Thursday, 27 August 2026
नेपाळमध्ये अडकलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी – जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आवाहन
नेपाळमध्ये अडकलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिक व पर्यटकांनी माहिती नोंदवावी – जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आवाहन
धाराशिव,दि. २७ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून,तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक नागरिक व पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे.या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक ती मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत माहिती नोंदविण्यासाठी विशेष लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माहिती नोंदविण्यासाठी लिंक :
🔗 https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असतील किंवा त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी अथवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन संबंधित नागरिकाची सविस्तर माहिती भरावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
तसेच,संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र,तथा वार रूम जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथेही तात्काळ संपर्क साधावा.
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, धाराशिव
☎️ 02472 _225618/224366
☎️ 1077 (टोल फ्री)
माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव,मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल,प्रवासाचा तपशील तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक, उपलब्ध असल्यास,अचूकपणे नमूद करावा.
धाराशिव जिल्ह्यातील पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास घाबरून न जाता उपलब्ध अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदवावी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.
कीर्ती किरण पूजार,
जिल्हाधिकारी,धाराशिव
Tuesday, 25 August 2026
स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहास अर्ज करणे बंधनकारक
स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहास अर्ज करणे बंधनकारक
धाराशिव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते.या वसतिगृहांमध्ये शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.धाराशिव जिल्ह्यात एकूण ११ शासकीय वसतिगृहे आहेत.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून,प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येते.मात्र, स्वाधार योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यानुसार इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी http://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
****
नेत्रदान ही कौटुंबिक प्रथा होणे आवश्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर
नेत्रदान ही कौटुंबिक प्रथा होणे आवश्यक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर
धाराशिव,दि.२५ ऑगस्ट ( जिमाका) राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ४१ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.या पंधरवड्याचा उद्घाटन समारंभ आज, २५ ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयातील नेत्रविभागात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील यांनी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करून नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेत्रशल्यचिकित्सक डॉ. ज्योती कानडे यांनी मरणोत्तर नेत्रदानाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.नेत्रदान म्हणजे काय, नेत्रदान कोण करू शकतो, नेत्रदानाची आवश्यकता व महत्त्व, नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज तसेच कोणाला नेत्रदान करता येत नाही, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या नातेवाईकांचा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सुरेश शेळके, श्रीमती लक्ष्मी माने आणि राजेश तोष्णीवाल यांचा समावेश होता.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. धनंजय चाकुरकर म्हणाले, एखाद्या व्यक्तीला डोळ्यांची गरज किती असते, हे एखाद्या अंध व्यक्तीला विचारावे. कोणत्याही कारणामुळे अंधत्व आले तर दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्याची सुरुवात स्वतःपासून करावी.
नेत्रदानाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊन प्रत्येक कुटुंबाच्या ज्या प्रथा-परंपरा असतात,त्याप्रमाणे मरणोत्तर नेत्रदान हीदेखील कौटुंबिक प्रथा बनली पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.नेत्रदान आणि अवयवदान ही एक चळवळ समजून प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग वाढविणे गरजेचे आहे.सर्वांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नेत्रविभागाचे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील,डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ. ज्योती कानडे, डॉ.पवन महाजन, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे,श्रीकांत कल्याणी,उमेश गोरे, नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज श्रीमती वहीदा शेख तसेच नेत्रविभागातील सर्व नर्सिंग स्टाफ, वर्ग-४ कर्मचारी,रुग्णालयातील रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नेत्रविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. महेश पाटील यांनी केले.
*****
Subscribe to:
Posts (Atom)


