Friday, 1 May 2026
मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबमुळे आरोग्य सेवेत नवी क्रांती ; नागरिकांना जलद,अचूक आणि विश्वासार्ह निदान सुविधा पालकमंत्री प्रताप सरनाईक पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन
मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबमुळे आरोग्य सेवेत नवी क्रांती ; नागरिकांना जलद,अचूक आणि विश्वासार्ह निदान सुविधा
पालकमंत्री प्रताप सरनाईक
पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन
धाराशिव दि.१ मे (जिमाका) आज ‘मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब’ सारख्या अत्याधुनिक सुविधांविषयी बोलताना अत्यंत आनंद होत आहे.आरोग्य क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेली प्रगती ही आपल्या समाजासाठी मोठी देणगी आहे.आजच्या काळात आजारांचे निदान जितके लवकर आणि अचूक होईल,तितके उपचार अधिक प्रभावी होतात.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज १ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या पीसीआर मॉड्युलर लॅब व स्किल लॅबचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, मॉलिक्युलर लॅबमध्ये DNA, RNA आणि जनुकीय स्तरावर तपासण्या केल्या जात असल्यामुळे आजारांचे निदान जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येते.कोविड-१९, क्षयरोग (TB), एचआयव्ही,हिपॅटायटिस यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असून ही सुविधा ते शक्य करून देते.या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक जंतू आणि विषाणूंची ओळख पटवता येते.एका पॅनेलमध्ये २५ ते १०० पर्यंत सूक्ष्मजंतू शोधण्याची क्षमता ही या प्रणालीची ताकद आहे.त्यामुळे रुग्णाला नेमका कोणता संसर्ग झाला आहे,हे त्वरीत समजते आणि योग्य उपचार देणे शक्य होते.असे श्री.सरनाईक यांनी सांगितले.
विशेष म्हणजे,मल्टिप्लेक्स PCR पॅनेलच्या माध्यमातून श्वसन संक्रमण,जठरांत्र संक्रमण,मेंदूज्वर,सेप्सिस,ट्रॉपिकल फीव्हर यांसारख्या विविध आजारांचे एकाच वेळी परीक्षण करता येते असे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,ही सुविधा आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवते.तसेच, अँटिबायोटिक प्रतिकार तपासणी ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज ठरत आहे.mecA, NDM, KPC यांसारख्या जनुकांची तपासणी करून औषधांना प्रतिकार करणारे जंतू ओळखता येतात.यामुळे डॉक्टरांना योग्य औषधोपचार निवडता येतात आणि रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होते.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ४० पेक्षा अधिक तपासण्या एका प्लॅटफॉर्मवर करता येत असल्याने ही केवळ वैद्यकीय प्रगती नसून समाजाच्या आरोग्य सुरक्षेची हमी बनली आहे.अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता आणि गती दोन्ही वाढणार आहेत.सरकारच्या वतीने आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नागरिकांना दर्जेदार, जलद आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य सेवा अधिक व्यापक,सक्षम आणि परिणामकारक करण्याचा आमचा संकल्प असून प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील राहील,असेही पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले,या लॅबच्या माध्यमातून आजाराचे अचूक निदान होण्यास मदत होणार आहे. मोठी गुंतवणूक या लॅबसाठी झाली आहे. त्याचा परिपूर्ण उपयोग जिल्ह्यातील रुग्णांच्या आजारावरील निदानासाठी झाला पाहिजे.वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची अडचण आहे,त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.चौदाशे ते पंधराशे बेड इथे उपलब्ध होणार आहे.त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई येथे बैठक घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून माहिती देताना अधिष्ठाता डॉ.चौहान म्हणाले की,जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ही लॅब रुग्ण सेवेच्या दृष्टीतून महत्त्वाची ठरणार आहे. कोविडसारख्या १०० हजाराचे निदान या मॉलिक्युलर लॅबच्या माध्यमातून होणार आहे.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी या प्रयोगशाळेचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे फीत कापून प्रयोगशाळेचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान उपस्थित होते.
कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार
पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा
कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार
धाराशिव,दि.१ मे (जिमाका) जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज १ मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ च्या निधीतून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमामुळे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजासह विशेष बंदोबस्त व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.पोलीस दलासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या वाहनांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी ५ स्कॉर्पिओ क्लासिक वाहने,प्रथम प्रतिसाद पथक (First Mobile) साठी ६ बोलेरो निओ वाहने,डायल ११२ अंतर्गत दुय्यम प्रतिसाद पथकासाठी १४ बोलेरो बेसिक मॉडेल वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी १ अशोक लेलँड ट्रकचा समावेश आहे.
