे सोडत काढण्यात येणार असून भूम तालुक्याची   सकाळी  11 वाजता व परंडा तालुक्याची दुपारी 2 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.वाशी तालुक्याची दि.23 जून 2017 रोजी सकाळी 11 वाजता तर कळंब तालुक्याची दुपारी 2 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी या सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन भूम उपविभागीय कृषी अधिकारी श्री.आर.टी.जाधव यांनी केले आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर


उस्मानाबाद,दि.20:-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस नियमित,पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  जुलै- ऑगस्ट 2017 परीेक्षा आयोजित करण्यात आली आहे,त्यासाठी सोमवार दि.19 जून 2017 पासून परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली असल्याची  माहिती लातूर विभागीय मंडळाद्वारे देण्यात आली आहे.
या परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने  www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्र नियमित शुल्क सोमवार दि.19 ते 26 जून 2017 पर्यंत तर माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क मंगळवार दि.27 ते 30 जून पर्यंत भरावयाचे आहे. माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्र विलंब शुल्क मंगळवार दि.27 ते 30 जून 2017 पर्यंत तर शाळांनी बँकेत चलनाद्वारे विलंब शुल्क दि.1 ते 5 जुलै 2017 पर्यंत भरावयाचे आहे तर शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या शुक्रवार दि.7 जुलै 2017 पर्यंत जमा करावयाच्या आहेत. 
परीक्षेची आवेदनपत्रही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या शाळांमार्फत भरावीत, श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै –ऑगस्ट 2017 व मार्च -2018 अशा दोन संधी उपलब्ध राहतील.माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) सप्टेंबर –ऑक्टोबर 2017 मध्ये घेतली जाणार नाही, याची विद्यार्थी,पालक,मुख्याध्यापक व सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असेही मंडळाद्वारे कळविण्यात आले आहे.