Tuesday, 25 August 2026
स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहास अर्ज करणे बंधनकारक
स्वाधार योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहास अर्ज करणे बंधनकारक
धाराशिव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येते.या वसतिगृहांमध्ये शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.धाराशिव जिल्ह्यात एकूण ११ शासकीय वसतिगृहे आहेत.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून,प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येते.मात्र, स्वाधार योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यानुसार इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी http://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
****