Sunday, 5 August 2018

पालकमंत्री अर्जून खोतकर आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या प्रयत्नाने जिल्हयात काऊ क्लब संकल्पना सिध्दीस जाणार



उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हयापैकी एक जिल्हा आहे. जिल्हयात आर्थिक उत्पन्नाचे दरडोई प्रमाण कमी आहे. उद्योगधंद्याचे प्रमाणही कमी असून मराठवाड्यातील मागास जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. या ठिकाणचे मुख्य उत्पन्न शेतीद्वारेच होते तसेच या भागातील अनिश्चित पावसामुळे शेतीचे उत्पन्न योग्य पद्धतीने मिळत नाही.त्यामुळे शेतीपूरक उद्योगाची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री अर्जून खोतकर आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उस्मानाबाद जिल्हयासाठी काऊ क्लब ही संकल्पना राज्य शासनाकडे मांडली व त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अर्जुन खोतकर, सहपालकमंत्री महादेव जानकर,मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी,मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव भूषण गगराणी, पशुसंवर्धन सचिव श्री.कुरुंदकर,आयुक्त श्री.उमप यांच्या उपस्थितीत राज्य शासनाकडून या प्रकल्पास अनुदान देण्याबाबत सहमती मिळाली आहे. मंत्रालयात नुकतीच याबाबत बैठक संप्पन्न झाली.
       दुर्मिळ होत असलेल्या गीर गायीचे संवर्धन करून त्याद्वारा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दुग्धजन्य पदार्थ, गायीच्या गोमूत्र व शेणापासून आयुर्वेदिक औषधी, सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन जीवनातील उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करून त्या उत्पादित पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे,हा काऊ क्लब चा मुख्य उद्देश आहे. 
             यासोबतच कृषी पर्यटन, ऑरगॅनिक फार्मिंग, ऍग्रो प्रोसेसिंग युनिट, पंचकर्म सेंटर व ट्रीटमेंट सेंटर सुद्धा काऊ क्लब्‍ अंतर्गत तयार करण्यात येणार आहे.  
            उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्येकडे वळलेल्या कुटुंबांचे टाटा सोशल सायन्स द्वारा सर्वेक्षण झालेले आहे. काऊ क्ल्ब अंतर्गत्‍ अशा कुटुंबातील निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येऊन  त्यांचेद्वारा काऊ क्लबचे संचलन होईल. उत्पादित मालाच्या फायद्यातून त्यांना नफा वाटप केले जाईल,त्यामुळे त्यांचे आर्थिक बळकटीकरण होईल. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या गीर गायीचे संवर्धनही होण्यास मदत होईल.
       भारतीय आयुर्वेदात गोमय पदार्थाचे मोठे महत्त्व आहे काऊ क्लबमध्ये सर्व पदार्थांची निर्मिती झाल्यानंतर महत्त्वाच्या फूड कंपन्या व सौंदर्य प्रसाधन कंपन्या यांच्यासोबत करार होऊन या प्रकल्पास मार्केट लिंकेज  केले जाईल. त्याचसोबत या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रही तयार होईल.
    उस्मानाबाद जिल्हयात दुधाचे मोठे उत्पन्न होते मात्र येथे पूरक उद्योग नसल्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. त्याचसोबत काऊ क्लब पशुसंवर्धन विभागाचाही पायलट प्रोजेक्ट होईल.  
     या प्रकल्पास जिल्हा नियोजन समिती, बळीराजा चेतना अभियान या  योजनांचा निधी वापरला जाईल तसेच राज्य शासनानेही या प्रकल्पास मदत करण्याबाबत सहमती दर्शविल्याने उस्मानाबाद जिल्हयात लवकरच काऊ क्लबच्या माध्यमातून आयुर्वेदाचे पंचकर्म सेंटर तयार होऊन जवळपास चाळीस प्रकारची उत्पादने येथे तयार होतील व  केंद्र शासन कृषी विभागाच्या NACOF मंडळाचे सल्ला, सहाय्य व इतर सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

Saturday, 4 August 2018

नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ

उस्मानाबाद,दि.3:-बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 41 (1) अंतर्गत बालकांची काळजी घेणा-या संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार नोंदणी प्रमाणपत्रसाठी ऑन लाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. बाल कल्याण क्षेत्रात कार्य करीत असलेल्या व भविष्यात कार्य करु इच्छिणा-या संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी womennchild.maharashtra.in हे संकेतस्थाळावर नोंदणी करण्यात यावी. ज्या संस्थांनी यापूर्वी ऑनलाईन आणिऑफ लाईन नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले आहे, अशा संस्थानी वरील संकेतस्थळावर त्रुटी पूर्तता अहवाल आयुक्त, महिला व बाल विकास, 28 राणीचा बाग, पुणे -1 यांच्याकडे 30 ऑगस्ट 2018 पर्यंत हस्ते किंवा पोस्टाने पोहचतील, अशा पध्दतीने सादर करावा. त्रुटी पूर्ततेबाबत संकेतस्थावर माहिती उपलब्ध असून याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही तसेच दि. 30 ऑगस्ट 2018 नंतर कोणत्याही संस्थेचा प्रस्ताव व त्रुटीपूर्तता अहवाल स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. अशोक सांवत यांनी कळविले आहे.

Monday, 16 July 2018

खरीप हंगाम 2018 मध्ये पिकाचा विमा हप्ता ऑनलाइन पद्धतीनेच भरणे बंधनकारक

जिल्ह्यात खरीप हंगामात कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि.24 जुलै असून शेतकऱ्यांना विमा हप्ता ऑनलाइन पद्धतीनेच भरणे बंधनकारक आहे. ऐन वेळी सर्व शेतकऱ्यांनी विमा भरण्यास गर्दी केल्यास नेटवर्क कजंक्शन सारख्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच बँकेमध्ये कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाइन पद्धतीनेच pmfby.gov.in या वेबसाईटवर पिक विमा हप्ता भरून घ्यावा. त्याचबरोबर विमा हप्ता भरून घेणाऱ्या बँका करत असतील तर शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांच्या कार्यालयात दूरध्वनी क्रमांक 0 24 72 223 415 या नंबरवर तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दूरध्वनी क्रमांक 24 72 222 815 वर संपर्क करावा. पिक विमा ऑनलाइन पद्धतीनेच बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच पिक विमा भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पराग सोमण व जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाडगे यांनी केले आहे. ****