Tuesday, 7 July 2026
अँग्रीस्टॅक नोंदणीत धाराशिवची दमदार वाटचाल जिल्ह्यात ४ लाख ७७ हजार ४४ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ८९ हजार २३ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण
अँग्रीस्टॅक नोंदणीत धाराशिवची दमदार वाटचाल
जिल्ह्यात ४ लाख ७७ हजार ४४ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ८९ हजार २३ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण
प्रत्येक शेतकऱ्याने अँग्रीस्टॅक आयडी तयार करून घ्यावा : भविष्यातील सर्व कृषी योजनांसाठी ठरणार महत्त्वाचा आधार
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव,दि.७ जुलै (जिमाका) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अँग्रीस्टॅक (AgriStack) उपक्रमात धाराशिव जिल्हा सातत्याने उल्लेखनीय प्रगती करत आहे. ७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ७७ हजार ४४ खातेदारांपैकी ३ लाख ८९ हजार २३ शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाली असून, जिल्ह्याची एकूण प्रगती ८१.५५ टक्क्यांवर पोहोचली आहे.६ जुलै रोजी एकाच दिवसात जिल्ह्यात २५ नवीन नोंदणीची भर पडली. तालुकानिहाय पाहता तुळजापूर येथे सर्वाधिक ९,धाराशिव येथे ६,भूम, उमरगा आणि परंडा येथे प्रत्येकी ३,वाशी येथे १ नोंदणी झाली.कळंब आणि लोहारा तालुक्यात त्या दिवशी नवीन नोंदणी झाली नाही.
तालुकानिहाय प्रगतीमध्ये कळंब तालुका ८६.२९ टक्के नोंदणीसह अव्वल असून,त्यापाठोपाठ उमरगा (८५.७१ टक्के),वाशी (८५.०७ टक्के),लोहारा (८३.२६ टक्के), परंडा (८२.६६ टक्के),भूम (८०.२१ टक्के),धाराशिव (७९.५९ टक्के) आणि तुळजापूर (७५.५० टक्के) असा क्रम आहे.
अँग्रीस्टॅक ही देशातील शेती क्षेत्राला डिजिटल बळ देणारी महत्त्वपूर्ण प्रणाली असून,प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र डिजिटल कृषी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार केला जात आहे.या आयडीमुळे शेतकऱ्यांची जमीन,पिके आणि शासकीय योजनांशी संबंधित माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि वेगवान होईल.
भविष्यात पीकविमा,पीक नोंदणी, कृषी अनुदाने, पीक कर्ज,नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई,कृषी सल्ला,विविध शासकीय योजना तसेच शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या अनेक सेवांसाठी अँग्रीस्टॅक फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हा आयडी तयार करून घेणे ही काळाची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की,ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अँग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही,त्यांनी विलंब न करता जवळच्या कृषी विभाग, ग्रामस्तरीय सुविधा केंद्र किंवा संबंधित नोंदणी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.
अँग्रीस्टॅक फार्मर आयडी हा भविष्यातील डिजिटल कृषी व्यवस्थेचा पाया ठरणार असून, शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे हा क्रमांक असणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या कृषीविषयक सेवांचा लाभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा,यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून या डिजिटल उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा,असेही त्यांनी आवाहन केले.
******
Monday, 6 July 2026
सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन
सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन
धाराशिव दि.६ जुलै (जिमाका) चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असून,या किडी रोपावस्थेतील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.या पार्श्वभूमीवर मौजे भोगजी (ता.कळंब) तसेच इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून,या किडींच्या समूळ नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक स्तरावर तातडीने एकात्मिक कीड व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी,असे संयुक्त आवाहन कृषी विद्यावेत्ता डॉ.अरुण गुटे आणि उपविभागीय कृषी अधिकारी श्री. महादेव आसलकर यांनी केले आहे.
शंखी गोगलगाय ही प्रामुख्याने निशाचर कीड असून ती रात्रीच्या वेळी सक्रिय होते.विशेषतः सोयाबीनच्या रोपावस्थेत ही कीड मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर नियंत्रणात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपाययोजना
सोयाबीनच्या पेरणीनंतर संपूर्ण शेताभोवती, बांधाच्या आतल्या बाजूने सुमारे ५ सेंटीमीटर रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढावा.यामुळे गोगलगाईंचा शेतात प्रवेश कमी होण्यास मदत होते.गोगलगाय व इतर किडींच्या नियंत्रणासाठी केवळ वैयक्तिक उपाय न करता गावपातळीवर किंवा परिसरातील शेतकऱ्यांनी सामूहिक मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
रासायनिक नियंत्रणासाठी 'स्नेलकील'चा वापर
सोयाबीन पेरणीनंतर तात्काळ बांधाच्या आतल्या बाजूने मेटलडिहाईड २.५ टक्के (स्नेलकील) या औषधाच्या पेलेटचे छोटे गोळे करून संपूर्ण शेताभोवती ५ ते ७ फूट अंतरावर एक-एक गोळी टाकावी.स्नेलकील हे प्रलोभक स्वरूपाचे औषध असून ते गोगलगाईंना आकर्षित करते. गोगलगाईने या गोळीला चाटल्यानंतर सुमारे ४ ते ५ तासांत तिच्या शरीरातील स्राव बाहेर पडतो आणि ती नियंत्रणात येते. बांधाव्यतिरिक्त शेताच्या आतील भागातही गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्यास प्रत्येक चार ओळींनंतर ओळीच्या बाजूने ५ फूट अंतरावर स्नेलकीलच्या गोळ्या टाकाव्यात.
