Saturday, 20 August 2016

मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारोप उत्साहात साजरा


उस्मानाबाद,दि.20:-स्टेट बँक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जुलै ते 19 ऑगस्ट 2016 या कालावधीत आयोजित मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारोप कार्यक्रम नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विनायक कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
            यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे व्यवस्थापक निलेश विजयकर, उमेद चे शंकर पवार,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, संस्थेचे संचालक मिलिंद सावंत उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक विजय कोठारी म्हणाले की, प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले स्वत:चे उद्योग उभारावेत,  शासन उद्योग व्यवसायासाठी सर्वोतोपरी सहकार्य करील.या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उमेद चे शंकर पवार म्हणाले की, पैशाची किंमत स्वत:च पैसा कमविल्यानंतर कळते,मोबाईल दुरूस्ती उद्योग सुरू करण्यासाठी जास्त्‍ भाग भांडवलाची आवश्यकता नाही, हा उद्योग 1 हजार रूपयातही चालू करता येवू शकतो.तरी प्रशिक्षणार्थींनी कौशल्य वापरून स्वत:चे व्यवसाय सुरू करावेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपली ओळख आपल्या कामाने होते. आपण उद्याचे उद्योजक बनाल, आजूबाजूचा विचार करा,शासकीय योजनांचा,उद्योगांचा विचार करावा,त्यांचा अभ्यास करावा. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास जपा, तोंडात साखर ठेवा, आव्हाने स्वीकारा, सचोटीने काम करणाराच मोठा होतो. कोणाशी तुलना करू नका,स्वार्थी भावना ठेवू नका. आपण उद्याचे यशस्वी उद्योजक निश्चित बनाल, अशा शुभेच्छा देवून
श्री. सानप यांनी प्रशिक्षणार्थ्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे  उपक्रम, “लोकराज्य” मासिक, “महान्यूज” वेबपोर्टल यांचे  महत्व आणि उपयोगिता  समजावून सांगून संपूर्ण बॅचने 100 टक्के “लोकराज्य” चे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन केले, त्यांच्या या आवाहनाला  स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने व प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद  देवून “लोकराज्य” चे सभासदत्व स्वीकारले.
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत  व्यक्त करताना एक महिन्याच्या प्रशिक्षणातील अनुभवाचा उजाळा देवून कृतज्ञता व्यक्त केली, आम्ही या प्रशिक्षणामुळे स्वत:च्या पायावर उद्योग उभारणीचे प्रयत्न करू असे सांगून  आम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी करू,तसेच त्या माध्यमातून समाजाचा व गावाचा विकास साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असा संकल्प केला.

यावेळी  संस्थेचे संचालक श्री. मिलिंद सावंत, लिड बॅंकेचे व्यवस्थापक श्री. निलेश विजयकर, नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. विनायक कोठारी , उमेद चे श्री. शंकर पवार, प्रशिक्षक श्री. विकास गोफणे, श्रीमती जीवनज्योती सरपाळे, कलीम शेख, नंदकिशोर सुरवसे, श्री. राऊत  हे उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयात छायाचित्रकारांना शुभेच्छा देवून जागतिक छायाचित्रदिन साजरा


   उस्मानाबाद, दि. 20 :-जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून आज जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हयातील छायाचित्रकारांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या हस्ते शुभेच्छांसह पुष्पगुच्छ देवून उत्साहाने साजरा करण्यात आला. 
             या कार्यक्रमास जिल्हयातील छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
            कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी सर्व छायाचित्रकारांबरोबर अनौपचारीक चर्चा करुन त्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपक्रम लोकराज्य मासिक, महान्यूज वेबपोर्टल यांचे महत्व आणि उपयोगिता समजावून आपणाकडील जिल्हयाविषयीची दुर्मिळ छायाचित्रे तसेच
जिल्हयातील विकासकामांविषयीची छायाचित्रे या कार्यालयाकडे पाठविण्याचे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून सर्वच छायाचित्रकारांनी  होकार दर्शवून सहकार्याची भूमिका दाखविली. याआधी जागतिक छायाचित्रदिनानिमित्त उस्मानाबाद प्रेस फोटोग्राफर मित्रपरिवाराच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळा येथे वृक्षारोपण करुन जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.
            यावेळी जिल्हयातील छायाचित्रकारांच्या वतीने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना तैलचित्र व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच सद्भावनादिनानिमित्त स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सर्व छायाचित्रकारांनी  सद्भावना प्रतिज्ञा घेतली.
            याप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती अशा बंडगर, भिमराव पडवळ, दिलीप वाठोरे, आ.ना. सोनवणे ,सिध्देश्वर कोंपले, अनिल वाघमारे व श्रीमती चित्रा घोडके उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा



उस्मानाबाद,दि.20:- जिल्हाधिकारी कार्यालयात आज माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत शपथ घेवून सद्भावना दिन साजरा करण्यात आला.

            यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) अरविंद लाटकर, तहसिलदार (महसूल) राजकुमार माने, नायब तहसिलदार ए. पी. जाधव, एन.आर. सूर्यवंशी आणि  कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.