ही वाहने पायलटिंग,एस्कॉर्ट सेवा, व्हीआयपी बंदोबस्त,जयंती उत्सव, यात्रा बंदोबस्त तसेच विशेष सुरक्षा नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नव्या वाहनांमुळे घटनास्थळी जलद पोहोचणे,आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत,कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.
विशेषतः डायल ११२ आणि प्रथम मोबाईल सेवांसाठी उपलब्ध होणारी वाहने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित प्रतिसाद देण्यास उपयुक्त ठरणार असून ग्रामीण व शहरी भागातील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होईल.आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध ट्रकमुळे नैसर्गिक आपत्ती,दुर्घटना किंवा बचावकार्याच्या वेळी आवश्यक साधनसामग्री त्वरीत पोहोचविणे शक्य होणार आहे.या वाहनांच्या लोकार्पणामुळे पोलीस दलाची आधुनिकता वाढून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम,सज्ज आणि प्रभावी यंत्रणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या पोलीस वाहनांचे लोकार्पण केल्यानंतर नव्याने पोलिस दलात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांपैकी स्कॉर्पिओ हे वाहन स्वतः पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी चालवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमस्थळी आगमन झाले.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर तसेच अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना ह्या सोबत होत्या.नव्या वाहनातून वरिष्ठ प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस मैदानावर उपस्थित होते
******
समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगात पालकमंत्री प्रताप सरनाईक ६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा
समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगात
पालकमंत्री प्रताप सरनाईक
६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा
धाराशिव दि.१ मे (जिमाका) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात विकास,डिजिटल परिवर्तन, उद्योगवाढ,आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ,सुरक्षित आणि सन्मानपूर्ण बनत असून ‘समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने धाराशिव जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ६७ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्ताने मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री. सरनाईक बोलत होते.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर,बुबा साहेब जाधव श्रीमती कलावती उमरे,श्रीमती भागीरथी कुकडे, भागीरथी गुरव,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील,उपाध्यक्षा श्रीमती.उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, प्रशासनात डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना अधिक जलद,सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होत आहेत. ‘डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड’,‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर’,‘जीवनरेखा’ आणि ‘तुळजाई चॅटबॉट’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जमिनीचे दाखले,विविध प्रमाणपत्रे,तक्रार निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचत आहे.परिणामी वेळ,श्रम आणि आर्थिक खर्चात मोठी बचत होत आहे.औद्योगिक क्षेत्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून गुंतवणूक वाढीस लागली असून हजारो रोजगार संधी निर्माण होत आहेत.विविध औद्योगिक क्लस्टर प्रकल्पांमुळे ‘आत्मनिर्भर धाराशिव’ या संकल्पनेला अधिक बळ मिळत असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,वाहतूक क्षेत्रातही राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मोठे बदल घडत आहेत.मागील वर्षभरात धाराशिव विभागात नव्या बसेसची वाढ झाली असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अधिक सुरक्षित,विश्वासार्ह आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे. लवकरच ग्रामीण भागात ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू होणार असल्याने ग्रामीण वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे.पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.‘आपली एसटी’ मोबाईल अॅपमुळे प्रवाशांना बसचे वेळापत्रक,मार्ग आणि सेवा माहिती सहज उपलब्ध होत आहे.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात जिल्ह्यात ऐतिहासिक बदल घडत असल्याचे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,आधुनिक रुग्णालये, आयसीयू,एमआरआय,डायलिसिससह अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागातही नव्या आरोग्य संस्थांची उभारणी सुरू असून “आरोग्य सेवा आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे.गृह,शेती आणि सामाजिक क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना,शिवभोजन योजना,उज्ज्वला गॅस योजना,मनरेगा आणि जल जीवन मिशनसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुरक्षित,सन्मानपुर्ण आणि सुलभ बनत आहे.असे त्यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांसाठी कृषी,सिंचन, पीकविमा,तंत्रज्ञानाधारित शेती आणि नैसर्गिक शेती उपक्रमांमुळे शेती अधिक सक्षम होत आहे.असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे कृषी क्षेत्रातही नवे परिवर्तन घडत आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रस्ते,पाणीपुरवठा,पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासकामांना गती मिळाली असून जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून विकास,सामाजिक न्याय,लोककल्याण आणि आत्मनिर्भरतेच्या सामूहिक निर्धाराचा दिवस असल्याचा संदेश देत नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि समृद्ध,सक्षम व प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावावा,असे आवाहन पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमस्थळी आगमन होताच प्रारंभी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण केले.पोलिस पथकाने राष्ट्रगान,राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले व राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.पालकमंत्री व मान्यवरांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहिली.
पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ग्राम महसूल अधिकारी विनोद चुकेवाड यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ यांनी केले.
******
Subscribe to:
Posts (Atom)












