Monday, 9 October 2017

जेष्ठांच्या मार्गदर्शनानेच समाज घडतो, घडत राहील- चेतन गिरासे





उस्मानाबाद, दि. 9 :-  समाज हा जेष्ठांच्या मार्गदर्शनानेच घडतो आणि यापुढेही घडत राहील, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी आज येथे केले. सामाजिक न्यायविभागामार्फत आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरीक दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
     
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. रविंद्र शिराळ, सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनिता मते, समाजकल्याण अधिकारी अमित घवले, धाराशिव जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष ॲङ देशमुख हे उपस्थित होते.

श्री. गिरासे पुढे म्हणाले की, जेष्ठांचे प्रश्न किंवा समस्या या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदलत असतात. सर्वांचेच प्रश्न सारखेच असतील असे नाही मात्र आजच्या काळात समाजाने आणि शासनाने मिळून जेष्ठ नागरिकांसाठी गांभीर्याने प्रयत्न करणे, ही सामाजिक गरज बनली आहे. यासाठी सर्वच घटकांनी एकमेकांसाठी दुवा म्हणून काम केल्यास दोन पिढयांमधील अंतर निश्चितच कमी होईल. पर्यायाने जेष्ठांच्याही समस्या सुटण्यास सकारात्मक परिस्थिती तयार होईल.

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री. शिराळ यांनी जेष्ठांची व्याख्या करताना सांगितले, जेष्ठ म्हणजे वयाची साठी पूर्ण केलेली आणि अनुभवाची भरमसाठ शिदोरी असलेली व्यक्ती. “जेष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरील उपाय” या विषयावर बोलताना ते म्हणाले की, जेष्ठांना तीन प्रकारच्या समस्या असतात शारिरीक, मानसिक, आर्थिक आणि यावर मात करायची असेल तर आध्यात्म हा त्यावरील रामबाण उपाय आहे. जेष्ठ नागरिकांनी आध्यात्माची कास धरुन अंतर्मुख व्हावे, आपली वर्तणूक जपावी, मीपणा सोडून कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजाला, कुटुंबाला जे-जे देता येईल ते-ते द्यावे, स्वावलंबी व्हावे असे सांगून त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी ज्या संस्था काम करतात त्यांचे आभार मानले आणि मागची पिढी व आत्ताची पिढी यात सुसंवादाची गरज असल्याचे मत शेवटी व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नागरिकांच्या मराठवाडा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते डॉ. राऊत, ॲङ राम गरड, संजय नायगावकर, डॉ. पाईकराव यांचा प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अनु. जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. नकुशा बनसोडे, पायल शितोळे, भाग्यश्री राठोड, नेहा देडे, यांचा 100 मीटर रिले विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल व त्यांची निवड राज्यस्तरावर झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यानंतर श्रध्दा वाघमारे हिला जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांकाबद्दल गौरविण्यात आले.

याचबरोबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने विष्णुपंत कुलकर्णी, श्रीमती सीताबाई साळुंके, खंडू कांबळे, पांडुरंग पडवळ, परसू लमान (आडे), राजाराम पडवळ, उमाकांत नायगावकर, भास्कर नायगावकर, कमलाकर आयाचित, रामकृष्ण कुलकर्णी, आर.जी. कुलकर्णी, व्यंकटेश डांगे, सिद्राम भोसले, दलितमित्र शंकर खुणे, श्री. व सौ. विद्यालंकार या सर्व जेष्ठांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून यथोचित आदर सत्कार करण्यात आला.


अध्यक्षीय समारोप धाराशिव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲङ देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. शेवटी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे समाजकल्याण अधिकारी अमित घवले यांनी आभार मानले. 

Sunday, 8 October 2017

नागरीक सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न




उस्मानाबाद, दि.8 :-  उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नागरीक सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन एमएसईबी कार्यालयासमोरील नगरपरिषद गाळा क्रं. 24 मध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
            नागरीकांना सेतू सुविधा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा सुलभरित्या ऑनलाईन उपलब्ध व्हाव्यात यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे व जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार नागरीक सेतू सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली.
            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गमे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व जिल्हयाचे संगणकीकृत 7/12 डिजिटल स्वाक्षरीसह या केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आलेले असून दररोज सकाळी 08.00 ते सायंकाळी 08.00 पर्यंत नागरिकांच्या सोईसाठी, नागरीक सेतू सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहे, याचा जिल्हयातील सर्व शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे अधिकारी श्री. कोंडेकर, श्री. रुकमे, सेतू सुविधा केंद्राचे श्रीशैल्य देशमुख, महेश कुलकर्णी, ईस्माईल शेख तसेच शेतकरी व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.  

