Friday, 4 November 2016

रब्बी हंगाम 2016-17 साठी लाभधारकांनी पाणी वापरासाठी सुधारित नमुन्यात अर्ज करावेत


उस्मानाबाद,दि.4:- सन 2016-17 लातूर जिल्हयातील या विभागांतर्गत मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, साठवण तलाव को.प.ब. लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगामामधील पिकांना पाणी देण्यासंबंधी प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्धतेनुसार प्रकल्पीय पीक रचनेनुसार पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे   लातूर पाटबंधारे  विभागाचे  कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे .
संबंधित प्रकल्पातील व प्रकल्पीय पीक रचना व प्रकल्पनिहाय देण्यात येणाऱ्या पाणीपातळी कार्यक्रमासंबंधी कार्यालयास उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध साठ्यापैकी पिण्यासाठी, वापरासाठी प्राधान्याने आरक्षित केलेला पाणीसाठा वगळता उर्वरित पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जाईल.
सर्व लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना नं.7 व 7-अ शासनाने सुधारित केलेल्या नमुन्यात संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात दि.30 नोव्हेंबरपर्यत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सादर करावेत. कमी पाण्यात येणारी रब्बी हंगामी पिके व लाभक्षेत्रातील प्रवाही वरील उभा ऊस (हंगामी मंजूर) कालावधी दि.15 ऑक्टोंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 असा आहे.
नियम व अटी पुढीलप्रमाणे राहतील- ज्या जमिनीसाठी पाणी मागणी करावयाची आहे त्या जमिनीचा मालक अथवा सामाईक मालक असला पाहिजे,

ज्या मुदतीसाठी पाणी दयावयाचे आहे त्या कालावधीत ती जमीन त्याच्या वहिवाटीस असावी, पाणी अर्जासोबत मागील थकबाकी पूर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी,पाणी अर्जासोबत 7/12 उतारा किंवा खाते पुस्तिका सादर पावती करावी,पाणी मागणी अर्ज 20 आर च्या पटीत असावेत,तसेच अर्जासोबत थकबाकी पाणीपटृी भरल्यानंतर पाणी अर्ज मंजूर करण्यात येईल, पाणी अर्ज मंजूर झाल्यानंतर मंजूर पिकास पाणी घ्यावे व सोबत पास ठेवावा,आपआपल्या हद्दीतील शेतचारी दूरुस्तीची जबाबदारी संबंधित बागायतदाराची राहील.शेतचारी नादुरुस्त असल्यास मंजूरी दिली जाणार नाही व पाणी दिले जाणार नाही,मंजूरीपेक्षा जास्त क्षेत्र सिंचित केल्यास हंगामी दराच्या सव्वापट दराने आकारणी केली जाईल, पाणी अर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय आकारणी केली जाईल, पाट मोठा संबंध नसावा दोन्ही चारीत कमीत कमी 10 फूट अंतर ठेवावा, कालव्यावरील उपसा सिंचन परवाना धारकांने त्याचे मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी घ्यावे कालव्याच्या पुच्छ ते शिर्ष याप्रमाणे सिंचन नियोजन असल्यास मंजूर कालावधी सोडून मोटारी चालू ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 77 नुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे,मोटारी जप्त करणे,पाणीपरवाना रदृ करणे, व बिगर पाळी पंचनामा करणे अनिवार्य ठरले याची नोंद घ्यावी, शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या प्रचलित पाणीपटृीच्या दराने आकारणी करण्यात येईल,त्यावर 20 टक्के स्थानिक कर आकारला जाईल,नियोजित कोटपेक्षा जास्त पाणी सिंचनासाठी वापरता येणार नाही,उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी कळविले  आहे.

फळपिक विमा योजनासाठी प्रस्ताव सादर करावेत-जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे

प्रधानमंत्री फसल वीमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित
फळपिक विमा योजनासाठी प्रस्ताव सादर करावेत
                                                       -जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे
उस्मानाबाद,दि.4:-प्रधानमंत्री फसल वीमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जिल्हयासाठी आंबिया बहाराकरिता द्राक्ष, केळली,आंबा,डाळिंब,मोसंबी व पेरू या पिकासाठी लागू केलेली आहे.या योजनेंतर्गत सन 2016-17 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना द्राक्ष, डाडिंब, मोसंबी, पेरू व केळी या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅकेत दाखल करण्याची अंतिम दिनांक 10 नाव्हेंबर 2016 तर आंबा या पिकासाठी विमा प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे.
शेतकऱ्यांनी हवामान धोक्यापासून संरक्षणाकरिता प्रति हेक्टर द्राक्ष पिकासाठी रूपये 12 हजार 150, केळी पिकासाठी रूपये 5 हजार 750,डाळिंब या पिकासाठी रूपये 5 हजार 500 ,मोसंबी या पिकासाठी रूपये 3 हजार 500, पेरू या पिकासाठी रूपये 2 हजार 500, तर आंबा या पिकासाठी रूपये 5 हजार 500 इतका विमा हप्ता बॅकेत हप्ता भरून पिक संरक्षित करावे, तर गारपिटपासून संरक्षण करण्याकरिता प्रति हेक्टरी द्राक्ष पिकासाठी रुपये 4 हजार 667 ,केळी पिकासाठी रुपये 1 हजार 898 , डाळींब यापिकासाठी रूपये 1 हजार 815 ,मोसंबी या पिकासाठी रूपये 1 हजार 115, पेरू या पिकासाठी रूपये 825,तर आंबा या पिकासाठी 1 हजार 815 इतका विमा हप्ता बॅकेत भरून पिक संरक्षित करावे, या योजनेंतर्गत फळपिकांना कमी जास्त पाऊस, पावसाचा खंड, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आद्रर्ता या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.
        प्रधामंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2016-17 साठी आंबिया बहाराकरिता फळपिकनिहाय अधिसुचित तालुके व महसूल मंडळे पुढीलप्रमाणे- फळपिकाचे नाव द्राक्ष,केळी,आंबा,व डाळिंब अधिसूचित तालुके उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुके व सर्व महसूल मंडळे.मोसंबी उस्मानाबाद-उस्मानाबाद (ग्रा), जागजी, तुळजापूर –सर्व महसूल मंडळे,भूम-वालवड,माणकेश्वर,अंभी व ईट, परंडा-सर्व महसूल मंडळे, लोहार, पेरू- उस्मानाबाद-सर्व महसूल मंडळे, तुळजापूर सर्व महसूल मंडळे, भूम-भूम, वालवड, अंभी व ईट, परंडा, उमरगा, वाशी, लोहारा- सर्व महसूल मंडळे.

        वरिलप्रमाणे नमूद केलेल्या पिकासमोरील महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल तसेच सर्व मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक श्री. शिरीष जमदाडे यांनी केले आहे.

'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी

मुंबई, दि. 03 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर ' महाराष्ट्र माझा शेतकरी राजा ' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 10 नोव्हेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.

परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी  संपर्क साधावा.