Sunday, 26 April 2026
टीबी मुक्त भारत अभियानाला गती ; १०० दिवसीय मोहिमेत तपासणी शिबिरांसह क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप
टीबी मुक्त भारत अभियानाला गती ; १०० दिवसीय मोहिमेत तपासणी शिबिरांसह क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप
धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापकस्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जोखीमग्रस्त गावांमधील १४ वर्षांवरील सर्व नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
२४ मार्च २०२६ पासून आयुष्मान आरोग्य मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३६ तपासणी कॅम्प यशस्वीरित्या पार पडले आहेत.या शिबिरांमध्ये एकूण ३ हजार ९१७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षयरुग्णांचे लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
आरोग्य विभागामार्फत गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,आपल्या गावात टीबी तपासणी कॅम्प आयोजित झाल्यास प्रत्येकाने एक्स-रे तपासणी करून घ्यावी,जेणेकरून क्षयरोगाचे वेळेत निदान होऊन उपचार सुरू करता येतील.या अभियानांतर्गत निदान झालेल्या क्षयरुग्णांना पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी फूड बास्केट / पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी निक्षय मित्र म्हणून पुढाकार घेत ३० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले आहे. क्षयरुग्णांच्या आरोग्य पुनर्वसनासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनीही निक्षय मित्र बनून पोषण आहार किट वाटपासाठी पुढे यावे,असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
टीबी मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी प्रशासन, आरोग्य विभाग आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न अधिक प्रभावी ठरत असून या उपक्रमामुळे क्षयरुग्णांना उपचारासोबतच पोषणाचा आधारही मिळत आहे.
*****
ाजी सैनिक कुटुंबीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ; महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया
माजी सैनिक कुटुंबीयांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी ; महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया
धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को),पुणे यांच्या वतीने माजी सैनिकांच्या पत्नी,विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांसाठी महिला सुरक्षा रक्षक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
धाराशिव येथे कंत्राटी पद्धतीने महिला सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असून इच्छुक पात्र उमेदवारांना आकर्षक मासिक वेतनासह विविध शासकीय लाभ मिळणार आहेत.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर सहा महिन्यांनी वाढीव महागाई भत्ता,कामगार कायद्यानुसार ईपीएफ,ईएसआय,ग्रॅज्युइटी आदी सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत.माजी सैनिक पत्नी,माजी सैनिक विधवा पत्नी तसेच माजी सैनिक महिला पाल्यांनी या भरती प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२२५५७ किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८५२७५५४ वर संपर्क साधता येईल.तसेच श्री.गंगाधर गायकवाड यांच्याशी ९४२२३०७५९३ या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.
माजी सैनिक कुटुंबीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही भरती मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असून पात्र महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
*****
"शिका व कमवा" उपक्रमांतर्गत धाराशिवमध्ये २९ एप्रिल रोजी रोजगार मेळावा ; युवावर्गासाठी संधी
"शिका व कमवा" उपक्रमांतर्गत धाराशिवमध्ये २९ एप्रिल रोजी रोजगार मेळावा ; युवावर्गासाठी संधी
धाराशिव दि.२६ एप्रिल (जिमाका) कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मासिक रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राइव्ह तथा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार,२९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांच्या "शिका व कमवा" (Learn & Earn) योजनेअंतर्गत तरुणांसाठी कौशल्य विकासाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग यांच्या सहकार्याने उमेदवारांना जागतिक दर्जाचे निवासी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ऑटोमोटिव्ह वेल्ड टेक्निशियन,ऑटोमोटिव्ह पेंट टेक्निशियन,ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन आणि मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन यांसारखे विविध तांत्रिक कोर्सेस उपलब्ध आहेत.या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असून प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी सुमारे १५ हजार ८१५ रुपये,तर दुसऱ्या वर्षी १७ हजार ६४५ रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
यासोबतच विद्यार्थ्यांना निवासी सुविधा, राहण्याची सोय,संगणक कक्ष,क्रीडा सुविधा आदी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे संबंधित कंपनीमध्ये नियमित नोकरीची संधी देखील मिळणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी १८ ते २० वर्षे वयोगटातील १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. उमेदवारांना मराठी,हिंदी किंवा इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी बुधवार,२९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे.
जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राइव्हचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)