तरुणांनो सैन्याधिकारी व्हा….टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना

पार्ट टाईम आर्मी...... फूल टाईम इंडियन !



टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेची स्थापना सप्टेंबर 1948 मध्ये पारित झालेल्या प्रादेशिक सेना अधिनियम 1948 नुसार 9 ऑक्टोबर 1949 मध्ये करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गर्व्हनर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी संकटकाळात देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पेलणे, आवश्यकता निर्माण झाल्यास नियमित सेनेला मदत करणे, देशातील तरुणांना नागरी जीवनाबरोबरच सैन्यदलात सेवा करुन देशसेवेची संधी देणे या उद्देशाने प्रादेशिक सेनेची स्थापना केली.
तेव्हापासून 9 ऑक्टोबर हा दिवस प्रादेशिक सेनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात याबाबतची जाणीव जागृती फारच कमी प्रमाणात असल्याने याविषयी अधिकाधिक तरुणांना माहिती व्हावी म्हणून हा विशेष लेख… तर जाणून घेऊया काय आहे टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना….

टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना:-
          Territorial Army म्हणजेच प्रादेशिक सेना होय, अशी सेना जी नियमित सैन्यदलाला आवश्यकता असेल तेव्हा Second line defence म्हणून मदत करते.
          यामध्ये काही महिन्यांचे प्रशिक्षण देवून सैनिक तसेच अधिकारी घडविले जातात. या सेनेचे ब्रीदवाक्य आहे “सावधानी व शूरता” “Vigilant & Valour”  यात काम करणाऱ्या जवान/ अधिकाऱ्यांना अभिमानाने Terriers म्हटले जाते.   
आत्तापर्यंत प्रादेशिक सेनेने नियमित सैन्यदलाला भारत-चीन 1962, भारत-पाकिस्तान 1965, भारत-पाकिस्तान 1971, ऑपरेशन पवन (श्रीलंका), ऑपरेशन रक्षक (पंजाब), ऑपरेशन ऱ्हिनो (जम्मू काश्मीर), ऑपरेशन बजरंग (उत्तर पूर्व भागातील) अशा युध्द वा लष्करी कारवायांच्या वेळी मदत करुन महत्वाची भूमिका निभावली आहे.

कोणाला भरती होता येते ?
भारतीय नागरिकत्व असलेल्या, 18 ते 42 वर्षे वय असलेल्या, मान्यताप्राप्त पदवीधारक, शारिरीक व मानसिक सक्षम असलेल्या आणि साधारणत: ज्यांचे मासिक उत्पन्न व्यवस्थित आहे अशा पुरुष उमेदवारांना प्रादेशिक सेनेमध्ये अधिकारी पदासाठी तसेच सर्वसाधारण सैनिक जवान म्हणूनही भरती होता येते. 
याचप्रमाणे केंद्र शासन/ राज्य शासन/ केंद्रशासित प्रदेश/ खाजगी क्षेत्र/ स्वत:चा व्यवसाय असणाऱ्या पुरुष उमेदवारांनाही Territorial Army मध्ये भरती होता येते. मात्र नियमित भूसेना/ नौसेना/ वायुसेना/ पोलीस/ निमलष्करी दल यातील सदस्यांना Territorial Army मध्ये भरती होता येत नाही. भविष्यात नियमित सैन्यदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर आणि शारिरीक, मानसिक सक्षम असल्यास अशा सदस्यांकरिता विशेष भरती असते त्यावेळी ते त्या भरतीकरिता अर्ज करणे वा तत्सम भरती प्रक्रियेत उमेदवार म्हणून सहभागी होवू शकतात. त्यांची निवड प्रक्रिया वेगळया पध्दतीने होते.

Territorial Army त अधिकारी कसे होता येते  :-
मुख्यत: अधिकारी पदाकरिता Departmental म्हणजे खातेनिहाय व Non-departmental म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येते.

अधिकारी :- For Civilians.
ही जाहिरात साधारणत: “मे” महिन्यात येते/ जून महिन्यात ऑनलाईन अर्ज भरण्यात येतो, जुलै महिन्यात परिक्षा घेतली जाते.
यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असते.  परिक्षा शुल्क रु. 200/- असते.  लेखी परिक्षा (Objective Type) एकूण 200 गुणांची असते. यासाठी प्रत्येक पेपरसाठी 2 तासांचा वेळ दिला जातो. चुकीच्या उत्तराला Negative Marking System असते.
 पेपर- 1
अ) तार्किक योग्यता ( Reasoning) – 50 गुण -  50 प्रश्न.
ब)  गणित (Maths) –  50 गुण - 50 प्रश्न.
पेपर-2
अ) सामान्य ज्ञान (General Knowledge) – 50 गुण – 50 प्रश्न.
ब) इंग्रजी (English) -  50 गुण – 50 प्रश्न.

या लेखी  परिक्षेत प्रत्येक भागात 40% स्वतंत्र तर सर्व भाग मिळून सरासरी 50% इतके गुण मिळविणे अनिवार्य असते, असे गुण मिळाले तरच त्या उमेदवाराला लेखी परिक्षेत उत्तीर्ण केले जाते. त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांवरच मुलाखत घेतली जाते.
ही मुलाखत “Preliminary Interview Board” यांच्यामार्फत घेतली जाते. यात उत्तीर्ण झाल्यास SSB Interview करिता उमेदवारास पाठविले जाते. पुढे SSB मध्ये उत्तीर्ण झाल्यास वैद्यकीय चाचणी घेण्यात येते.
त्यानंतर संबंधित उमेदवाराचे चारित्र्य पडताळणी व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करुन त्या उमेदवारास Commissioned Officer चा दर्जा प्रदान करण्यात येऊन त्यास लेफ्टनंट ही रँक सन्मानपूर्वक देण्यात येते. त्यानंतर त्यांना विविध प्रकारचे आवश्यक ते लष्करी प्रशिक्षण देण्यात येते. ही झाली अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया.

सैनिक जवान भरती :-
प्रादेशिक सेनेत जवानांच्या भरतीसाठी  संपूर्ण भारतात 1) पश्चिम हिमालयीन विभाग, 2) पूर्व हिमालयीन विभाग, 3) पश्चिम विभाग, 4) पूर्व विभाग, 5) मध्य विभाग- मध्यप्रदेश/गुजरात/महाराष्ट्र/दादरा-नगर हवेली/दीव-दमन/गोवा, 6) दक्षिण विभाग असे विभाग कार्यरत आहेत.  
संपूर्ण भारतात अंबाला / बंगलूर/ चैन्नई/ दानपूर/ जबलपूर/ जालंधर/ कोलकाता/ लखनौ/ पुणे/ शिलाँग/ जयपूर या केंद्रांवर प्रादेशिक सेनेसाठी जवानांची भरती होते. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील युवकांसाठी मध्य विभाग,  पुणे येथे कार्यरत आहे.

जवानांसाठी विविध प्रकारची शारिरीक क्षमता, शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:-
अ)     जवान (सर्वसाधारण व ट्रेडस्मन )करिता उंची  168 सें.मी., छाती 77 सें.मी. वजन 50 कि.ग्रॅ. शिक्षण – 10 वी.
ब)      जवान (तांत्रिक व नर्सिंग असिस्टंट) करिता उंची 167 सें.मी., छाती 77 सें.मी., वजन  50 कि.ग्रँ. शिक्षण- पदाच्या आवश्यकतेनुसार आवश्यक त्या ट्रेडनुसार.
क)     जवान (लिपिक व भांडारपाल) करिता उंची 162 से.मी., छाती 77 से.मी., वजन 50 कि.ग्रँ. शिक्षण- मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेचा पदवीधर.
                   याशिवाय जवानांच्या भरतीसाठी त्यांना काही शारिरीक क्षमतेच्या चाचण्यांनाही सामोरे जावे लागते.  जसे 1.6 कि.मी. अंतर कमीत-कमी 5 मि. 40 सेकंदात तर जास्तीत-जास्त 6 मि. 20 सेकंदात धावणे, 10 पुल अप्स काढणे, झिगझॅक वर संतुलन राखून चालणे, 9 फूट उडी मारणे.  

प्रादेशिक सेनेतील अधिकारी व जवानांसाठीचे प्रशिक्षण :-
प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना 1 महिना संबंधित युनिटमध्ये,  1 महिना प्रादेशिक सेना प्रशिक्षण शाळा, देवळाली(नाशिक)येथे आणि 3 महिने इंडियन मिलिटरी ॲकॅडमी, डेहरादून येथे प्रशिक्षण देण्यात येते. 
प्रादेशिक सेनेत जवान म्हणून निवड झालेल्या जवानांना 1 महिना संबंधित युनिटमध्ये आणि 9 महिने संबंधित रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.