पैसा/वाणी (Millipede) किडीच्या नियंत्रणासाठी उपाय
शेतात पैसा किंवा वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी बाजारात उपलब्ध असलेले क्लोरोपायरीफॉस १.५ टक्के किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार स्वरूपातील औषध ५ किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पेरावे.
रोपावस्थेत जैविक व भौतिक नियंत्रणालाही प्राधान्य
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रति एकर दहा ठिकाणी गव्हाचे ढीग किंवा पाण्यात भिजविलेला सुतळी बारदाना ठेवावा.सकाळी ६ ते ८ या वेळेत त्या ढिगाखाली किंवा बारदानाखाली जमा झालेल्या गोगलगाई गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.कृषी विभागाने शेतकऱ्यांना गोगलगाय तसेच पैसा/वाणी किडीच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सामूहिकरीत्या वरील उपाययोजना तातडीने राबविल्यास संभाव्य नुकसान टाळता येणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी,मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहनही डॉ.अरुण गुटे आणि श्री.महादेव आसलकर यांनी केले आहे.
******
अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्ती नाही ; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी काळजी
अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्ती नाही ; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी काळजी
धाराशिव दि.६ जुलै (जिमाका) उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना घाईगडबडीत किंवा तात्पुरत्या स्वरूपात एका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन नंतर तो अर्धवट सोडून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील तांत्रिक तरतुदी आणि संबंधित शासन निर्णयातील निकषांमुळे अशा विद्यार्थ्यांचे नव्याने घेतलेल्या अभ्यासक्रमासाठीचे शिष्यवृत्ती अर्ज अपात्र ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना योग्य निर्णय घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव श्री.सचिन कवले यांनी केले आहे.
बारावीनंतर अनेक विद्यार्थी वैद्यकीय,अभियांत्रिकी,फार्मसी, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र,अपेक्षित अभ्यासक्रमात किंवा महाविद्यालयात तत्काळ प्रवेश न मिळाल्यास तसेच शैक्षणिक 'गॅप' टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए,बीएससी किंवा बीकॉमसारख्या बिगर- व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.या प्रवेशानंतर ते महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करून त्याचा लाभही घेतात.
मात्र,पुढील शैक्षणिक वर्षात अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यानंतर ते पूर्वीचा अभ्यासक्रम अर्धवट सोडतात.अशा वेळी महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक तरतुदी आणि शासन निर्णयातील नियमांनुसार त्यांना नव्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही.
याबाबतचा नियम स्पष्ट करताना प्रशासनाने नमूद केले आहे की, "महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक तरतुदीनुसार व संबंधित शासन निर्णयातील विहित केलेल्या निकषांनुसार एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन त्याकरिताच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन सदर अभ्यासक्रम अर्धवट सोडून कोणत्याही अभ्यासक्रमास नव्याने प्रवेश घेतला तरी देखील अशा विद्यार्थ्यांचा नव्याने घेतलेल्या अभ्यासक्रमाकरिता शिष्यवृत्तीचा अर्ज अपात्र होऊन त्यास कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे.तसेच या नियमांची माहिती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर,महाविद्यालयाच्या डिजिटल सोशल मीडिया समूहांमध्ये आणि शिष्यवृत्ती विभागाबाहेर ठळकपणे प्रसिद्ध करावी,अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याशिवाय शिष्यवृत्तीची रक्कम ही राज्य शासन व केंद्र शासनाकडून डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम शासनाकडे चलनाद्वारे परत करण्याबाबत कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत.त्यामुळे शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम शासनास परत करण्याबाबत कोणतेही मार्गदर्शन महाविद्यालय स्तरावरून करू नये, असेही श्री.सचिन कवले यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा अंतिम निर्णय घेताना शिष्यवृत्तीच्या नियमांची सखोल माहिती करून घेणे आवश्यक असून,महाविद्यालयांनीही याबाबत व्यापक जनजागृती करून विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)