Tuesday, 21 July 2026
दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
धाराशिव दि.२१ जुलै (जिमाका) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींशी संबंधित समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 'दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात येतात.
दरवर्षी ३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना'निमित्त दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती,इतर व्यक्ती तसेच विविध संस्थांचा या राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे गौरव केला जातो.
या पुरस्कारांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संकेतस्थळावर www.depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in वर उपलब्ध आहेत.या पुरस्कारासाठी अर्ज अथवा नामांकने केवळ 'राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल'वर ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज व नामांकन प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू झाली असून,अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे.इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार असल्याने पात्र व्यक्ती आणि संस्थांनी या संधीचा लाभ घेत ऑनलाईन अर्ज सादर करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे.
*****
Monday, 20 July 2026
बोरीतील २०२ कुटुंबांना संविधान उद्देशिकेचे वाटप ; समाज कल्याण विभागाच्या योजनांची दिली माहिती
बोरीतील २०२ कुटुंबांना संविधान उद्देशिकेचे वाटप ; समाज कल्याण विभागाच्या योजनांची दिली माहिती
धाराशिव,दि.२० जुलै (जिमाका) प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत निवड झालेल्या तुळजापूर तालुक्यातील बोरी गावातील कुटुंबांना आज सोमवारी (ता. २०) भारतीय संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांवरील माहितीपर घडीपुस्तिका व पॉकेट बुकचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,समाज कल्याण निरीक्षक श्री.अतुल जगताप, सरपंच श्रीकांत हावळे,उपसरपंच नारायण जानराव, पोलीस पाटील प्रवीण जानराव, ग्रामपंचायत सदस्या प्रेमा हावळे तसेच ग्रामपंचायत सचिव श्रीमती.ए.डी. थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी सांगितले की,समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व बौद्ध समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. लाभार्थ्यांनी या योजनांची सविस्तर माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी त्याचा प्रभावी उपयोग करावा.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कुटुंबप्रमुखांना भारतीय संविधान उद्देशिका,समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांवर आधारित 'समता दिनदर्शिका', 'आत्मनिर्भर' घडीपुस्तिका, सर्वसाधारण योजनांची माहिती देणारी 'विकासवाटा' घडीपुस्तिका तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावरील पॉकेट बुक यांचे वितरण करण्यात आले.
बोरी गावातील सर्व २०२ कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संविधान उद्देशिका व माहितीपर साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
*****
शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्या
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव,दि.२० जुलै (जिमाका) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरांद्वारे विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अपर पोलिस अधीक्षक श्री.पांडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की,२२ जुलै रोजी उमरगा,२४ जुलै रोजी धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी शिराढोण येथे,२६ जुलै रोजी तुळजापूर येथे आणि २ ऑगस्ट रोजी भूम येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी ही शिबिरे होणार असून, प्रत्येक विभागाने आपल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावा.यासाठी सर्व विभागांनी आतापासूनच योजनानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम कराव्यात.आरोग्य विभागाने आयुष्मान कार्ड,भूमी अभिलेख विभागाने स्वामित्व सनद,तर कामगार विभागाने ई-श्रम कार्ड शिबिरस्थळीच तयार करून मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करावेत.तसेच आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन याच कार्यक्रमांतर्गत करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
२२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या शिबिरांसाठी संबंधित विधानसभा मतदारसंघांतील तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून विविध विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे.शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळेल,यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय प्रत्येक विभागाने आपल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र माहिती स्टॉल उभारावेत.स्टॉलवर माहितीपत्रके,घडीपुस्तिका आणि योजनांशी संबंधित साहित्य उपलब्ध करून देऊन शिबिरात येणाऱ्या नागरिकांना त्याचे वितरण करावे.यामुळे भविष्यात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल,असेही जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले.
बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुंभार, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विश्वास करे,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजित जाधोर,समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक शिवाजी फुलारी,प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कटकधोंड,लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस.व्ही. नगदे,विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)



