Monday, 23 March 2026
मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील संगणक लॅब अधिग्रहित
मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी
जिल्ह्यातील संगणक लॅब अधिग्रहित
धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार यादींचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision) राज्यात सुरू करण्याची घोषणा होणार आहे.त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून मतदार यादींच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमाची तयारीबाबत लेखी निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांचे सन २००२ रोजीच्या मतदार यादीतील मतदारांशी मतदार मॅपिंग करणे, अस्पष्ट (Blur Photo) मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करून अद्यावत करणे,तसेच DSE च्या नोंदीची पडताळणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २४०-उमरगा,२४१-तुळजापूर, २४२-उस्मानाबाद व २४३-परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व BLO व BLO Supervisor यांनी मतदारांचे मॅपिंग करणे,अस्पष्ट असलेले (Blur Photo) फोटो गोळा करून अद्यावत करणे,तसेच DSE च्या नोंदीची पडताळणी करणे या कामकाजासाठी दिनांक २०.०३.२०२६ ते २१.०३.२०२६ या कालावधीत पूर्णवेळ सेवा अधिग्रहित केली असल्याने SIR संदर्भातील संगणकीय कामकाज करण्यासाठी तालुकानिहाय औद्योगिक संस्था / महाविद्यालयाच्या संगणक लॅब इंटरनेट सुविधेसह तसेच संगणक हाताळणारे ५ तांत्रिक कर्मचारी यांची सेवा या आदेशान्वये दिनांक २०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ या कालावधीत करिता खालील प्रमाणे अधिग्रहित करण्यात येत आहेत.
यामध्ये धाराशिव तालुक्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव; तुळजापूर तालुक्यासाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय कंप्युटर लॅब, तुळजापूर; लोहारा तालुक्यासाठी श्री स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,लोहारा; उमरगा तालुक्यासाठी इंदिरा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उमरगा; कळंब तालुक्यासाठी संत गोरखाबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब; वाशी तालुक्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी; भूम तालुक्यासाठी आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भूम; तसेच परंडा तालुक्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,परंडा या संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्यामुळे वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था / महाविद्यालयाच्या संगणक लॅब,इंटरनेट सुविधेसह दिनांक २०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ या कालावधीत सेवा अधिग्रहित करण्यात येत असून,संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून मतदार यादी विशेष पुनरिक्षणाची प्रक्रिया वेळेत व अचूकरीत्या पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
*****
युवा भारत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा भारत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव,दि.२० मार्च (जिमाका) मेरा युवा भारत कार्यालय व छत्रपती क्रीडा मंडळ,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी आदित्य पाटील (कार्यकारी अधिकारी,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव) होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून अक्षय बिराजदार (तालुका क्रीडा अधिकारी) उपस्थित होते. मार्गदर्शन वक्ते म्हणून विश्वास खंदारे (तालुका क्रीडा अधिकारी,धाराशिव) तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे वैभव लांडगे,रविकांत सुरवसे,रोहिले गोविंद,ऋतुराज आगळे व छत्रपती क्रीडा मंडळाचे प्रा.प्रवीण बागल, रोहित चव्हाण,सुनील मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य पाटील यांनी युवकांना मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करण्याचे व देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन युवकांनी आपले भविष्य घडवावे,असेही सांगितले.
या स्पर्धांमध्ये उमरगा,लोहारा,भूम व परंडा तालुक्यांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.खो-खो, कबड्डी,१०० मीटर धावणे,गोळा फेक,लांब उडी व स्लो सायकलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे २०० ते २५० खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत कापसे व सिद्धेश्वर मते यांनी केले.हा कार्यक्रम उपसंचालक, मेरा युवा भारत,धाराशिव (महाराष्ट्र-गोवा) राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
*****
Wednesday, 18 March 2026
जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत
अफवांवर विश्वास ठेवू नका
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
धाराशिव दि.१८ मार्च (जिमाका) आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणातही जिल्ह्यात घरगुती गॅस,पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.तथापि,काही नागरिक गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील गॅस एजन्सीकडील वितरणाचा आढावा घेतला असता, गॅस एजन्सीकडून घरपोच करण्यात आलेले वितरण ४६०५ सिलेंडरचे होते,तर एजन्सीमधून प्रत्यक्ष केलेले वितरण केवळ १२१९ सिलेंडर एवढे होते.तसेच शिल्लक गॅस सिलेंडरचा साठा ४२५२ इतका उपलब्ध असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर वितरण तपशील पुढीलप्रमाणे आहे.
आगांधी शिल्लक – ५४२८,आवक – ४६४८,एकूण साठा – १००७६
घरपोच वितरण – ४६०५, एजन्सीमधून केलेले वितरण – १२१९.एकूण वितरण – ५८२४, शिल्लक साठा – ४२५२ एवढा आहे.सर्व गॅस एजन्सीधारकांकडे गॅसचा पुरेसा साठा असून नियमित आवक व वितरण सुरळीत सुरू आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपली गॅस जोडणी असलेल्या कंपनीच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सअॅप/प्ले स्टोअरवरील अधिकृत अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन बुकिंग करून घरपोच गॅस सेवेचा लाभ घ्यावा.तसेच गॅस एजन्सीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)