Thursday, 27 August 2026
नेत्रदान : अ गिफ्ट ऑफ व्हिजन
नेत्रदान : अ गिफ्ट ऑफ व्हिजन
भारतीय संस्कृतीत दानाला सर्वात मोठे स्थान आहे.मग ते रक्तदान,भूदान, कन्यादान किंवा अन्नदान असो.या विविध मार्गाने मनुष्य दानधर्म करून पुण्य कमावण्याचा प्रयत्न करतो.कारण मृत्यूनंतर पैसा,संपत्ती यापैकी काहीही सोबत येणारे नसते. सोबत येणारे असते ते फक्त आपण केलेले पुण्यकर्म.हा झाला अध्यात्मिक बाबतीतला विचार.परंतु यापेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणता येईल, असे एखादे माणुसकीच्या दृष्टीने दान असू शकते का तर होय! ते म्हणजे नेत्रदान होय.कारण एका व्यक्तीच्या नेत्रदानातून दोन व्यक्तींना दृष्टी देण्याची किमया फक्त नेत्रदानात आहे.परंतु नेत्रदान जरी पुण्यकर्म असले तरी याबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोनाचा मोठा अभाव दिसून येतो.सद्य:स्थितीत नेत्रदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन व जनजागृती वाढविण्यासाठी शासन तसेच काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.येणाऱ्या काळात नेत्रदानाबाबत संपूर्ण समाजात सकारात्मक दृष्टिकोनातून जनजागृती नक्कीच होईल.याचाच एक भाग म्हणजे भारत सरकार,महाराष्ट्र शासन व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी संपूर्ण भारतात दि.२५ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो.यावर्षीही हा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. समाजातील बुबुळजन्य आजारामुळे आलेल्या अंधत्वाची समस्या पाहता मृत्यूनंतर नेत्रदानाचे प्रमाण वाढावे, हा त्यामागील उद्देश आहे.त्याकरिता या कालावधीत विविध माध्यमांतून समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.संस्कृतमध्ये असे म्हटले जाते,‘सर्व इन्द्रियाणां नयनं प्रधानम्’, म्हणजे शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये डोळ्याचे स्थान प्रथम आहे.यातूनच डोळा किंवा नेत्र हा मानवी शरीरातील किती महत्त्वाचा भाग आहे,हे समजून येते.
अंधत्वाची सद्य:स्थिती
सध्या भारतामध्ये १.२५ कोटीच्या आसपास लोक दृष्टीहीन असून, त्यापैकी पारदर्शक पटल (Cornea) च्या बुबुळजन्य आजारामुळे (Corneal Blindness) अंदाजे ६५ लाख लोकांना अंधत्व आलेले आहे.असे आलेले अंधत्व साध्या सरळ नेत्रदानातून प्राप्त नेत्रबुबुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने दूर होऊ शकते.याकरिता मरणोत्तर नेत्रदानातून दरवर्षी १ लाख पारदर्शक नेत्रबुबुळांची आवश्यकता असते.परंतु वर्षाकाठी केवळ २५ ते ३० हजार डोळे मरणोत्तर नेत्रदानातून प्राप्त होतात.त्यापैकी ८ ते ९ हजार डोळे अंधावर शस्त्रक्रिया करण्यासाठी योग्य असतात. नेत्ररोपणाकरिता दरवर्षी एक लाखाहून अधिक बुबुळांची (Cornea) गरज असते. परंतु एकूण दरवर्षी होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मरणोत्तर नेत्रदानातून प्राप्त होणाऱ्या बुबुळांचे (Cornea) प्रमाण अगदी अत्यल्प आहे.
बुबुळजन्य आजारामुळे अंधत्व (Corneal Blindness) : कारणे
अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळे येते असे नाही,तर डोळ्यांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. बुबुळ (Cornea) हे पारदर्शक पटल असून ते अपारदर्शक होणे (Corneal Opacity) हा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तीला, म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत कोणालाही होऊ शकतो. उदा.अपघातामध्ये डोळ्याला मार लागणे, डोळे येणे,अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे व्हायरल इन्फेक्शन,डोळ्यात रासायनिक पदार्थ जाणे तसेच डोळ्याची एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर गुंतागुंत निर्माण होणे अशा व इतर कारणांमुळे देखील बुबुळ (Cornea) खराब होऊ शकते.अशावेळी योग्य वेळी तपासण्या व निदान करून बुबुळ (Cornea) शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपण करून घेतल्यास आलेले अंधत्व टाळता येऊ शकते.
नेत्रदान म्हणजे काय
नेत्रदान म्हणजे आपल्या मृत्यूनंतर स्वतःचे डोळे इतर अंध व्यक्तीकरिता दान करणे होय.यासाठी आपले मरणोत्तर नेत्रदान संमतीपत्र भरून आपल्या व नातेवाईकाच्या स्वाक्षरीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा नेत्रपेढीमध्ये जमा करावे.मृत्यूनंतर नेत्रदान म्हणजे स्वतःच्या इच्छेने नेत्रदान करून महान सामाजिक कार्य करणे होय.एखाद्या व्यक्तीने जिवंतपणी आपले संमतीपत्र भरले नसेल,तरीही त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान केले जाऊ शकते. मरणोत्तर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे पवित्र काम आपण करू शकतो.आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तींना जग पाहण्यासाठी होत असेल,तर जगाचा निरोप घेताना आपल्या डोळ्यांची दोन अंध व्यक्तींना दृष्टीची अमूल्य व पवित्र भेट नेत्रदानाने देऊ शकतो.
