Monday, 2 March 2026

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे आवाहन परदेशातील नागरिकांसाठी सुरक्षा सूचना व हेल्पलाईन क्रमांक जाहीर

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे आवाहन परदेशातील नागरिकांसाठी सुरक्षा सूचना व हेल्पलाईन क्रमांक जाहीर धाराशिव दि.२ मार्च (जिमाका) मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला),कतार (दोहा),सौदी अरेबिया (रियाध),इस्रायल (तेल अवीव),इराण (तेहरान),इराक (बगदाद), कुवैत,बाहरीन,मस्कत,जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा,अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन संपर्क तपशील SEOC (२४X७) राज्य आपत्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी खालील SEOC क्रमांकावर संपर्क साधावा: टोल फ्री क्र.१०७७ फोन नं. +९१-९३२१५८७१४३ कार्यालयीन क्र.०२२-२२०२७९९० ई-मेल आयडी: controlroom@gov.in संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील रामल्लाह (पॅलेस्टाईन) फोन: +९७०५९२९१६४१८ ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in दोहा (कतार) फोन: ००९७४-५५६४७५०२ ईमेल: cons.doha@mea.gov.in रियाध (सौदी अरेबिया) फोन: ००-९६६-११-४८८४६९७ WhatsApp: ००-९६७-५४२१२६७४८ टोल फ्री: ८०० २४७ १२३४ ईमेल: cw.riyadh@mea.gov.in तेल अवीव (इस्रायल) फोन: +९७२-५४-७५२०७११ / +९७२-५४-२४२८३७८ ईमेल: conal.telaviv@mea.gov.in तेहरान (इराण) फोन: +९८९१२८१०९११५ / +९८९१२८१०९१०९ / +९८९१२८१०९१०२ / +९८९९३२१७९३५९ अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) टोल फ्री: ८००-४६३४२ WhatsApp: +९७१५४३०९०५७१ ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in कुवैत फोन: ९६५६५५०१९४६ ईमेल: community.kuwait@mea.gov.in बाहरीन फोन: ००९७३-३९४१८०७१ मस्कत टोल फ्री: ८००७१२३४ WhatsApp: +९६८९८२८२२७० ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in जॉर्डन फोन: ००९६२-७७० ४२२ २७६ बगदाद (इराक) फोन: +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४४८९९ वेबसाइट: coibaghdad.gov.in ईमेल: cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in असे आहेत. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.भारतीय दूतावास/कॉन्सुलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.आपले लोकेशन व स्थिती कुटुंबियांना सतत कळवावी.मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.स्थानिक भारतीय दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी सूचना उपरोक्त देशांमध्ये आपले नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती अडकून पडलेले असतील तर त्यांची माहिती धाराशिव प्रशासनास खालील क्रमांकांवर संपर्क साधून द्यावी.अडकलेल्या नातेवाईकांशी संपर्क झाला असल्यास त्यांना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे याबाबत जिल्हा प्रशासनास कळवावे.ज्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांची माहिती प्रशासनास सविस्तरपणे देण्यात यावी,असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: ०२४७२- २२४३६६, ०२४७२-२२५६१८. टोल फ्री क्रमांक :१०७७ धाराशिव पोलीस नियंत्रण कक्ष: ०२४७२-२२२९००, ०२४७२-२२२७०० निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव: ७५८८९३८६८६ तहसीलदार तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,धाराशिव: ९४२३३३९१९२ उपविभागीय अधिकारी,धाराशिव: ७०८३६६३१३९ उपविभागीय अधिकारी,उमरगा: ९८५०८९७०४२ उपविभागीय अधिकारी,कळंब: ९९२२४४७८१२ उपविभागीय अधिकारी,भूम: ९५६६०९६६९१ तहसीलदार धाराशिव: ९६५७५७६७१४ तहसीलदार तुळजापूर : ७७७६८८९९९९ तहसीलदार उमरगा : ९४२२४६९०१३ तहसीलदार लोहारा : ७८७५२४३८३४ तहसीलदार कळंब : ९८८१७४५५७७ तहसीलदार वाशी: ९०९६२५५७३७ तहसीलदार भूम: ९८२३७२२२७४ तहसीलदार परंडा: ८२०८५१३६५६ वरील क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी दिली. ****

Sunday, 1 March 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी धाराशिव,दि.१ मार्च (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेश ब्रम्हे,न्यायमूर्ती,मुंबई उच्च न्यायालय यांच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील,जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव होत्या. महाशिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग,(वार रूम – मध्यवर्ती नियंत्रण कक्ष),जिल्हा वाहतूक शाखा पोलीस विभाग,राज्य मार्ग परिवहन महामंडळ,उपविभागीय अधिकारी कार्यालय,जिल्हा कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,आरोग्य विभागाचा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम,मोबाईल मेडिकल हॉस्पिटल,आयुष्मान भारत, अ‍ॅनिमियामुक्त भारत अभियान,रेशीम विकास विभाग,महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा उद्योग केंद्र,महिला व बाल विकास विभाग,महिला बालकल्याण विभाग,पशुसंवर्धन विभाग, मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान, शिक्षण विभाग,येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र (येरमाळा),अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नोंदणी व मुद्रांक विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,जिल्हा रुग्णालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रक्तदान शिबिर,तहसील कार्यालय,धाराशिव,जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचा राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम,व्हाइट गोल्ड चॉकी सेंटर,खामकरवाडी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना/विकसित भारत जी राम जी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचा स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा - २,वीज वितरण कंपनीची सौर ऊर्जा योजना यांसह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलना नागरिक,महिला व लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.अनेक पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्टॉलवर विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. विधी सेवा महाशिबिराचा उद्देश सर्वसामान्यांना मोफत व त्वरित कायदेविषयक मदत उपलब्ध करून देणे,नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे,पात्रांना मोफत विधी साहाय्य देणे तसेच प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीमार्फत निकाली काढण्यास प्रोत्साहन देणे हा होता. त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत वंचित, गरजू,महिला,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व इतर दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवून “सर्वांसाठी न्याय” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा या उपक्रमामागील मूलभूत हेतू होता. *****

शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात न्या.शैलेश ब्रम्हे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात न्या.शैलेश ब्रम्हे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा धाराशिव दि.१ मार्च (जिमाका) विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या माध्यमातून विविध योजना ह्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती.शैलेश ब्रम्हे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज १ मार्च रोजी धाराशिव येथील लेडीज क्लब येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन न्या.श्री.ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात न्या.श्री.ब्रम्हे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा न्या.श्रीमती अभिश्री देव,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.अमोल वरुडकर यांची उपस्थिती होती. न्या.ब्रम्हे पुढे म्हणाले की,या महाशिबिरासाठी आलेल्या नागरिकांनी येथे लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन संबंधित विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना,अभियान व उपक्रमांची माहिती काळजीपूर्वक जाणून घ्यावी.आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याची माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता करावी.केवळ स्वतःपुरत्याच या योजनांची माहिती जाणून न घेता आपल्या गावातील नागरीकांना, लाभार्थ्यांना तसेच आपल्या शेजाऱ्यांना या महामेळाव्यातून गावाला पोहोचल्यावर त्यांना योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्यात प्रोत्साहित करावे.योजनांच्या लाभामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.असे न्या.ब्रम्हे यांनी सांगितले. विधी सेवा प्राधिकरण व प्रशासनाने या महाशिबिराच्या माध्यमातून योजनांची माहिती देणे व त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे सांगून न्या.श्री.ब्रम्हे म्हणाले की, भारतीय संविधानाने सामाजिक व आर्थिक न्याय सांगितला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधानाची निर्मिती झाली आहे. संविधानाचा सर्वांनाच फायदा व्हावा यासाठी हे महाशिबिर आयोजित केले आहे.समाजातील सर्व नागरिकांना व लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ झाला पाहिजे.शिबिरातून मिळणारी माहिती नागरिकांनी आपल्या गावात घरोघरी पोहोचवून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी न्या.श्री ब्रम्हे यांनी केले. जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,नागरिकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते.शासनाच्या अनेक योजना आहेत.त्या लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. कायदेविषयक शिबिराची माहिती ही नागरिकांनी शेजारच्या व्यक्तीला दिली पाहिजे,असे त्यांनी यावेळी सांगितले. न्या.श्रीमती.देव म्हणाल्या की,हा लोकशाहीचा उत्सव आहे.या उत्सवाच्या माध्यमातून विधी सेवा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. "न्याय सर्वांसाठी" हे विधी सेवा प्राधिकरणचे ब्रीद आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मंचावरून न्या.ब्रम्हे यांच्या हस्ते लोककल्याणकारी योजनांच्या लाभाचे वितरण काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.यामध्ये सिमरन मुजावर या दिव्यांग विद्यार्थ्याला २० हजार रुपयांचे किसान विकास पत्र,अमोल कांबळे - प्रांजली तुपे यांना ५० हजार रुपयांचा आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य या योजनेचा धनादेश,प्रवीण शिंदे याला दिव्यांग कल्याण विभागाकडून बीज भांडवल कर्ज योजनेचा १ लक्ष रुपयांचा कर्ज मंजुरी आदेश,श्रीमती.रंजना ढवळे यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची चाबी,सोनाली उघडे यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून लखपती दीदी सन्मान प्रमाणपत्र,कालिदास शेंडगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नवीन विहिरीचा मंजुरी आदेश, नितीन कांबळे यांना पशुसंवर्धन विभागाकडून शेळी गट वाटप योजनेचे प्रमाणपत्र,सलीम शेख यांना रहिवासी प्रमाणपत्र,दादा घोडके यांना शिधापत्रिका व दिव्यांग लाभार्थी प्रमाणपत्र,सारिका भागवत यांना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शिवणकाम व्यवसाय प्रमाणपत्र,देवांशी काकडे या तृतीयपंथी व्यक्तीला समाज कल्याण विभागाचे तृतीयपंथी ओळखपत्र व विठ्ठल पवार यांना आदिवासी विकास विभागाकडून ई-रिक्षाची चावी देण्यात आली. न्या.श्री.ब्रम्हे व अन्य मान्यवरांनी महामेळाव्यात लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या स्टॉलला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली व त्यांच्या हस्ते संबंधित स्टॉलवर देखील संबंधित विभागाच्या योजनांच्या लाभाचे व प्रमाणपत्राचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी यांनी महाशिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप सिंगुलवार,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील,कळंबचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.साकळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांना भेटवस्तू,पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध न्यायालयाचे न्यायिक अधिकारी,जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी, बचतगटातील महिला लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपिकांना जल अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. अभिश्री देव यांनी केले.संचालन न्या.सचिन पाटील यांनी केले.आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या.भाग्यश्री पाटील यांनी मानले.राष्ट्रगीत व राज्यगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ******