Wednesday, 25 January 2017

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न


          उस्मानाबाद,दि.26:-  भारतीय प्रजासत्ताक  दिनाच्या 67 व्या वर्धापन  दिनानिमित्त आज जिल्ह्यात  सर्वत्र  उत्साहाने साजरा  करण्यात आला .  यानिमित्त  विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित  करण्यात आले. येथील  पोलीस संचलन मैदानावर  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते  मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दीपाली घाटगे,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव उपस्थित होते.
            प्रारंभी  सकाळी 9.15 वाजता  जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते  ध्वजारोहण  होताच पोलीस  दलाने  राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. त्यानंतर पोलीस दलाचे महिला व पुरुषांचे पथक, गृहरक्षक दल, शीघ्र कृती दल,जलद प्रतिसाद  पथक, श्वान पथक,दंगल नियंत्रण  पथक  आदी पथकांच्या  संचलनाची  मानवंदना  डॉ. नारनवरे यांनी स्विकारली.
            संचलनात विविध  विभागांचे  आकर्षक  चित्ररथही  सहभागी झाले होते.  संबंधित  विभागांच्या  योजनांची माहिती दर्शविणारे हे चित्ररथ  लक्ष वेधून  घेत होते. यात  जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत  मिशन कक्ष,  आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग,अग्निशमन, बॉम्बशोधक, पोलीस  विभागाचे महात्मा गांधी तंटामुक्तगाव मोहीम पथक,आपत्ती व्यवस्थापन पथक,वन विभाग,जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुसज्ज रुग्णवाहिका,  महिला छेडछाडविरोधी पथक ,  होमगार्ड्स , स्काऊट गाईड्स आदी सहभागी झाले होते .
        जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी यावेळी समारंभाला उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी , विविध मान्यवर,उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर,उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते नक्षलग्रस्त  विभागात  दाखविलेल्या  कठीण व  खडतर कामगिरीबद्दल सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र  आनंदराव बनसोडे, सायबर सेलच्या सहायक पोलीस  निरीक्षक श्रीमती विरयानी कदम,  येरमाळा येथील सहायक पोलीस निरीक्षक विनोद  बापुराव  चव्हाण यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स ,मुंबई राष्ट्रपती  पुरस्कार चाचणी शिबिर-2015 यासाठी निवड झालेल्या बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या कु.पद्मजा लक्ष्मण मुळे, कु. श्वेता दत्तात्रय मुंडे आणि कु. भारती  नंदकुमार  मानाळे या विद्यार्थीनींचाही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या समारंभाच्या शेवटी यमगरवाडी येथील  एकलव्य आदिवासी आश्रमशाळा,  ग्रीनलँड हायस्कूल व लिटलस्टार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
****                           
जिल्हाधिकारी कार्यालयात  डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
            दरम्यान येथील  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता  ध्वजारोहणाचा  कार्यक्रम पार पडला . याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार सुजित नरहरी यांच्यासह  महसूल विभागाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते .  ****


मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक
यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त  येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे अप्पर  जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या प्रारंभी प्रथम पोलीस विभागाने सलामी दिली. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपयांत्रिकी विभाग, उस्मानाबाद कार्यालयातील सेवक श्री .परिमल यांनी राष्ट्र भक्तीपर गीत गाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांची मने जिंकली या  ध्वजारोहण कार्यक्रमास प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे,विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, सहायक निबंधक श्री. शिंदे,उप विभागीय कृषी अधिकारी श्री.बिराजदार तसेच सहकार, वन विभाग, जलसंधारण, नेहरु युवा केंद्र व अन्य विभागाचे अधिकारी -कर्मचारीमोठया संख्येने  उपस्थित होते.













विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत


उस्मानाबाद,दि.25:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृर्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दि.31 जानेवारी 2017 अखेर पर्यंत अर्ज भरावेत, विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. 
        ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र,वय,उत्पन्न व रहिवास दाखला, मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला इत्यादी कागदपत्रे शाळा, महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांस मिळणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या  बँक खात्यावर  आणि शिक्षण फी ची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यासाठी पुढील बाबीची पूर्तता विद्यार्थी, पालक यांनी त्यांच्या  शाळा, महाविद्यालयाकडे करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
         विद्यार्थ्यांचे आपल्या आधार कार्ड क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे,त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले असल्याबाबतचा पुरावा म्हणून बँकेकडून आधार संलग्नता केल्याबाबतची पावती सोबत जोडावी,विद्यार्थी, पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि बँकेशी संलग्न केल्याबाबत पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली जाईल.

            लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही त्यांच्याच खात्यावर जमा व्हावी व त्या खात्याचा गैरवापर होऊ नये या हेतूने प्रत्येकांना आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी संलग्न करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची अनियमित्ता व बोगसगिरी करण्यास वाव राहणार नाही, जिल्हयातील सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयास आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापल्या बँकेत जावून आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावेत. त्यासाठी आवश्यक तो अर्ज भरून बँकेकडे द्यावा आणि त्या पोच पावतीची प्रत आपल्या स्कॉलरशीप अर्जा बरोबर जोडावी,  ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृर्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दि.31 जानेवारी 2017 अखेर पर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री.शेळके यांनी केले आहे.  

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेसाठी निश्चय…!


      उस्मानाबाद,दि.25:-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताकदिनाच्या 67 व्या वर्धापणदिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेची मोहिम हाती घेऊन प्रशासकीय इमारत परिसरातील  स्वच्छता करून अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून स्वच्छतेचा नवीनच पायंडा पाडला. आता इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी एक तास हे सर्व  अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेकरिता श्रमदान करतील अशी प्रतिज्ञाच सर्वांनी मिळून केली आहे.
       जिल्हा माहिती  कार्यालय, उस्मानाबाद यांच्या पुढाकाराने त्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून या इमारतीमधील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी हिरारीने सहभाग नोंदवून परिसराची स्वच्छता केली.
       या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, विभागीय वन अधिकारी श्री. सातेलीकर, कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, कृषी विभागाचे प्रशासकीय अधिकारी गणेश गोरे, लेखाधिकारी श्री.जोशी तसेच श्री.शहा, श्री.कुलकर्णी यांच्यासह मध्यवर्ती इमारतीतील अन्य अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते या मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन विभाग, उस्मानाबाद नगर पालिका, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग, वन विभाग आदी विभागांनी एकत्रीत मोलाचे सहकार्य केले.