भारतामध्ये मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. चीन,जपान,श्रीलंका या देशांमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाचे दान करण्याची प्रथा आहे.जगात नेत्रदानासाठी श्रीलंका हा देश आघाडीवर आहे.तेथे मृत व्यक्तीचे नेत्र ही राष्ट्रीय संपत्ती मानून नेत्रदान केले जाते.त्यामुळे आजच्या स्थितीत श्रीलंकेसारखा छोटा देश संपूर्ण जगाला नेत्रबुबुळ (Cornea) पुरवठा करतो.श्रीलंकेसारख्या देशातील लोकांप्रमाणे भारतातही स्वयं-स्फूर्तपणे नेत्रदानाचे कार्य वाढविणे ही काळाची गरज आहे.परंतु आजही अंधश्रद्धेपायी नेत्रदान पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही.
नेत्रदान कोण करू शकते
ज्या व्यक्तीचे बुबुळ (Cornea) चांगले आहे,अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली व्यक्तीही नेत्रदान करू शकते. काचबिंदू किंवा चष्म्याचा मोठा नंबर असला तरीही ती व्यक्ती नेत्रदान करू शकते.नेत्रदान करण्यासाठी वयाचे बंधन नाही.एक वर्षाचे बालक ते अतिवृद्ध व्यक्ती देखील मरणोत्तर नेत्रदान करू शकते.
नेत्रदान कोणास करता येत नाही
मृत्यूनंतर नेत्रदान ज्या व्यक्तीचा मृत्यू हा संसर्गजन्य आजार,रेबीज, कावीळ, कॅन्सर,एड्स,कुष्ठरोग,क्षयरोग, सेप्टीसेमिया,गँगरीन,विषबाधा,सर्पदंश अशा कारणांमुळे झाला असेल,तर अशा व्यक्तीचे नेत्रदान करता येत नाही.परंतु अशा डोळ्यांचा उपयोग प्रत्यारोपणाऐवजी संशोधन, प्रशिक्षण करण्यासाठी व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होऊ शकतो.
नेत्रदानाबाबतचे गैरसमज व अडचणी
‘नेत्रदान धर्मविरोधी कृत्य आहे’, ‘नेत्रदान म्हणजे जिवंतपणी नेत्र काढले जातात का’,‘नेत्रदान केल्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप दिसेल’,‘पुढच्या जन्मात अंध म्हणून जन्माला येण्याची भीती’ अशा अंधश्रद्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य जाणीव-जागृती व सकारात्मक दृष्टिकोन नसणे,यामुळे नेत्रदानाच्या चळवळीसमोर अडचणी आहेत.असे असले तरीही सर्व धर्मांनी मरणोत्तर नेत्रदानाला पवित्र मानून त्याचे समर्थनच केलेले आहे.
नेत्रदान करण्यासाठी आपण काय करू शकतो
कोणत्याही व्यक्तीस मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा असल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयाच्या नेत्रविभागात मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र भरून द्यावे.संमतीपत्र भरले नसले आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची इच्छा असल्यास त्यांच्या संमतीने मृत व्यक्तीचे नेत्रदान लगेचच करता येते.यासाठी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो.
नेत्रदान करण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे
मृत्यूनंतर मृत व्यक्तीचे डोळे लगेच बंद करावेत.डोळ्यांवर स्वच्छ ओले कापड ठेवावे.खोलीत पंखा असेल तर तो बंद करावा व ए.सी.असेल तर चालू करावा. डोक्याखाली उशी ठेवावी.मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपेढीला फोन करावा. मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आत डोळे काढल्यास ते प्रत्यारोपणासाठी उपयोगी येऊ शकतात.
एखाद्याला आजन्म अंधारात जगू देण्यापेक्षा मरणोत्तर नेत्रदान करून त्यांना निसर्गाची ही किमया पाहण्याची संधी देणे,आपल्या नेत्रदानामुळे जर दोन अंध व्यक्तींना ही सृष्टी पाहता येत असेल,तर यापेक्षा दुसरे पुण्याचे काम नाही. अंधत्वाच्या तुलनेत नेत्रदानाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.अंधश्रद्धेच्या नादी लागून नेत्रदानासारख्या पवित्र गोष्टीपासून दूर राहू नका.आपल्या मृत्यूनंतरही आपण नेत्ररूपी अनेक वर्षे जिवंत राहतो, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी.
समाजातील अंधत्व आलेल्या व्यक्तींना सुंदर सृष्टी पाहता यावी व अंधांच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आणावयाचा असल्यास नेत्रदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सकारात्मकपणे नेत्रदान चळवळीत पुढाकार घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे.
डॉ.धनंजय चाकुरकर
जिल्हा शल्यचिकित्सक
धाराशिव
आपले नेत्रदान — दोन व्यक्तींना दृष्टीदान !