Thursday, 27 July 2017

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करावी - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.27:- सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयात धुम्रपान करण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात येऊन सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यावर व शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत धुम्रपान करताना आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज आयोजित बैठकीत दिले.
                          राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मौखिक, डोके,मान व चेहरा कर्करोग प्रतिबंध सप्ताहनिमित्त आढावा बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, अन्न व प्रशासनचे सहाय्यक आयुक्त श्री.टी.एस.बोराळकर, औषध निरिक्षक श्री.एस.एन.गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजुम शेख, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
                          यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या आजाराचा प्रार्दुभाव होवू शकतो.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर करण्याची गरज असून शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसराच्या 100 मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री तसेच सेवनाला बंदी असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य व तंबाखुमुक्त शाळा याबाबत शिक्षकांनी माहिती दयावी, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात धुम्रपानाचे प्रमाण अधिक असल्याने याबाबत ग्रामीण भागात तंबाखु सेवनामुळे होणारे आजार याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना यावेळी श्री. गमे यांनी  दिल्या.

                          यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 ची सादरीकरणाद्वारे माहिती बैठकीत दिली.

Wednesday, 26 July 2017

उस्मानाबाद येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा




उस्मानाबाद, दि.26 :-  कारगिल (ऑपरेशन विजय) युध्दात मिळालेल्या विजयास आज 26 जुलै 2017 रोजी सतरा वर्षे पूर्ण होत असून कारगिल विजयाचा 18 वा कारगिल विजय दिवस म्हणून उस्मानाबाद येथिल स्मृतीस्तंभास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन पुष्पांजली वाहण्यात आली.
            या कार्यक्रमास जिल्हयातील प्रतिष्ठित नागरीक, युध्दात शहिद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी कारगिल विजयी दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातून रॅली काढून कारगिल विजयी दिनाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या रॅलीत विद्यार्थ्यांसमवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम. चव्हाण व सर्व शिक्षकवृंद यांनी सहभाग नोंदविला.
            यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत‍ युध्दात शहीद झालेल्या किंवा शौर्य पदक विजेत्या सैनिकांच्या वीर नारींना राज्य शासनामार्फत राज्य परिवहन बस मध्ये  2500 कि.मी. प्रवास करण्याकरीता 3586 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हयातील एकूण नऊ पैकी प्रातिनिधीक तीन वीर नारींना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील श्रीमती प्रभावती राजाराम निकम, लोहारा तालुक्यातील नारंगवाडी येथील श्रीमती बेबीताई शहाजी व तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील श्रीमती कांताबाई विश्वनाथ कदम यांचा समावेश आहे. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.