Friday, 7 October 2016

श्री तुळजाभवानी देवीजींचे शेषशाही अलंकार महापूजा



शारदीय नवरात्र महोत्सव-2016
                             
          उस्मानाबाद,दि.7:शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सातव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.  श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी  विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी  मातेने केला, म्हणून विष्णूने आपली शेषशय्या श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते.
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान काल रात्री दि.6 ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या दि.8 ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.      

Thursday, 6 October 2016

श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेकरिता भाविकांची प्रचंड गर्दी



  
          उस्मानाबाद, दि.6:- शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन मिळत आहे.
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री देवीजींचे या रुपातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पाचव्या माळेपासून  विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.        
भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, व्यवस्थापक (प्रशासन)  सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दरम्यान काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि.7) श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.                            ****
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी दिल्या आरोग्यदायी सोयीसुविधा
शारदीय नवरात्रौ महोत्सवात सोलापूर,नळदूर्ग, लातूर आदींसह हैद्राबाद, कर्नाटक, तेलंगणा आदी  ठिकाणाहून भाविक तुळजापूर  येथे दर्शनासाठी येतात . यात महाराष्ट्रासह परराज्यातून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने त्यांच्या पायाला इजा होते त्याकरिता त्यांना तात्काळ आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहे. तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवासाठी देवीजींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांची मोठी गर्दी होत आहे.  त्यामुळे काही अघटित घटना  घडल्यास  जखमी व्यक्तीला तात्काळ  आरोग्य  सेवा मिळावी  या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकूण 14 प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
तसेच भाविकांच्या आरोग्याच्या  दृष्टीकोनातून तुळजापूर शहरातील  शुध्द पाणी , स्वच्छता , आहार इत्यादीबाबत  सनियंत्रणासाठी  नोडल ऑफिसर म्हणून  निवासी  वैद्यकीय अधिकारी  डॉ. आनंद सोपल  यांची  नेमणूक करण्यात आली आहे . तसेच  रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना करण्यात आली आहे.आपत्कालीन  व्यवस्थापन नियोजन  करण्यासाठीही   डॉ. गलांडे,  डॉ. होनमाने,  डॉ. शिंदे , डॉ. डुकरे ,डॉ. रोचकरी  यांची नोडल ऑफिसर म्हणून  नेमणूक करण्यात आली आहे . याशिवाय नवीन व जुन्या बसस्थानकावर  येणाऱ्या  वय वर्षे 30 वर्षांपुढील  सर्व भाविकांची  आरोग्य विभागाचे  अधिकारी-कर्मचारी  उच्चरक्तदाब व मधुमेहाची तपासणी करीत आहेत.
 या केंद्रांसाठी 12 वैद्यकीय अधिकारी , 146 आरोग्य कर्मचारी , चार 108 क्रमांकाच्या विशेष सुसज्ज रुग्णवाहिका तुळजापूर येथे तैनात आहेत . याशिवाय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची मदत भाविकांना मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्षही येथे सुरु करण्यात आला आहे.या यात्रेमध्ये  देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये  वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सहायक श्री. आर.एस. हजगुडे, श्री. एस.व्ही. तीर्थकर,  आरोग्य कर्मचारी श्री. एन.एल. लंगडे, श्री.टी.एस.माळी , श्री.यु.एच.अडसूळ यांचे विशेष सहकार्य भाविकांना मिळत आहे.
आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा भाविक चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा प्रशासन आणि  मंदिर संस्थान यांच्या मार्गदशर्नाखाली आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे  या यात्रेकरिता आलेल्या  भाविकांना उत्तमप्रकारे  आरोग्याच्या  सोयी सुविधा उपलब्ध  करुन देत आहेत .

Wednesday, 5 October 2016

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच-पालकमंत्री डॉ. दीपक सावंत






उस्मानाबाद.दि.5:-जिल्ह्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या  पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी बोलताना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणारच, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी  आज येथे केले .
जिल्ह्यात  21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2016 या कालावधीत  अतिवृष्टीने  सोयाबीन , तूर , खरीप ज्वारी , बाजरी , मूग , उडीद ,  कापूस , भात , केळी , पपई , भुईमूग , मका , भाजीपाला   इत्यादी  पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त  नुकसान  झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  काल दिनांक 4 ऑक्टोबर  रोजी रात्री  वाशी तालुक्यातील  पारगाव, मलकापूर, हातोला, जेबापिंप्री या गावांमध्ये तर  आज सकाळी  उस्मानाबाद तालुक्यातील  राजुरी , काक्रंबा , लोहारा तालुक्यातील  माकणी ,  उमरगा तालुक्यातील  गुंजोटी  या गावांमधील पाणीसाठा , अतिवृष्टीमुळे झालेल्या  पिकांची व इतर नुकसानीची पाहणी केली. यावेळी माकणी येथे पालकमंत्री श्री. सावंत  यांनी जलपूजनही  केले.
तालुकानिहाय  बाधित शेतकऱ्यांची संख्या, पेरणीलायक क्षेत्र , पेरणी केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे -  उस्मानाबाद 34 हजार 392, 1 लाख 2 हजार 100, 91 हजार 770, तुळजापूर -23 हजार 732, 85 हजार 700,  91 हजार 511 , उमरगा -20 हजार 22 , 76 हजार , 78 हजार 87 ,  लोहारा -21 हजार 791 , 26 हजार 600,  37 हजार 961 , भूम -15 हजार 235 , 37 हजार 200 , 54 हजार 429 ,  परंडा -6 हजार 696 , 22 हजार 400,  40 हजार 777,  कळंब-25 हजार 319 , 80 हजार 900,74 हजार 263  आणि वाशी  10 हजार 564 , 41 हजार 700, 39 हजार 441 . जिल्ह्यात एकूण  जवळपास  5 लाख हेक्टर आर क्षेत्रावर पेरणी झाली होती  मात्र अतिवृष्टीने जवळपास 3 लाख हेक्टर आर क्षेत्र बाधित झाले आहे . 
याबाबत पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शेतकऱ्यांना त्यांनी कोणत्याही  प्रकारची चिंता करु नये, शासन  खंबीरपणे  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभे राहील तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला  आवश्यक व योग्य ती  मदत दिली जाईल,असे आश्वासन देवून धीर दिला . 

यावेळी  त्यांच्यासमवेत  आमदार  ज्ञानराज चौगुले  , जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते ,  जिल्हा  कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे,  , जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. एकनाथ माले ,   उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर , श्री निलेश श्रींगी ,  उपजिल्हाधिकारी  श्रीमती अर्चना नष्टे , लघुसिंचन  पाटबंधारे  विभागाचे  कार्यकारी अभियंता  श्री. दशरथ देवकर,  तहसिलदार  दिनेश  झांपले ,  उपविभागीय  कृषी अधिकारी  श्री. बिराजदार आदी  उपस्थित होते .