Thursday, 27 August 2026
तेलबिया प्रक्रिया युनिट उभारणीसाठी अनुदान ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन प्रकल्पासाठी ९.९० लाखांपर्यंत अनुदान
तेलबिया प्रक्रिया युनिट उभारणीसाठी अनुदान
३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
प्रकल्पासाठी ९.९० लाखांपर्यंत अनुदान
धाराशिव,दि.२८ ऑगस्ट (जिमाका) राष्ट्रीय खाद्यतेल अभियान २०२६-२७ अंतर्गत तेलबिया संकलन,तेल काढणी आणि तेल उत्पादनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कापणीनंतरच्या पायाभूत सुविधा उभारणीस तसेच कार्यरत पायाभूत सुविधांची क्षमता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. कापूस बियाणे,नारळ,तांदूळ कोंडा तसेच वृक्षजन्य तेलबिया (TBOs) यांसह खाद्य दुय्यम स्रोतांद्वारे तेल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार असून,इच्छुक शासकीय व खासगी उद्योग,शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी (FPOs) आणि सहकारी संस्थांनी ३० ऑगस्ट २०२६पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.तेलबिया संकलन व तेल काढणीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासकीय व खासगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी (FPOs) तसेच सहकारी संस्थांना या योजनेतून सहाय्य केले जाणार आहे.
जिल्ह्यास या घटकासाठी एक भौतिक लक्ष्यांक प्राप्त झाला आहे.९.९० लाखांपर्यंत अनुदान
तेल काढणी युनिट,तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री व उपकरणे तसेच प्रमुख व दुय्यम तेलबियांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ३३ टक्के किंवा ९.९० लाख रुपये,यापैकी जी रक्कम कमी असेल,तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील.
जमीन व इमारतीसाठी या घटकांतर्गत सहाय्य दिले जाणार नाही.तसेच प्रकल्प खर्चाची गणना करताना जमीन व इमारतीवरील खर्चाचा विचार केला जाणार नाही.निवड झालेल्या लाभार्थ्याने संयंत्र खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी होणे आणि प्रकल्प कार्यान्वित झाल्याची खात्री झाल्यानंतरच अनुज्ञेय अनुदानाची रक्कम थेट आधारसंलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा केली जाईल.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार CIPHET, लुधियाना तसेच तत्सम केंद्रीय संस्थांनी तपासणी केलेल्या Mini Oil Mill/Oil Expeller च्या उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेललाच या घटकांतर्गत अनुदान अनुज्ञेय राहील.शासनाच्या सर्व योजनांमधून या बाबीसाठी एकाच योजनेचा एकदाच लाभ घेता येईल.एकाच बाबीसाठी दोन योजनांमधून अनुदान घेतल्याचे आढळल्यास संबंधित लाभ देणारा व घेणारा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
बँक कर्जाशी जोडलेला घटक
इतर (किरकोळ दुय्यम) वनस्पती तेल उपअभियानांतर्गत कापूस बियाणे,नारळ,तांदूळ कोंडा तसेच वृक्षजन्य तेलबिया (TBOs) यांसह खाद्य दुय्यम स्रोतांद्वारे तेल उत्पादनासाठीचा घटक बँक कर्जाशी निगडित आहे.इच्छुक प्रक्रिया भागीदाराने केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा.बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार या घटकाच्या लाभास पात्र राहील.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अशा अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती मिळाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात येतील.
प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर बँक प्रतिनिधी,तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्या संयुक्त मोका तपासणी अहवालाच्या आधारे अनुज्ञेय अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बँकेच्या सबसिडी खात्यात (Mirror Account) जमा करण्यात येईल.प्राप्त भौतिक लक्ष्यांकानुसार संबंधित प्रकल्प आर्थिक वर्षात पूर्ण होईल,याची दक्षता घेऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
मूल्यसाखळी सुविधा विकसित करण्याची संधी
निवड झालेल्या प्रक्रिया भागीदारांना वजन,माती परीक्षण, बियाणे चाचणी,खतांची विक्री, एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन (IPM/INM), बियाणे प्रमाणिकरण प्रक्रिया,बीजप्रक्रिया आणि शेतकरी सल्ला आदी अन्य मूल्यसाखळी सुविधाही विकसित करता येतील.
निवडलेल्या लाभार्थ्याने संयंत्र खरेदी केल्यानंतर व त्याची मोका तपासणी झाल्यानंतरच अनुदानाची देय रक्कम थेट आधारसंलग्न राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा करण्यात येईल. प्रकल्पाच्या दर्शनी भिंतीवर योजनेचा फलक लावणे बंधनकारक राहील.प्राप्त भौतिक लक्ष्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सोडत पद्धतीने करण्यात येईल. तेल काढणी युनिट,तेलबिया प्रक्रिया यंत्रसामग्री व उपकरणे तसेच प्रमुख व दुय्यम तेलबियांसाठी प्रक्रिया युनिट उभारणीचा प्रकल्प मंजूर झाल्यास फेब्रुवारी/मार्च २०२७पर्यंत प्रकल्प उभारणे बंधनकारक राहील.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे :
शासकीय/खासगी उद्योग,शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी आणि सहकारी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार CIPHET,लुधियाना तसेच तत्सम केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या Mini Oil Mill/Oil Expeller च्या उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलचे कोटेशन व तपासणी अहवाल.
Provisional Bank Loan Sanction Letter.संबंधित उद्योग,शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी किंवा सहकारी संस्थेचे पॅन कार्ड.यापूर्वी या घटकाचा लाभ घेतलेला नसल्याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी व कंपनी/संस्थेच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र.तेलबिया प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार असलेल्या जागेवर बांधकाम उभे असल्याचा जिओ-टॅगिंग केलेला फोटो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुक शासकीय/खासगी उद्योग,शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी (FPOs) आणि सहकारी संस्थांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
******