भरती झालेल्या अधिकाऱ्यांचे वेतन, त्यांची पदे/ प्रमोशन :-         
          प्रादेशिक सेनेत भरती झालेल्या जवान वा अधिकाऱ्यांना नियमित सैन्यदलाप्रमाणेच वेतन व भत्ते तसेच इतर सर्व प्रकारच्या सोयीसवलती देण्यात येतात.
          प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सर्वात पहिली पोस्टींग लेफ्टनंट म्हणून देण्यात येते, तर त्यानंतर पदोन्नतीने कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल आणि ब्रिगेडिअर या पदापर्यंत पोहोचता येते. प्रादेशिक सेनेचे वैशिष्टय म्हणजे आपणास वर्षातून दोन महिने सैन्यात तर उर्वरीत 10 महिने आपली मूळ नोकरी, व्यवसाय करता येतो. प्रादेशिक सेनेत आवश्यकतेनुसार आपली सेवा घेण्यासाठी सैन्याकडून आदेश काढले जातात.

प्रादेशिक सेनेची रचना व विभाग:-
          सेनादलाचे प्रमुख हेच प्रादेशिक सेनेचेही सर्वोच्च प्रमुख असतात. सध्या जनरल बिपीन रावत हे प्रादेशिक सेनेचे सर्वोच्च प्रमुख आहेत तर प्रमुख म्हणून अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल चतुर्वेदी हे आहेत. यांचे कार्यालय दिल्ली येथे आहे.
प्रादेशिक सेनेचे एकूण 5 विभाग आहेत, ज्याला ग्रुप हेडक्वार्टर्स (Group Headquarters) म्हणतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.
दक्षिण कमांड(Southern Command) :-  पुणे (महाराष्ट्र)
पूर्व कमांड (Eastern Command) :-  कोलकाता (प.बंगाल)
पश्चिम कमांड (Western Command) :-  चंदीगढ (चंदीगढ)
मध्य कमांड (Central Command) :-  लखनौ (उत्तरप्रदेश)
उत्तर कमांड(Northern Command) :-  उधमपूर (जम्मू-काश्मिर)
नैऋत्य कमांड(South Western Command) :-  जयपूर (राजस्थान)
प्रादेशिक सेनेची संख्या आज जवळपास पहिल्या फळीतील 40 हजार तर दुसऱ्या फळीत 1 लाख 60 हजार इतकी आहे.
          यामध्ये Departmental Units, Non-departmental Units, Infantry Unit तसेच Ecological (पर्यावरण) बटालियन अशी रचना आहे. Departmental Units (खातेनिहाय युनिट) मध्ये रेल्वे (Railway), इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOC), ओ.एन.जी.सी. (O.N.G.C.), दूरसंचार (Telecommunication) आणि सामान्य रुग्णालय(General Hospital) या क्षेत्रातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. तर Non Departmental Units  व Ecological (पर्यावरण) बटालियनमध्ये निवड झालेल्या नागरिकांची अधिकारी/ जवान म्हणून सेवा घेण्यात येते.
या संपूर्ण प्रादेशिक सेनेत रेल्वे(Railways) 13 युनिट.,  सामान्य रुग्णालय (General Hospitals) 7 युनिट, मार्केर्टिंग (Marketing) 1 युनिट,  दूरसंचार (Telecommunication) 1 युनिट, इंजिनिअर (Engineer) 1 युनिट, रिफायनरीज आणि पाईप्स (Refineries & Pipelines) 1 युनिट, इंजिनिअर ओ.एन.जी.सी. ( Engineer ONGC) 1 युनिट, इंन्फंट्री (Infanrty) जवळपास 42 युनिट, पर्यावरण (Ecological) बटालियन जवळपास 10 युनिट अशाप्रकारे जवळपास 77 विविध युनिटस् कार्यरत आहेत.
आत्तापर्यंत Departmental TA Units ने लातूर येथील भूकंप, गढवाल हिमालय मधील उत्तरकाशी येथील जलप्रलय, ओडिसा येथील वादळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे.  याशिवाय Ecological (पर्यावरण) बटालियनने  मसुरी, बिकानेर, जैसलमेर, चंबळ येथील 20 हजार हेक्टर जमीन क्षेत्रावर 2 कोटी 5 लक्ष वृक्ष लागवड केली आहे.
गरजेनुसार या युनिटस् चा प्रत्यक्ष युध्दातही समावेश असतो. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी वा जवानालाही नियमित सैन्यदलासारखेच शौर्यचक्र, वीरचक्र देवून गौरविण्यात येते.
अलिकडे प्रादेशिक सेनेमध्ये भरती होण्यासाठी महिलांसाठीही अंशत: प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
आपल्या भारतीय सैन्याबाबत, प्रादेशिक सेनेबाबत अधिक माहितीसाठी आपण Indianarmy.nic.in या संकेतस्थळाला जरुर भेट द्यावी.

जय हिंद…
    श्री. मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद.